कृषी महाराष्ट्र

Kharif Season 2023 : खरीपासाठी बियाणे खरेदी करताना काय काळजी घ्यावी ? वाचा सविस्तर

Kharif Season 2023 : खरीपासाठी बियाणे खरेदी करताना काय काळजी घ्यावी ? वाचा सविस्तर

Kharif Season 2023

Seed Buying : चांगल्या उत्पादनासाठी तितक्याच दर्जेदार बियाण्याची आवश्यकता असते. सध्या विविध कंपन्या बियाणे विक्रीच्या जाहिराती देऊन शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. अशा जाहिरातींना बळी पडून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते.

अशा परिस्थितीत योग्य बियाण्याची निवड करणं हे जास्त महत्त्वाचं असतं. कारण पिकाचे उत्पन्न मुख्यात बियाण्याच्या दर्जावर व त्याच्या गुणधर्मावर अवलंबून असतं. पेरणीच्या मानसिक दबावाखाली शेतकरी बाजारात फसविला सुद्धा जाऊ शकतो.

त्यासाठी बियाणे खरेदी करताना आणि बियाणे खरेदी केल्यानंतर नेमकी काय काळजी घ्यायची याविषयी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.

प्रामुख्याने बीज प्रमाणीकरण यंत्रणेने प्रमाणित केलेले बियाणे खरेदी करण्यास प्राधान्य द्यावं.

बियाणे खरेदी करताना टॅगवर पिकाचे व जातीचे नाव, बियाण्याचा प्रकार, गट क्रमांक, उत्पादकाचे नाव व पत्ता, बीज परीक्षणाची तारीख, उगवनशक्ती टक्के, शुद्धतेचे प्रमाण, पिशवीतील बियाण्याचे एकूण वजन, विक्रीची किंमत असावी, विक्रेत्याची सही इत्यादी नोंदी तपासून पहाव्यात.

यामध्ये प्रामुख्याने बियाण्याची उगवण क्षमता, भौतिक शुद्धता, अभियानाच्या चाचणीची तारीख इत्यादी काळजीपूर्वक वाचावं. त्यावरील सर्व माहिती वाचून त्याविषयी खात्री झाल्यानंतर शेतकऱ्यांनी विक्रेत्याकडून बियाणे खरेदी करावे. Kharif Season 2023

बियाणे खरेदीचे बिल घ्यावे. या बिलावर बियाण्याचे पीक आणि वाण तसेच गट क्रमांक, बियाण्याचे खरेदीची तारीख लिहिल्याची खात्री करावी. मुदतबाह्य तसेच पॅकिंग फोडलेले बियाणे खरेदी करू नये.

भविष्यात जर बियाण्यात काही दोष आढळला तर तक्रार करताना या सर्व गोष्टी उपयोगी पडतात. त्याशिवाय तक्रार ग्राह्य मानली जात नाही.

खरेदी केलेले बियाणे वापरण्यापूर्वी पिशवीच्या खालच्या बाजूला छिद्र पाडून बियाणे बाहेर काढावे. बॅग वरील टॅग न काढता रिकामी पिशवी आणि त्यामध्ये बियाण्याचा थोडासा नमुना शिल्लक ठेवून खरेदी केलेली पावती जपून ठेवावी. पेरणी करताना शक्यतो दोन वेगवेगळ्या लॉटचे बियाणे एकत्र करून पेरणी करू नये.

जमिनीत योग्य ओलावा असताना पेरणी करावी. पेरणी केलेली तारीख नोंदणी करून ठेवावी. पेरणी नंतर चार ते सात दिवसात बियाण्याची उगवण झालेली दिसून येते. पेरणीनंतर खून चिट्ठी वरील प्रमाणापेक्षा उगवण कमी झाल्यास अथवा पिकात फार मोठ्या प्रमाणात भेसळ असल्यास बियाणे निरीक्षकाकडे लेखी तक्रार करावी.

बियाण्याची उगवण क्षमता कमी असल्यास संबंधित विक्रेता आणि उत्पादक कंपनी यांच्यावर बियाणे कायदा १९६६ मधील कलम १० नुसार कायदेशीर कारवाई होऊ शकते. बियाणे विषयी काही तक्रार असल्यास जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार द्यावी.

कमी दर्जाच्या बियाण्यामुळे आर्थिक नुकसान झाले असल्यास जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवून नुकसान भरपाई मागता येते. अशा प्रकारे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना सर्व बाबींची खबरदारी घेतल्यास त्यांची फसवणूक होणार नाही आणि त्यांना शुद्ध व दर्जेदार बियाण्यापासून चांगलं उत्पन्न मिळेल.

source : agrowon

seeds for kharif, kharif season, खरीप हंगामासाठी बियाणे

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top