वेलवर्गीय भाजीपाला यशोगाथा
नाशिक जिल्ह्यातील मुंगसरा येथील भास्कर उगले यांची १२ एकर शेती आहे. मागील २० वर्षांपासून ते बाजारपेठेचा अंदाज घेऊन विविध भाजीपाला पिकांची लागवड करतात.
नाशिक जिल्ह्यातील मुंगसरा येथील भास्कर उगले यांची १२ एकर शेती आहे. मागील २० वर्षांपासून ते बाजारपेठेचा (Market) अंदाज घेऊन विविध भाजीपाला (vegetables) पिकांची (Crop) लागवड करतात. त्यात प्रामुख्याने टोमॅटो, भोपळा, कारले इत्यादी पिकांची लागवड असते. मागील ४ वर्षांपासून त्यांनी गिलके लागवडीस सुरुवात केली आहे. याशिवाय दीड एकरामध्ये त्यांनी द्राक्ष लागवड केली आहे.
भाजीपाला लागवडीतील कामांचे नियोजन भागीदार विनोद मते यांच्या मदतीने भास्करराव करतात. संपूर्ण भाजीपाला लागवडीचे तांत्रिक मार्गदर्शन प्रा. तुषार उगले यांचे घेतले जाते. भांडवल, मजुरांची उपलब्धता व बाजारपेठेची मागणी आदी बाबी विचारात घेऊन भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन केले जाते.
लागवड नियोजन :
– दोन टप्प्यांत प्रत्येकी १ एकरावर गिलके लागवडीचे नियोजन केले जाते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सप्टेंबर महिन्यात आणि ऑक्टोबर महिन्यात नियोजन केले जाते.
– लागवडीसाठी खासगी रोपवाटिकेत रोपे तयार करण्यासाठी दिली जातात. त्यानुसार दोन वेगळ्या वाणांचे बियाणे रोपवाटिकेत दिले जाते. त्यामुळे एक रोप साधारण दीड रुपयाला पडते. लागवडीसाठी एकरी साधारण १ हजार रोपे लागतात.
– गिलके लागवडीसाठी सप्टेंबर महिन्यात बेड तयार केले. बेडवर १८ः४८ः० हे खत १०० किलो, डीएपी १०० किलो आणि प्रोम २५० किलो प्रति एकर प्रमाणे बेसल डोस दिला.
– बेडवर सिंचनासाठी डबल इनलाइन ड्रीपरच्या नळ्या अंथरून त्यावर ३० मायक्रोन जाडीचा मल्चिंग पेपर पसरून घेतला.
– साधारण १४ दिवसांची रोपे रोपवाटिकेतून आणून त्यांची सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुनर्लागवड केली. दोन रोपांत साधारण ५ फूट अंतर राखले आहे.
– दोन टप्प्यांत लागवडीच्या नियोजनानुसार पहिल्या टप्प्यात सप्टेंबरअखेर आणि दुसऱ्या टप्प्यात ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लागवड केली.
– रोपांची उगवण झाल्यानंतर कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि सततच्या पावसामुळे काही रोपांची मर झाल्याचे आढळून आले. त्या जागी नवीन रोपांची पुनर्लागवड करून जागा भरून घेतल्या.
– पुनर्लागवडीनंतर १५ दिवसांनी वेलींना आधार देण्यासाठी ५ – ६ फूट उंचीच्या बांबूवर बांधलेले तारेचे मंडप उभारले. जेणेकरून वेलींच्या विस्तारास पुरेशी जागा उपलब्ध होईल आणि वेलींमध्ये मोकळी जागा राहील. तयार झालेल्या छोट्या वेली या तारांवर बांधून घेतल्या. लागवडीनंतर साधारण महिनाभरात वेल तारेवर पसरण्यास सुरुवात झाली.
– या वर्षी सततच्या पावसामुळे वेलीच्या वाढीच्या अवस्थेत विविध अडचणींचा सामना करावा लागला. वाढीच्या पुढील अवस्थेत वेल बगल काढून बांबूच्या साह्याने बांधणी करून घेतली. आठवड्यात २ वेळा मजुरांच्या साह्याने बांधणी करून घेतली.
– साधारणपणे २५ ते ३० दिवसांनंतर कळी लागण्यास सुरुवात झाली. त्या वेळी वेलींची अतिरीक्त फुटी कमी करून घेतल्या. फुलांची संख्या वाढविण्यासाठी अन्नद्रव्य व फवारणीचे योग्य नियोजन केले.
अन्नद्रव्ये व्यवस्थापन :
– पहिल्या १५ दिवसांपर्यंत १२:११.१८, १९:१९:१९ या दोन खतांची ५ दिवसांच्या अंतराने आळवणी केली.
– सततच्या पावसामुळे पिकांत मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता होती. त्यासाठी ट्रायकोडर्मा आळवणी केली.
– दर १५ दिवसांच्या अंतराने १२:६१:० हे विद्राव्य खत एकरी ३ किलो प्रमाणे ठिबकद्वारे दिले.
– आठवड्यातून १ वेळ मॅग्नेशिअम सल्फेट आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा दिल्या.
– वेलीच्या वाढीच्या अवस्थेत पावसाचे प्रमाण अधिक होते. या काळात वेलींची अतिरिक्त वाढ आणि दोन पेऱ्यांत अंतर वाढण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ०:५२:३४ आणि बुरशीनाशकांची फवारणी केली. जेणेकरून दोन पेऱ्यांतील अंतर, पानांचा आकार व शेंड्याची वाढ मर्यादित राहील.
– मादी फुलांची संख्या वाढण्यासाठी शिफारशीत संजीवकाची फवारणी केली.
– पांढरी मुळी कार्यक्षम होण्यासाठी आणि रोपांच्या मुळांजवळ हवा खेळती राहण्यासाठी रोपांच्या बुडांजवळील चिकट माती वेळोवेळी मोकळी केली.
– कॅल्शिअम, बोरॉन, झिंक या अन्नद्रव्यांच्या गरजेनुसार फवारणीद्वारे वापर केला.
एकात्मिक कीड व्यवस्थापन :
– परागीभवन क्रियेमध्ये मधमाशा महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे मधमाश्यांना हानिकारक असलेल्या रासायनिक फवारण्या करणे टाळले.
– पिकावर मुख्यतः भुरी रोग, फळमाशी, नागअळी आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आला.
– फळमाशी नियंत्रणासाठी एकरी १० प्रमाणे कामगंध सापळे लावले.
– पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे एकरी २५० प्रमाणे लावले.
– बदलत्या वातावरणमुळे पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव येण्याची शक्यता होती. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शिफारणीप्रमाणे फवारणी केली.
विक्री नियोजन :
– लागवडीनंतर साधारण ४५ ते ५० दिवसांनी गिलके तोडणीस तयार होतात.
– सध्या सप्टेंबर लागवडीतील गिलके तोडणी सुरू आहे. एक दिवसाच्या अंतराने तोडे सुरू असून, आतापर्यंत ३ ते ४ तोडे झाले आहेत.
– प्रति तोडा साधारण १५ ते २० क्रेट गिलके उत्पादन मिळाते आहे.
– तोडे झाल्यानंतर मालाची प्रतवारी केली जाते. प्रतवारी करताना प्रामुख्याने गिलक्यांची लांबी आणि जाडी या बाबी विचारात घेतल्या जातात.
– हाताळणी आणि वाहतुकीवेळी गिलके क्रेटला घासून खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे गिलक्यांची चमक आणि हिरवागारपणा कमी होतो. अशा मालास चांगले दर मिळत नाहीत. त्यासाठी प्रतवारी झाल्यानंतर क्रेटमध्ये गिलके भरतेवेळी वर्तमानपत्र टाकले जाते. जेणेकरून माल घासून खराब होणार नाही.
– संपूर्ण मालाची विक्री नाशिक येथील बाजारामध्ये होते. यावर्षी प्रतिक्रेट साधारण २०० ते २५० किलो दर मिळत आहे.
– भास्कर उगले, ८२७५२७३६६८