कृषी महाराष्ट्र

Rabi Crop Insurance : रब्बी पिकांना मिळणार विमा कवच ! वाचा संपूर्ण

Rabi Crop Insurance : रब्बी पिकांना मिळणार विमा कवच ! वाचा संपूर्ण

 

येवला : राज्यात रब्बी हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना (Crop Insurance Scheme) लागू करण्यात आली असून जिल्ह्यातील १३६ मंडलांना विम्याचा लाभ होणार आहे. जिल्ह्यातील गहू, बागायती व जिरायती ज्वारी, हरभरा (Chana), उन्हाळी भुईमूग आणि रब्बी कांदा (Rabi Onion) या पिकांसाठी विम्याचे सुरक्षा कवच (Insurance Cover) मिळणार असून त्यासाठी ७० टक्के जोखीम स्तर आहे तर दीड टक्के हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागणार असून इतर हप्त्याचे रक्कम केंद्र व राज्य शासन भरणार आहे.

पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड रोगराई तसेच नैसर्गिक आपत्ती, कीडरोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची तरतूद या योजनेत आहे. अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे तसेच कूळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभाग ऐच्छिक आहे.

जिल्ह्यातील गव्हासाठी ३२, बागायती ज्वारीसाठी २०, तर जिरायती ज्वारीसाठी ४६, हरभऱ्यासाठी १३, उन्हाळी भुईमुगासाठी १४ मंडल तर रब्बी कांद्यासाठी १२ तालुके असे १३६ मंडलांतील पिकांना विम्याचे संरक्षण मिळणार आहे. उन्हाळी भाताचा कुठल्याही मंडळाचा समावेश नाही. कांद्यासाठी मालेगाव, नांदगाव, बागलाण, कळवण, देवळा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, निफाड, सिन्नर, येवला व चांदवड या तालुक्यांतील रब्बीच्या कांद्याला विम्याचे संरक्षण मिळणार आहे.

जिल्ह्यासाठी एचडीएफसी इरगो जनरल कंपनीची निवड कृषी विभागाने केली आहे. योजनेत सहभागासाठी ज्वारीकरिता अंतिम मुदत ३० नोव्हेंबर तर गहू, हरभरा, कांद्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत असून उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांना ३१ मार्च २०२३ पर्यंत विमा योजनेत सहभाग नोंदवता येणार आहे. नैसर्गिक आपत्तीत विम्याची गरज असल्याने शेतकऱ्यांनी उमा विमा उतरविण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना या विमा योजनेत सहभागाचे बंधन नसून योजनेत भाग घ्यायचा नसल्यास योजनेच्या अंतिम तारखेआधी किमान ७ दिवस संबंधित बँकेला लेखी कळवावे लागेल. बिगर कर्जदारांनी सात-बारा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड व पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र हाती ठेवावे लागेल. www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर किंवा बँकेत विमा अर्ज व हप्ता भरता येईल तसेच सार्वजनिक सेवा केंद्रात (सीएससी) ‘आपले सरकार’च्या मदतीने विमा योजनेत सहभागी होता येते. माहितीसाठी विमा कंपनी किंवा कृषी विभागाच्या स्थानिक कार्यालयांशी संपर्क साधावा.

असे आहे स्वरूप

पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम (प्रती हेक्टरी) शेतकरी हप्ता (रुपयांत)

ज्वारी बागायती ३३००० ४९५

ज्वारी जीरायती ३०००० ४५०

गहू ४०००० ६००

हरभरा ३०००० ४५०

उ.भुईमूग ४२९७१ ६४५

रब्बी कांदा ९०००० ४५००

source: agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top