रब्बी पीक व्यवस्थापनात करण्याचे काही बदल : वाचा सविस्तर
रब्बी पीक
मराठवाडयात दिनांक २० ते २६ जानेवारी दरम्यान किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलावा किंचित कमी झालेला आहे.
कधी ढगाळ वातावरण तर कधी कडक ऊन, कधी धुके तर कधी थंडी या वातावरणातील सततच्या बदलामुळे पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे.
त्यामुळे रबी पिकामध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठाने सुचविलेल्या पुढील उपाययोजना कराव्यात.
कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर पालापाचोळा, पराट्या जमा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी. कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड म्हणजेच खोडवा घेऊ नये.
काढणी केलेल्या तूरीची वाळल्यानंतर मळणी करून सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. वेळेवर लागवड केलेल्या व काढणीस तयार असलेल्या रब्बी भुईमूग पिकाची काढणी करून घ्यावी.
उशीरा पेरणी केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट (५ टक्के) ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम (११.७ एससी) ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी.
फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.
रब्बी ज्वारी पिकास फुलोरा येण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर ७० ते ७५ दिवस) व कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर ९० ते ९५ दिवस) पाणी द्यावे.
उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट (५ टक्के) ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम (११.७ एससी) ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.
फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.
वेळेवर लागवड केलेल्या व काढणीस तयार असलेल्या रब्बी सूर्यफुल पिकाची काढणी करून घ्यावी.
गहू पिकाला कांडी धरण्याच्या अवस्थेत पेरणी नंतर ४० ते ४५ दिवस व पिक फुलोऱ्यात असताना पेरणीनंतर ६५ ते ७० दिवस पाणी द्यावे.
गहू पिकावरील तांबेरा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनेझोल (२५ % ईसी) १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
उन्हाळी भुईमूग पिकाच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावीत. उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी ८ फेब्रुवारी पर्यंत करता येते.
Source: agrowon.com