कृषी महाराष्ट्र

Tur Wilt Disease : तूर पीका वरील मर रोग नियंत्रण कसे करावे ?

Tur Wilt Disease : तूर पीका वरील मर रोग नियंत्रण कसे करावे ?

Tur Wilt Disease

मराठवाडा विभागात काही ठिकाणी तूर पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येते आहे. तूर पीक सध्या वाढीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच फुले लागण्याच्या व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. तूर पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून ते फुले व शेंगा येईपर्यत होतो. हा रोग फ्युजारियम उडम बुरशीमुळे होतो. जमिनीचे तापमान २५ ते २८ अंश सेल्सिअस व ओलावा २० ते २५ टक्के असल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. शेंगा पक्व होण्याच्या कालावधीत प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात ३० ते ४० टक्के घट येते. या राोगाची लक्षणे आणि नियंत्रणाविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील पीक संरक्षण तज्ज्ञ डॉ. आनंद दौंडी यांनी दिलेली माहिती पाहूया.

लक्षणे काय आहेत ?

झाडांना कळ्या लागल्यापासून ते फुलोरा येण्याच्या काळात या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. प्रथम झाडाची शेंड्याकडील पाने कोमेजतात. कालांतराने पाने पिवळी पडून जमिनीकडे झुकतात. काही झाडांवरून जमिनीपासून खोडा पर्यंत तपकिरी रंगाचा पट्टा दिसून येतो हे रोग ओळखण्याचे मुख्य लक्षण आहे. फांद्या शेंड्याकडून खाली वाळतात.

नियंत्रण कसे करावे ? Tur Wilt Disease

पेरणीसाठी रोगप्रतिकारक्षम वाणांची निवड करावी. बीएसएमआर – ७३६, बीएसएमआर – ८५३ आणि विपुला, राजेश्वरी हे वाण मर रोग प्रतिकारक्षम आहेत. आयसीपी २३७६ हा वाण नर्सरीमध्ये मर रोगाला १०० % बळी पडणारा आहे त्यामुळे या वाणाची पेरणी करू नये. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्याला १ ते १.५ ग्रॅम कार्बेन्डाझिम अधिक २ ते २.५ ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी. यानंतर शिफारशीत बियाण्याला ६ ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी.

ज्या शेतामध्ये पूर्वी मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला असेल अशा शेतात या पिकाची लागवड पाच ते सहा वर्षांपर्यंत करू नये. शेतामध्ये मर रोगाची रोगट झाडे दिसताच त्वरित उपटून टाकावी. तूर लागवडीच्या क्षेत्रात तृणधान्यांसारखी फेरपालटीची पिके घ्यावीत. या रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करुनच प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येते. त्यामुळे लक्षात ठेवा पिकाली पेरणी करण्यापूर्वी बियाण्याला शिफारशीनूसार बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया जरुर करावी. तरच या रोगावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे.

घातक अशा मर रोगाचा तूर पिकावर प्रादुर्भाव झाल्यास नियंत्रणात्मक प्रभावी उपाय नाहीत, तर प्रतिबंधात्मक उपायांतही अनेक अडचणी आहेत.

तूरीच्या मुक्त आयातीच्या (Tur Import) धोरणाला केंद्र सरकारने दिलेल्या एक वर्षाच्या मुदतवाढीची आणि त्याचा दरावर होणाऱ्या परिणामाची चर्चा सुरू असतानाच तुरीवरील वाढत्या रोगांच्या प्रादुर्भावाने उत्पादकांना हैराण करून सोडले आहे. मराठवाडा विभागात तुरीवर फायटोप्थोरा ब्लाइट (Phytopthera Blight) रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भावाची बातमी डिसेंबर शेवटी आली होती. या भागात हा रोग शेतनिहाय ५ ते ५० टक्क्यांपर्यंत पसरला होता.

आता विदर्भातील अमरावती विभागात पाच प्रमुख तूर उत्पादक जिल्ह्यांत जवळपास १५ टक्के, म्हणजे ७५ हजार हेक्टरवर मर रोगाचा प्रादुर्भाव होऊन फुले-शेंगा लागण्याआधी तर काही ठिकाणी लागल्यावर तुरीची उभी झाडे वाळत आहेत.

याला ग्रामीण भागात ‘तुरीला उधळी लागली’ असेही म्हणतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात तुरीचे नुकसान होऊनही या क्षेत्राचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीत आधीच सर्व्हेक्षण झाल्याने दुसऱ्यांदा भरपाई मिळणार नाही, असा दावा कृषी विभाग करीत आहे.

अतिवृष्टीत मिळणारी मदत अतिशय तुटपुंजी असते. बऱ्याच नुकसानग्रस्तांपर्यंत ती पोहोचत देखील नाही.

गेल्या वर्षीदेखील ३० टक्के तूर क्षेत्राला मर, वांझ रोगाचा प्रादुर्भाव होऊन उत्पादन घटले होते. त्यामुळे फायटोप्थोरा, तसेच मर रोगामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत तत्काळ द्यायला हवी.

मुळात तुरीचे उत्पादन खूपच कमी मिळते. त्यात मर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यावर हाती काहीच लागत नाही. अशावेळी तूर उत्पादकांना शासकीय मदतीचा आधार मिळायलाच हवा.

तुरीसह हरभरा, टोमॅटो, कापूस, बटाटा, केळी, डाळिंब अशा अनेक पिकांवर मर रोग आढळून येतो. तुरीवरील मर रोगाची फ्युजारियम बुरशी मातीत वास्तव्य करून राहते. रोगाची सुरुवात जमिनीत होऊन बुरशीचे कवकतंतू मुळांवाटे झाडांच्या अन्ननलिकेत शिरतात.

अन्ननलिकेतून अन्नपाणी घेणे बंद होते. त्यामुळे रोगग्रस्त झाडांची पाने पिवळी पडून झाड वाळते. पिकांचे १०० टक्के नुकसान करणारा हा रोग आहे. घातक अशा मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास नियंत्रणात्मक फारसे प्रभावी उपाय नाहीत.

त्यामुळे शेतात प्रादुर्भाव दिसणे सुरू झाले म्हणजे रोगट झाडे उपटून टाकावीत, असा सल्ला शेतकऱ्यांना दिला जातो. बाकी सर्व उपाय प्रतिबंधात्मक आहेत.

त्यामध्ये पिकांची फेरपालट करा, असे सांगितले जाते. परंतु या रोगाची बुरशी दोन ते तीन वर्षे शेतात-मातीत राहते. त्यामुळे रोगट झाडे उपटणे आणि पिकांची फेरपालट हे उपायही परिणामकारक ठरत नाहीत.

पीक फेरपालट करायची असेल, तर तुरीचे तसेच फ्युजारियम बुरशीचा प्रादुर्भाव होईल असे कोणतेही पीक चार वर्षांपर्यंत घेतले गेले नाही पाहिजेत.

त्यामुळे हा उपाय शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष अवलंबला जाणे कठीणच आहे. शेतकरी फारतर एखाद्या वर्षी पीक फेरपालट करू शकतात. तुरीमध्ये ज्वारी, बाजरी, मका यांसारखी आंतरपिके घेतल्यास रोगाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. Tur Wilt Disease

हा उपाय शेतकऱ्यांनी अवलंबण्यासारखा असून, त्यावर त्यांनी त्वरित अमल करावा. तूर घ्यायचे ठरलेल्या शेतात उन्हाळ्यात खोल नांगरट करून जमीन चांगली तापू देणे, मर रोग प्रतिकारक वाणांची निवड करणे आणि कार्बेन्डाझिम, ट्रायकोडर्मा यांची बीजप्रक्रिया हे प्रतिबंधात्मक पर्याय आहेत.

अलीकडे मररोग प्रतिबंधक जातीसुद्धा या रोगास बळी पडताना दिसतात. तसेच तुरीसाठी घरचे बियाणे वापरणारे शेतकरीदेखील माहितीअभावी बीजप्रक्रिया करण्याचे टाळतात.

असा हा सगळा तुरीवरील मर रोगाचा गुंता असून, त्यात उत्पादक गुरफटला जात आहे. चार वर्षांपूर्वी जगभरातील तुरीच्या २९२ जातींच्या गुणसूत्रांचा अभ्यास करण्यात आला. त्यात तुरीमधील वांझ आणि मर या रोगांस कारणीभूत गुणसूत्रेही शोधण्यात आली. Tur Wilt Disease

त्यातून तुरीच्या कमी कालावधीच्या, मर-वांझ रोगांस हमखास प्रतिकारक तसेच अधिक उत्पादनक्षम जाती शेतकऱ्यांना उपलब्ध होतील, असा विश्‍वास शेतकऱ्यांना देण्यात आला. देशभरातील तूर उत्पादक अशा तूर जातींच्या प्रतीक्षेत आहे.

Tur Wilt Disease

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top