कृषी महाराष्ट्र

Soybean rate: सोयाबीन शंभर रूपयांनी वाढण्याची शक्यता ? मलेशियात पामतेलाच्या किंमतीत सुधारणा

Soybean rate: सोयाबीन शंभर रूपयांनी वाढण्याची शक्यता ? मलेशियात पामतेलाच्या किंमतीत सुधारणा

 

सध्या सोयाबीनच्या दरात किंचत घट झालेली आहे. परंतु शेतकरी माल रोखून ठेवत टप्प्याटप्प्याने माल बाजारात आणत आहेत. त्यामुळे बाजारावर आवकेचा दबाव नाही.

सोयाबीन उत्पादक (Soybean Farmer) शेतकऱ्यांना सध्या एकाच गोष्टीची चिंता आहे. ती म्हणजे सोयबीनचे भाव (Soybean Rate) काय राहतील? सोयाबीनमध्ये तेजी येईल की दरात आणखी घट होईल, याबद्दल त्यांना अनेक प्रश्न पडलेले आहेत. त्यातच सोशल मिडियावर शेंडा बुडखा नसलेल्या बातम्यांचा रतीब पडत असल्याने शेतकऱ्यांचा संभ्रम आणखी वाढलाय.

तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आठवडाभरात सोयाबीनचे भाव प्रति क्विंटल सुमारे शंभर रूपयांनी वाढण्याची शक्यता आहे. सध्या सोयाबीनच्या दरात किंचत घट झालेली आहे. परंतु शेतकरी माल रोखून ठेवत टप्प्याटप्प्याने माल बाजारात आणत आहेत. त्यामुळे बाजारावर आवकेचा दबाव नाही. तसेच मलेशियात पामतेलाच्या किंमतीत सुधारणा झाली आहे. त्यामुळे आठवडाभरात सोयाबीनचे दर सुधारण्याचा अंदाज आहे.

यंदाच्या हंगामात सोयाबीनची आवक सुरू झाली तेव्हा दर दबावात होते. आवक सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यामध्ये सोयाबीन सुमारे १५ टक्के घसरले. काही बाजारपेठांमध्ये चार हजार रूपये क्विंटल भाव सोयाबीनला मिळाला. सोयाबीनचा हमीभाव ४३०० रूपये आहे. परंतु नंतरच्या टप्प्यात शेतकऱ्यांनी आपला माल बाजारात नेणे बंद केले आणि साठवणूक करू लागले. त्यामुळे पुढील तीन आठवड्यात सोयाबीन परत साडेपाच-सहा हजाराजवळ पोहोचले. परंतु गेल्या काही दिवसांत सोयाबीनचे दर परत किंचित कमी झाले.

गेल्या आठवडाभरात इंदूर मार्केटला सोयाबीनचे दर ५६९८ रूपयांवरून ५५३४ रूपयांवर आले. तर अकोला मार्केटला सोयाबीन ५८५८ वरून ५६१८ रूपयांवर आले. काही मार्केटमध्ये दर ५४०० रूपयांवरही पोहोचले होते. परंतु या दरपातळीवत आता शंभर रूपयांची वाढ होऊ शकते, असे जाणकारांनी सांगितले. कारण शेतकरी हुशारीने माल रोखून ठेवत असल्याने बाजारात आवक वाढत नाही. त्यामुळे प्रक्रिया उद्योजकांची गोची झाली आहे. त्यामुळे त्यांनी वाढीव किंमतीला सोयाबीन खरेदी सुरू केली आहे. त्याचा बाजारावर सकारात्मक परिणाम जाणवेल.

तसेच मलेशियात पामतेलाच्या किंमतीत ३ टक्के वाढ झाली आहे. क्रुड ऑईल म्हणजे कच्च्या तेलाच्या किंमतीतील घसरणही थांबली आहे. सोयाबीनचे क्रशिंग केल्यानंतर सोयापेंड आणि सोयातेल ही उत्पादने तयार होतात. या उत्पादनांना जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेत किती मागणी आहे, त्यांची दरपातळी काय आहे, यावर सोयाबीनचे दर ठरतात. सोयातेलाची थेट स्पर्धा पामतेलाशी असते. त्यामुळे पामतेलाचे दर वाढले की सोयाबीनला थेट फायदा होतो.

सोयापेंड निर्यातीच्या बाबतीत मात्र फारसं उत्साहाचं चित्र नाही, असं जाणकारांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वी सोयापेंडच्या किंमतीत पडतळ आल्यामुळे निर्यातीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी निर्यातीसाठी करार झाले. परंतु नंतर मात्र निर्यात करारांत फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळे सोयाबीनला सोयापेंडीच्या आघाडीवर फारसा आधार सध्या मिळत नाहीयै. त्यामुळे सोयाबीनच्या दरातील वाढ मर्यादीत राहिल.

थोडक्यात सोयाबीनचे दरात फार पडझड होणार नाही, तसेच मोठी तेजीही येणार नाही; तर आठवडाभरात सोयाबीनच्या दरात शंभर रूपयांची वाढ होईल, असे जाणकारांनी सांगितले. शेतकऱ्यांनी पाच हजार ते सहा हजाराच्या भावपातळीवर लक्ष ठेऊन टप्प्याटप्प्याने माल विकणे फायदेशीर ठरेल, असे त्यांनी सांगितले.

source: agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top