Kharif Sowing : मॉन्सूनच्या तोंडावर शेतकऱ्यांची लगबग वाढली
Kharif Sowing
Wardha Kharif Sowing News : शेतकऱ्यांची खरीपपूर्व मशागतींची कामे पूर्णत्वास आली असून, आता त्याला पेरणीचे वेध लागले आहेत. पाऊस येताच पेरणी उरकायची, या आशेत असलेल्या शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदीची लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यात गत आठवडाभरात कपाशीच्या एक लाख पाकिटांची उचल शेतकऱ्याकंडून करण्यात आली आहे.
यंदा जिल्ह्यात खरीप हंगामात ४ लाख ३३ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात सर्वाधिक दोन लाख १५ हजार हेक्टरवर कापूस, तर एक लाख ३५ हजार हेक्टरवर सोयाबीनच्या पेरणीचे नियोजन आहे.
प्रस्तावित नियोजनाप्रमाणे विविध पिकांचे ६४ हजार क्विंटल बियाणे जिल्ह्याला लागणार आहे. त्यासाठी कृषी विभागाकडून बियाणे तसेच खतांची उपलब्धता करून दिली असल्याचे सांगण्यात आले.
आतापर्यंत जिल्ह्यातील कृषी केंद्रांमधून एक लाख कपाशी पाकिटांची, तर दोन हजार क्विंटल सोयबीन बियाण्यांसह तुरीच्या ५० किलो तुरीच्या बियाण्यांची उचल करण्यात आली आहे. सोयाबीन बियाण्यांची ५६ हजार क्विंटलची मागणी केली होती. Sowing
मागणीपेक्षा अधिक म्हणजेच ५८ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. खतेही पुरेशा प्रमाणात असून १५ हजार टनांचा साठा जिल्ह्यासाठी आजघडीला उपलब्ध आहे. पैकी अडीच हजार टन खतांची उचल शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. गुलाबी बोंडअळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एक जूनपर्यंत या बियाणे विक्रीवर बंदी होती.
यामुळे एक जूननंतर बियाणे विक्रीला सुरुवात झाली. बियाण्यांची उचल झाल्याने अनेकांकडून पाऊस येण्यापूर्वीच लागवड करण्यात आल्याचा अंदाज आहे. यामुळे शासनाने बियाणे विक्री बंदीचा निर्णय येथे सपशेल नापास ठरण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा प्रयत्न
बोंड अळीला आळा घालणारे वाण म्हणून बीजी-३ या कपाशी बियाण्यांची चर्चा जोरात आहे. हे वाण प्रतिबंधित आहे. असे असताना शेतकऱ्यांना त्याबाबत अनेकांकडून माहिती देण्यात येत आहे. शिवाय काही ठिकाणी छुप्या मार्गाने त्याची विक्री करण्यात येत आहे.
यातून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. प्रमाणित केलेल्या वाणाची लागवड शेतकऱ्यांनी करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
source : agrowon