Vegetable Inflation : धान्य, भाजीपाला महागाईचा शेतकऱ्यांना फायदा होतोय का ? वाचा सविस्तर
Vegetable Inflation
Pune News : देशातील बहुतांशी भागात माॅन्सून दाखल व्हायचायं. पेरण्याही रखडल्या. खरिपाची पेरणी आतापर्यंत ४२ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. यामुळे डाळींसह धान्याच्या भावात सुधारणा झाली आहे. गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, तूर आणि उडीद डाळीचे भाव महिनाभरात ५ ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत.
पण या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. कारण कडधान्य आणि धान्य शेतकऱ्यांनी आधीच विकले. अगदी मोजक्या शेतकऱ्यांकडे माल आहे. तर भाजीपाल्याचे उत्पादन घटल्याने आर्थिक फटका बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
माॅन्सूनचा पाऊस लांबल्याने देशात अन्नधान्याच्या दरात सुधारणा झाली. गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, डाळीचे भाव वाढले आहेत. विशेष म्हणजे गहू आणि डाळींचे भाव नियंत्रणात राहावे यासाठी सरकारने मोठे प्रयत्न केले. पण भाव कमी होण्याचं नाव घेईना.
जून महिन्याचा शेवटचा आठवडा आला तरी देशातील बहुतांशी भागात पाऊस नाही. चक्रीवादळामुळे राजस्थान, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील काही भागात पाऊस झाला. आसामध्ये पूरस्थिती आहे. पण माॅन्सून या भागात पोचलेला नाही. बिपरजाॅय चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे ही स्थिती निर्माण झाली. Vegetable Inflation
खरिपातील पेरण्यांचा विचार करता गती मंदावलेलीच आहे. आजपर्यंत म्हणजेच २३ जून रोजी देशात ७९ लाख हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला. मागीलवर्षी म्हणजेच २३ जून २०२२ रोजी देशात १३६ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. याचाच अर्थ असा की गेल्यावर्षीपेक्षा यंदाची पेरणी तब्बल ४२ टक्क्यांनी पिछाडीवर आहे.
भात उत्पादनासाठी खरिप हंगाम महत्वाचा असतो. पण आतापर्यंत भाताची लागवड ३५ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. गेल्याहंगामापेक्षा आतापर्यंत ६ लाख हेक्टरने क्षेत्र कमी असून जवळपास ११ लाख हेक्टरवर भाताची लागवड झाली.
भरडधान्याची लागवडही जवळपास १८ लाख हेक्टरवर झाली असून गेल्यावर्षीपेक्षा ३८ टक्क्यांनी कमी आहे. कडधान्यामध्ये तुरीची लागवड तब्बल ६६ टक्क्यांनी कमी आहे. गेल्या हंगामात याच काळात १ लाख ८० हजार हेक्टरवर तुरीचे पीक होते. पण यंदा केवळ ६२ हजार हेक्टरवर लागवड झाली.
अशी झाली वाढ
खरिपातील भात आणि भरडधान्य पिकांची लागवड पिछाडीवर आहे. त्यातच बहुतांशी भागात पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे डाळींसह धान्याच्या दरात वाढ झाली आहे. ही वाढ ५ ते १५ टक्क्यांपर्यंत आहे.
सरकारने गव्हावर स्टाॅक लिमिट लावले पण असं असूनही गव्हाच्या भावात घट झाली नाही. तर तुरीचे भाव एक जूनपासून वाढलेले दिसतात. बहुतांशी बाजारात तुरीचे भाव १० हजार ५०० रुपयांवर पोचले. तर डाळीने अनेक ठिकाणी १५० रुपयांचा टप्पा गाठला.
उडदाची डाळही ११० ते १२० रुपयांच्या दरम्यान आहे. ज्वारीच्या भावात अनेक बाजारांमध्ये मागील एक महिन्यात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. तर बाजरीच्या भावातही २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली. Vegetable Inflation
शेतकऱ्यांना फायदा मिळतोय का ?
पाणी टंचाईमुळे भाजीपाला उत्पादनातही घट झाली. त्यामुळे अगदी दोन आठवड्यांपुर्वी मंदीत असलेला टोमॅटो आता भाव खातोय. पालेभाज्यांचे भावही चांगलेच वाढले. पण या सर्व भाववाढीत शेतकऱ्यांचा फायदा होतो असे नाही.
कारण भाजीपाल्याचे उत्पादन घटल्याने भाव वाढले. म्हणजेच उत्पादन घटीचा फटका शेतकऱ्यांना बसला. तर तूर, उडीद, गहू, ज्वारी, बाजरी शेतकऱ्यांनी आधीच विकले आहे. अगदी मोजक्याच शेतकऱ्यांकडे माल असू शकतो. म्हणजेच या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही.
पावसाकडे लक्ष
देशातील बहुतांशी भागात जूनच्या शेवटी पाऊस सुरु होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला. पण हवामानात बदल झाल्यास त्यात बदलही होऊ शकतो. तसेच पेरणीयोग्य पाऊस कधी पडेल, याची चिंता शेतकऱ्यांना लागून आहे.
चांगला पाऊस होऊन खरिपाच्या पेरण्या सुरु होईपर्यंत तरी दरातील वाढ कायम राहील. त्यानंतर उत्पादन किती होते, याकडेही बाजाराचे लक्ष राहील, असे अभ्यासकांनी सांगितले.
source : agrowon