मुळा लागवड माहिती तंत्रज्ञान – Radish Cultivation Information
मूळवर्गीय पिकांमध्ये मुळा हे एक महत्त्वाचे पीक आहे. मुळा हे थंड हवामानातील पीक असून त्याची लागवड प्रामुख्याने रब्बी हंगामात केली जाते. परंतु उष्ण हवामानात चांगल्या वाढू शकणाऱ्या मुळ्याच्या जाती विकसित करण्यात आल्यामुळे मुळ्याचे पीक जवळजवळ वर्षभर घेता येते.
मुळ्याची लागवड उत्तर भारतातील मैदानी प्रदेश तसेच दक्षिण भारतात आणि थंड हवेच्या डोंगराळ भागातही केली जाते. महाराष्ट्रात निरनिराळ्या भागांत स्वतंत्रपणे अथवा मिश्रपीक म्हणून मुळ्याची लागवड केली जाते. नाशिक, पुणे भागात मुळ्याची लागवड वर्षभर होते.
हवामान
मुळा हे प्रामुख्याने थंड हवामानातील पीक आहे. मुळ्याची वाढ 20 ते 25 अंश सेल्सिअस तापमानाला झपाट्याने होते. परंतु चांगला स्वाद आणि कमी तिखटपणा येण्यासाठी मुळ्याच्या वाढीच्या काळात 15 ते 20 अंश सेल्सिअस तापमान असावे लागते. मुळ्याच्या वाढीच्या काळात तापमान जास्त झाल्यास मुळा लवकर जून होतो आणि त्याचा तिखटपणाही वाढतो.
जमीन
मुळ्याच्या जमिनीतील वाढ चांगली होण्यासाठी लागवडीखाली निवडलेली जमीन भुसभुशीत असावी. भारी जमिनीची चांगली मशागत करावी अन्यथा मुळ्याच्या आकार वेडावाकडा होतो आणि त्यावर असंख्य तंतुमुळे येतात. अशा मुळ्याला बाजारात मागणी नसते. मुळ्याची लागवड अनेक प्रकारच्या जमिनीत करता येत असली तरी मध्यम ते खोल भुसभुशीत अथवा रेताड जमिनीत मुळा चांगला पोसतो. चोपण जमिनीत मुळ्याची लागवड करू नये.
वाण
मुळ्याच्या वाढीला लागणाऱ्या तापमानानुसार मुळ्याच्या जातीचे दोन प्रकार आहेत.
अ) युरोपीय किंवा थंड हवामानात वाढणाऱ्या जाती
या जाती द्विवर्षायु असून त्यांचे बी थंड हवामानात तयार होते. या जातीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ह्या जाती झपाट्याने वाढून लवकर (25 ते 30 दिवसांत) काढणीस तयार होतात. ह्या जातींचे मुळे कमी तिखट असतात. या गटातील व्हाईट आयसिकल आणि रॅपिड व्हाईट टिप्ड ह्या जाती भारतात चांगल्या येतात.
1) व्हाईट आयसिकल
या जातीचा मुळा पांढरा, सडपातळ, 12-15 सेंमी. लांबी, 2-3 सेंमी. व्यासाचा आणि कमी तिखट असतो. बियांच्या लागवडीनंतर 28-30 दिवसांत मुळा काढणीला तयार होतो. काढणीला उशीर झाल्यास मुळे जून होतात.
2) रॅपिड रेड व्हाईट टिप्ड (फ्रेंच ब्रेकफास्ट)
ही जात लवकर येणारी असून बियांच्या लागगवडीनंतर 26 दिवसांत काढणीस तयार होते. ह्या जातीचा मुळा गोल आकाराचा, लाल, लहान आणि कोवळा असतो. मुळ्यामध्ये तिखटपणा कमी असतो. गर पांढऱ्या रंगाचा, कुरकुरीत असतो.
ब) आशियाई किंवा उष्ण समशीतोष्ण हवामानात वाढणाऱ्या जाती
या गटातील जाती वर्षायु असून उष्ण हवामानात त्यांची वाढ चांगली होते. या जातीचे बी भारतातील मैदानी प्रदेशात तयार होऊ शकते. या जातीच्या मुळ्यांना जास्त प्रमाणात तिखटपणा असतो. या जाती उशिरा तयार होतात.
1) पुसा हिमानी
या जातीचा मुळा 30 ते 35 सोंटिमीटर लांब 10-12 सेंमी. जाडीचा, पांढरा, एकसारख्या जाडीचा, कोवळा आणि चवीला गोड असतो. ही जात थंड हवामानासाठी चांगली असून भारतात हिवाळी हंगामासाठी ही जात चांगली आहे. पेरणीनंतर 55 दिवसांनी काढणीस तयार होते.
2) पुसा देशी
ही जात जास्त तापमान असणाऱ्या भागात लावता येत नाही. या जातीची लागवड ऑगस्ट ते ऑक्टोबरच्या दरम्यान करावी. या जातीचा मुळा पांढऱ्या रंगाचा असून 30 ते 35 सेंटिमीटर लांब, मध्यम जाड, निमुळता आणि जास्त तिखट असतो. हे पीक सरासरी 50 ते 60 दिवसांत तयार होते. या जातीचे सरासरी 30-35 टन हेक्टरी उत्पादन मिळते.
3) पुसा चेतकी
या जातीची लागवड जास्त तापमान असलेल्या भागात मार्च ते ऑगस्टपर्यंत करता येते. तसेच या जातीची लागवड ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यातही करता येते. या जातीचा मुळा पांढराशुभ्र, मुलायम आणि कमी तिखट असतो. ही जात 40 ते 45 दिवसांत काढणीस तयार होते.
4) पुसा रेशमी
या जातीचे मुळे पांढऱ्या रंगाचे, 30 ते 45 सेंटिमीटर लांबीचे आणि निमुळत्या आकाराचे असतात. या जातीचे उत्पादन थंड हवामानात चांगले होते. ही जात 55 – 60 दिवसांत काढणीसाठी तयार होते.
5) जॅपनीज व्हाईट
या जातीचे मुळे पांढऱ्या रंगाचे, 20 ते 30 सेंटिमीटर लांबीचे जाड, बेलनाकार (लाटण्याच्या आकाराचे) आणि कमी तिखट असतात. गर पांढराशुभ्र, कुरकुरीत असतो. ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात या जातीची लागवड करावी. हेक्टरी 15 30 टन उत्पादन येते.
6) गणेश सिंथेटिक :
ही जात खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांसाठी चांगली आहे. या जातीचे मुळे पांढऱ्या रंगाचे आणि तंतुमुळेविरहित असतात. या जातीच्या मुळ्याची लांबी 25 ते 30 सेंटिमीटर असते आणि चव तिखट असते. या जातीचे उत्पादन हेक्टरी 50 ते 55 टन मिळते.
हंगाम
मुळा हे महत्त्वाचे मूळवर्गीय भाजीपाला पीक असल्याने महाराष्ट्रात मुळ्याची लागवड वर्षभर करता येते. परंतु मुळ्याची व्यापारी लागवड प्रामुख्याने रब्बी हंगामात केली जाते. रब्बी हंगामासाठी सप्टेंबर ते जानेवारी ह्या कालावधीत बियांची पेरणी करावी. उन्हाळी हंगामासाठी मार्च-एप्रिल महिन्यात तर खरीप हंगामासाठी जून ते ऑगस्ट महिन्यात बियांची पेरणी करावी.
लागवडीचे अंतर
मुळ्याची लागवड करताना दोन ओळींतील अंतर 30 ते 45 सेंटिमीटर आणि दोन रोपांतील अंतर 8 ते 10 सेंटिमीटर ठेवावे. महाराष्ट्रात मुळ्याचे पीक जवळ जवळ वर्षभर घेता येते. लागवडीच्या हंगामासाठी योग्य जातीची लागवड केल्यास वर्षभर मुळा बाजारपेठेत पाठविता येतो.
लागवड
मुळ्याची लागवड सपाट वाफ्यात किंवा सरी-वरंब्यावर केली जाते. दोन वरंब्यांमधील अंतर मुळ्याच्या जातीवर अवलंबून असते.
युरोपीय जातींसाठी हे अंतर 30 सेंटिमीटर ठेवतात; तर आशियाई जातींकरिता 45 सेंटिमीटर अंतर ठेवतात. वरंब्यावर 8 सेंटिमीटर अंतरावर 2- 3 बिया टोकून पेरणी करावी.
पेरणीपूर्वी बी युरिया फॉस्फेट आणि जिबरेलिक ॲसिड यांच्या 30 पीपीएम द्रावणात बुडवून लावल्यास उगवण लवकर व एकसारखी होते व मुळांची लांबी वाढून उत्पादन वाढते.
सपाट वाफ्यात 15 x 15 सेंटिमीटर अंतरावर लागवड करतात. बियाण्यांची पेरणी 2 ते 3 सेंटिमीटर खोलीवर करावी.
खतांचे प्रमाण
मुळ्याचे पीक कमी कालावधीत तयार होणारे असल्यामुळे जास्त उत्पादन मिळण्यासाठी या पिकाला खते वेळेवर द्यावीत. जमिनीची मशागत करताना चांगले कुजलेले शेणखत 25 टन दर हेक्टरी जमिनीत मिसळून द्यावे. मुळ्याच्या पिकाला दर हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे. स्फुरद आणि पालाश यांची पूर्ण मात्रा आणि नत्राची अर्धी मात्रा पेरणीपूर्वी द्यावी. नत्राची उरलेली अर्धी मात्रा ही बी उगवून आल्यावर म्हणजेच पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी द्यावी.
पाणी व्यवस्थापन
मुळ्याच्या वाढीसाठी जमिनीत सतत ओलावा असणे आवश्यक असते. कोरड्या जमिनीत मुळ्याची पेरणी करू नये. बियांची पेरणी केल्यानंतर लगेच हलके पाणी द्यावे. यानंतर जमीन, हवामान, पिकाच्या वाढीची अवस्था यांचा विचार करून पाण्याच्या पाळ्यांतील अंतर ठरवावे. उन्हाळी हंगामात 4 ते 5 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
आंतरमशागत
मुळ्याची लागवड कमी अंतरावर करतात; म्हणून जमिनीची मशागत चांगली करणे आवश्यक आहे. पीक कमी कालावधीत तयार होणारे असल्यामुळे सुरुवातीच्या काळात पिकात खुरप्याच्या साहाय्याने निंदणी वेळेवर करून पीक तणरहित ठेवावे. साधारणपणे दोन निंदण्या कराव्यात. एक खोदणी आणि एक निंदणी सुरुवातीच्या काळात करावी. मुळे लांब वाढणाऱ्या जातींना आवश्यकतेप्रमाणे भर द्यावी.
किडी, रोग आणि नियंत्रण
1) काळी अळी (मस्टर्ड सॉ फ्लाय)
मुळ्यावरील ही एक प्रमुख कीड आहे. लागवड झाल्यावर आणि मुळ्याची उगवण झाल्यावर सुरुवातीच्या काळात या काळ्या अळीचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होतो. या अळ्या पाने खातात आणि त्यामुळे पानांवर छिद्रे दिसतात.
उपाय : या अळीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 20 मिलिलीटर मॅलॅथिऑन मिसळून पिकावर फवारावे.
2) मावा
या किडीचा उपद्रव ढगाळ हवामानात जास्त प्रमाणात होतो. या किडीची पिल्ले तसेच प्रौढ किडे पानांतील अन्नरस शोषून घेतात, त्यामुळे पाने गुंडाळली जातात. रोप कमजोर होते. पिवळे पडून रोप मरते.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 20 मिलिलीटर मॅलॅथिऑन मिसळून पिकावर फवारावे.
3) करपा
मुळ्याच्या पिकावर करपा रोग मोठ्या प्रमाणावर आढळतो. या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानांवर पिवळे फुगीर डाग अथवा चट्टे पडतात. नंतर खोडावर आणि शेंगांवर पिवळे डाग पडतात. पावसाळी हंगामात रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 25 ग्रॅम डायथेन एम-45 हे बुरशीनाशक मिसळून फवारणी करावी.
(टीप: मुळा पिकांवर रासायनिक औषधांची फवारणी करण्यापूर्वी मान्यता प्राप्त कंपनीचे औषधे वापरावे व तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या सल्ल्यानुसार पिकांवर फवारणी करावी. पिकांवर कोणत्याही वाईट परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी.)
काढणी
मुळ्याची लागवड केल्यानंतर जातीनुसार 40 ते 55 दिवसांनी मुळे काढणीसाठी तयार होतात. मुळे नाजूक आणि कोवळे असतानाच मुळ्यांची काढणी करावी. मुळा जास्त दिवस जमिनीत राहिल्यास कडसर, तिखट आणि जरड होतो, मुळ्याचा गाभा रवाळ होऊन भेगा पडतात.
उत्पादन
मुळ्यांचे उत्पादन हे मुळ्याची जात आणि लागवडीचा हंगाम ह्यांवर अवलंबून असते. साधारणपणे रब्बी हंगामात मुळ्याचे दर हेक्टरी 30 ते 35 टन उत्पादन मिळते.
विक्री
मुळे काढण्यापूर्वी शेताला पाणी द्यावे आणि हाताने मुळे उपटून काढावेत. नंतर त्यावरील माती काढून मुळे पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावेत. किडलेले, रोगट मुळे वेगळे काढावेत. मुळे पाल्यासह काढून विक्रीसाठी पाठवितात. विक्रीसाठी पाठविताना मुळे आणि पाने यांना इजा होऊ नये म्हणून टोपलीत किंवा खोक्यात व्यवस्थित रचून विक्रीसाठी पाठवावीत.
बीजोत्पादन
मुळ्याच्या थंड हवामानात घेतल्या जाणाऱ्या वाणांचे बीजोत्पादन पहाडी क्षेत्रातच घेतले जाते; तर समशीतोष्ण हवामानात घेतल्या जाणाऱ्या वाणांचे बीजोत्पादन पठारी भागात घेता येते. बीजोत्पादन पहाडी भागात घेतल्यास अधिक उत्पादन येते.
मुळ्यामध्ये परपरागीभवन मधमाश्यांच्या माध्यमातून होत असल्याने त्यांचा तसेच तापमानाचा बीजोत्पादनावर परिणाम होतो. 330 सेल्सिअसच्यावर तापमान गेल्यास बीजधारणा होत नाही. बीजोत्पादनासाठी थंड हवामान निवडावे आणि 1,000 मीटरचे विलगीकरण अंतर राखावे.
उच्च प्रतीचे बियाणे तयार करण्यासाठी मुळे काढून त्यांची निवड करून खालील अर्धा भाग कापून परत लावण्याची प्रथा असली तरी यामुळे उत्पादनात घट येते; म्हणून शक्यतो मुळ्यांना इजा न करता पूर्ण मुळ्यांची लागवड करावी.
मुळापासून हेक्टरी 600 ते 800 किलो बियाण्याचे उत्पादन मिळते. बीजोत्पादन पिकावर डिंगऱ्या धरल्यानंतर 100 पीपीएम जीएची फवारणी केल्यास डिंगऱ्या व बी चांगले पोसतात.
मुळा लागवड तंत्रज्ञान (Radish Cultivation Technology) हा लेख आपणास आवडला असल्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा.
source : agrimoderntech.in