कृषी महाराष्ट्र

वायद्यांमध्ये कापूस भाव सुधारले : बाजार समित्यांमध्ये कायम ! वाचा सविस्तर

वायद्यांमध्ये कापूस भाव सुधारले : बाजार समित्यांमध्ये कायम ! वाचा सविस्तर

कापूस भाव

Cotton Update : आंतरराष्ट्रीय बाजारात आज कापूस दरात काहीशी नरमाई दिसली. देशातील वायद्यांमध्ये मात्र आज कापूस भावात सुधारणा झाली होती. पण बाजार समित्यांमधील भावपातळी आजही ७ हजार ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान होती. तर कापूस आवकेचा दबाव आजही दिसला.

देशातील बाजारात कापूस आवक आजही सरासरीपेक्षा जास्त होती. देशात जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच रोज ५० ते ५५ हजार गाठींच्या दरम्यान आवक होत आहे. पण गेल्यावर्षीपर्यंतच्या आवकेचा विचार करता जून महिन्यात सरासरी १२ ते १४ हजार गाठींपर्यंत आवक होत असते.

म्हणजेच यंदाची आवक ही जवळपास पाच पटींंनी जास्त आहे. कापूस आवक अधिक असून बाजारात संभ्रमही आहे. यामुळे दरावरील दबाव कायम आहे. शेतकऱ्यांना ऐन जून महिन्यातही कमीच भाव मिळत आहे.

देशातील आवकेचा विचार करता सध्या महाराष्ट्रातील आवक जास्त दिसते. मे महिन्यात गुजरात राज्यातील आवक जास्त होती. महाराष्ट्रात सध्या रोज २० ते २५ हजार गाठींची आवक होत आहे, असे व्यापारी सांगतात. तर गुजरातमध्ये २० हजार गाठींची आवक होत आहे. इतर राज्यांतील आवक आता खूपच कमी झाली.

यंदा शेतकऱ्यांकडे नेमका किती कापूस शिल्लक आहे, यावरून मतभेद दिसतात. काही भागात शेतकऱ्यांकडे कापूस आहे, तर काही भागातील शेतकऱ्यांनी कापूस विकला. त्यामुळे नेमका किती कापूस शिल्लक आहे, याचे चित्र सध्या तरी स्पष्ट नाही. याचा गैरफायदा घेऊन कापूस बाजार दबावात ठेण्यात येत आहे, असे शेतकरी आणि जाणकारांनी सांगतिले.

वायद्यांमध्ये काय घडलं ?

आज आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस भाव नरमले होते. जवळपास सर्वच देशांमधील कापूस बाजार आज दबावात दिसला. इंटरकाॅन्टीनेन्टल एक्सचेंज अर्था आयसीईवर कापसाचे वायदे ८१.२३ सेंट प्रतिपाउंडवर होते. तर देशातील वायद्यांमध्ये कापूस दरात आज सुधारणा दिसली. Cotton Market

एमसीएक्सवर कापसाचे वायदे आज ५२० रुपयांनी वाढून ५९ हजार रुपये प्रतिखंडीवर पोचले. एक कापूस खंडी ३५९ किलोची असते. विशेष मागील चार ते पाच दिवस कापूस वायद्यांमध्ये सतत नरमाई येत होती. पण आज वायदे काहीसे वाढले.

बाजार समित्यांमधील स्थिती

बाजार समित्यांमधील भाव मात्र आज स्थिर होते. कापसाला आजही ७ हजार ते ७ हजार ४०० रुपयांचा भाव मिळत आहे. कापसाचे भाव दबावात असले तरी बाजारातील आवक टिकून आहे. पुढील काही दिवसांमध्ये आवक आणखी कमी होत जाईल.

तर अजूनही अनेक भागांमध्ये कापूस लागवड सुरु झाली नाही. त्यामुळे पुढील काळात कापूस लागवड नेमकी किती होते? पिकाला पोषक हवामान राहील का? उत्पादनाचे अंदाज काय येतात? यावरही कापूस बाजार अवलंबून असेल, असे जाणकारांनी सांगितले.

source : agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top