पर्यावरणपूरक व शाश्वत शेतीसाठी आंतरपीक पद्धती फायद्याची : वाचा संपूर्ण माहिती
पर्यावरणपूरक व शाश्वत
Indian Agriculture : फ्रान्स येथील शाश्वत विकासासाठी कृषी संशोधन संस्था (CIRAD) ही संस्था आणि १४ युरोपिय देशातील २७ संस्थांनी एकत्रितरीत्या एका भव्य कृषी संशोधन प्रकल्पाची आखणी केली आहे.
त्याचे नाव इंटरक्रॉप व्हॅल्यू ईएस (Intercrop ValuES) असे आहे. त्यामध्ये आंतरपीक पद्धतीतून पिकांची उत्पादकता वाढवणे, शेतीमध्ये विविधता आणणे, शाश्वतता आणणे, पर्यावरणपूरक पीक पद्धतीने नफ्याचे प्रमाण वाढवणे यावर भर देण्यात येत आहे.
अन्न उत्पादनात अनेक आव्हाने निर्माण होत आहेत. त्यात जमीन, पाणी आणि अन्य निविष्ठा असे आवश्यक स्रोतांवर मर्यादा येत आहेत. उपलब्ध जमिनीमध्ये एकापेक्षा अधिक पिकांचे उत्पादन घेण्यासाठी पारंपरिकरीत्या आंतरपीक पद्धतीचा अवलंब केला जातो.
वेगवेगळी धान्ये विशेषतः शेंगावर्गीय पिकांचा समावेश नेहमीच्या पिकांमध्ये केला जातो. त्याविषयी माहिती देताना सिराड संस्थेतील कृषी तज्ज्ञ आणि प्रकल्प समन्वयक एरिक जस्टेस यांनी सांगितले, की युरोपमधील शेती ही बहुतांश एकल पीक पद्धतीकडे वळली होती.
त्यातच रासायनिक खतांचा वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे. जरी शास्त्रीयदृष्ट्या आंतरपीक पद्धती ही कृषी व पर्यावरण दोन्ही दृष्टीने अधिक योग्य असली, तरी शेतकऱ्यांना या पद्धतीकडे वळविणे अत्यंत अवघड गोष्ट आहे.
कारण एकल पीक पद्धतीच्या दृष्टीने लागवड आणि व्यवस्थापन पद्धतींची एक घडी बसलेली आहे. पिकाच्या मूल्यवर्धन साखळीतील उत्पादन, प्रक्रिया किंवा बाजारपेठेतील सर्व घटक हे एकल पीक पद्धतीच्या अनुषंगाने विकसित झालेले आहे.
अशा स्थितीमध्ये एकापेक्षा अधिक पिकांच्या आंतरपीक पद्धती ही अधिक गुंतागुतींची आणि खर्चिक वाटू लागते. Sustainable Agriculture
शेतकरी व सर्व घटकांना आंतरपीक पद्धतीची वैशिष्ट्ये आणि फायदे समजून देण्याच्या उद्देशाने सिराड संस्थेच्या वतीने चार वर्षाचा ‘इंटरक्रॉप व्हॅल्यू ईएस’ हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
या प्रकल्पासाठी ७.४ दशलक्ष युरो इतका आर्थिक निधी युरोपीय युनियनच्या ‘होरायजन युरोप प्रोग्रॅम’ अंतर्गत देण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये युरोप, आफ्रिका आणि आशिया (चीन) खंडातील वेगवेगळ्या २७ संशोधन संस्थांमध्ये चाचण्या करण्यात येणार आहेत.
नावीन्यासाठी १३ केसस्टडीज् :
मूळ पिकांच्या व्यवस्थापनासोबतच त्याला नत्राची उपलब्धता करणे, तणाचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यास मदत करणे या उद्देशाने वेगवेगळ्या पिकांमध्ये चाचण्या केल्या जात आहेत. ऊस पिकामध्ये वाल पीक, मक्यामध्ये चवळी किंवा भुईमूग किंवा शाबुकंद अशा आंतरपिकांचा अंतर्भाव केला.
युरोपातील जर्मनी, डेन्मार्क, फ्रान्स, इटली, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, ब्रीटन अशा प्रगत देशांमध्ये किंवा मोझांबिकसारख्या आफ्रिकन अशा १० देशांमध्ये या पिकांचे उत्पादकता तपासण्यात येत आहे.
आधुनिक शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करतानाच पिकांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी यंत्र, अवजारांचा वापर वाढवला जात आहे. यंत्रांचा वापर स्वस्त करण्यासाठी सहकारी तत्त्वावरील यंत्रे, अवजारे बॅंका या संकल्पना राबविण्यात येत आहे.
संशोधन, प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षण :
या संशोधन आणि प्रयोगाचे निष्कर्ष प्रथम सर्व शास्त्रज्ञांच्या समुदायामध्ये प्रसारित केले जातील. त्यानंतर स्थानिक पातळीवर कार्यरत शेती विकासामध्ये कार्यरत गट (शेतकरी, शेतीसल्लागार, प्रक्रिया उद्योग, यंत्रे उत्पादक व अन्य आवश्यक) त्यामध्ये समाविष्ट केले जातील.
त्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रात्यक्षिक पीक, प्रशिक्षण मोड्यूल्स किंवा विशेष कार्यक्रमांची आखणी केली जाणार आहे. राष्ट्रीय आणि धोरणकर्त्यांच्या पातळीवरही आंतरपिकांसंदर्भात जागृती करण्यात येणार आहे.
त्यामुळे आंतरपिकांसाठी योग्य ते नियमावली आणि अनुदान उपलब्ध होऊ शकेल, असे एरिक जस्टेस यांनी सांगितले.
source : agrowon