कृषी महाराष्ट्र

जमीन सुपीकतेसाठी हिरवळीच्या खतां विषयी संपूर्ण माहिती

जमीन सुपीकतेसाठी हिरवळीच्या खतां विषयी संपूर्ण माहिती

जमीन

Green Manuring Crop : हिरवळीचे खत तयार करण्यासाठी प्रामुख्याने धैंचा, बोरू, शेवरी, बरसीम, सुबाभूळ, गिरिपुष्प, चवळी, मूग इत्यादी हिरवळीच्या पिकांची लागवड केली जाते.

हिरवळीची पिके फुलोरा येण्यापूर्वी जमिनीत गाडल्यापासून मुख्य अन्नद्रव्ये आणि सेंद्रिय घटकांचा पुरवठा जमिनीस होतो. जमिनीचा पोत टिकविणे आणि उत्पादन वाढविण्यासाठी हिरवळीची खते महत्त्वाची आहेत.

हिरवळीच्या खतांची कार्यशक्ती

सर्वसाधारणपणे १ टन हिरवळीचे किंवा शेंगवर्गीय पिकापासून बनलेले खत हे २.८ ते ३ टन शेणखत किंवा ४.५ ते ४.७ किलो नत्र किंवा १० किलो युरियाच्या बरोबर असते. म्हणजेच २४ ते ३० किलो नत्राचा पुरवठा करण्यासाठी ६ टन हिरवळीचे खत प्रति हेक्टरी वापरावे लागते.

हिरवळीच्या खतांचे गुणधर्म

– प्रति हेक्टर सुमारे ५० ते १७५ किलो नत्र उपलब्ध होते.

– जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढतो.

– मातीची पाणी व अन्नद्रव्ये धरून ठेवण्याची क्षमता वाढते. उपयुक्त सुक्ष्मजीवांचे प्रमाण वाढते.

– जमिनीची भौतिक स्थिती सुधारते. अन्य मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध होण्यास मदत होते.

– हिरवळीच्या खतांच्या मर्यादा : लागवडीसाठी क्षेत्र, कालावधी व पाण्याची उपलब्धता आवश्यक असते. बियांचा खर्च वाढतो. आंतरपीक म्हणून घेताना मुख्य पिकांशी स्पर्धा करू शकतात.

हिरवळीच्या खतांचे फायदे

– यामध्ये ह्यूमस असते, त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो.

– या खतामधील सेंद्रिय द्रव्यांमुळे जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंना अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. परिणामी जिवाणूंची वाढ भरपूर होऊन त्यांची कार्यशक्ती जोमाने वाढते. जमिनीतील पोषक द्रव्ये रासायनिक क्रियेने विरघळून ती पिकांना सुलभ स्थितीत प्राप्त होतात.

– लवकर कुजणारी हिरवळीची खते वापरल्यामुळे एकूण नत्र, उपलब्ध स्फुरदाचे प्रमाण आणि अझोटोबॅक्टर सारख्या जीवाणूंचे प्रमाण वाढते.

– जमिनीत टिकून राहणाऱ्या कणसमूहांचे प्रमाण वाढते.

– जमिनीची जलधारणा क्षमता वाढते. पावसाच्या पाण्यामुळे होणारी जमिनीची धूपही कमी होते.

– सेंद्रिय पदार्थांमुळे माती रवेदार होण्यास मदत होते. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत साचून न राहता त्याचा निचरा लवकर होतो. हलक्या जमिनीत देखील सेंद्रिय पदार्थांमुळे पाणीधारण करण्याची क्षमता वाढते.

– द्विदल वर्गातील हिरवळीची पिके ही हवेतील नत्र शोषून घेतात. हे नत्र जमिनीत साठविले जाऊन ते पुढील पिकांना उपलब्ध होते.

– क्षारपड जमिनीत हिरवळीचे पीक गाडण्यामुळे क्षार कमी होऊन त्या जमिनी लागवडीखाली येतात.

– ही पिके जमिनीत असेंद्रिय स्फुरदाचे सेंद्रिय स्फुरदात रूपांतर करतात. जमिनीतील स्फुरदाची उपलब्धता वाढवितात.

– पिकांच्या दाट वाढीमुळे तणांचे नियंत्रण होण्यास मदत होते. Green Manuring Update

हिरवळीचे खत वापरायची पद्धत

– आपल्याला ज्या शेतात हिरवळीचे खत द्यायचे आहे, त्यामध्ये हिरवळीच्या पिकाची मे-जून महिन्यात पेरणी करावी किंवा बियाणे फेकून द्यावे. बियाणाचे प्रमाणे दीडपट जास्त वापरावे. जेणेकरून पीक दाट येईल.

– हिरवळीच्या पिकात हेक्टरी २० ते २५ किलो नत्र स्थिरीकरणाची प्रक्रिया जोमाने होते. अशा प्रकारे लावलेल्या पिकांची पर्णीय वाढ झाल्यावर फुलो­ऱ्यात येण्याआधी म्हणजे पेरणीपासून ६ ते ८ आठवड्यांसाठी ते पीक नांगरून जमिनीत गाडावे, शेतात पाणी द्यावे. त्याचे पूर्ण विघटन झाल्यावर पुढील रब्बी पिकाची वेळेवर पेरणी करावी.

– हिरवळीचे पीक आंतरपीक म्हणून देखील घेता येते. उदा. कापूस, मका व फळबागेत ताग, धैंचा, बरसीम, चवळी ही हिरवळीची पिके आंतरपीक म्हणून पेरून ६ ते ८ आठवड्यांनी जमिनीत गाडून टाकावीत. हिरव्या पानांचा वापर करावयाचा असल्यास या पिकांची बांधावर किंवा पडीक जमिनीत लागवड करावी. हिरवी कोवळी पाने गोळा करून ती पूर्व मशागतीच्या वेळी जमिनीत मिसळावीत.

डॉ. पपिता गौरखेडे, ८००७७४५६६६, (अ.भा.स. कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top