हुमणीचा बंदोबस्त कसा करावा ? वाचा संपूर्ण
हुमणीचा बंदोबस्त
गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये हुमणी किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी वेळीच सामुदायिक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
राज्यामध्ये खरिपात प्रामुख्याने भात, ऊस, ज्वारी इ. पीक, तर रब्बीमध्ये गहू, हरभरा अशा पिके घेतली जातात.
या पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यामध्ये हुमणी किडीच्या प्रामुख्याने दोन प्रजाती आढळतात.
होलोट्रिकीया सेराटा या जातींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने नांदेड, बुलढाणा, नगर, धुळे, सांगली, कोल्हापूर इ. जिल्ह्यात दिसून येतो. तर ल्युकोफोलीस लेपिडोफोरा या प्रजातीचा तीव्र प्रादुर्भाव कोल्हापूर आणि सांगली जिल्हाच्या पश्चिम भागात दिसून येतो.
हुमणी किडीच्या प्रादुर्भावावरून तिचे नदी काठावरील व माळरान भागातील अशा दोन गटात वर्गीकरण करता येते. नदीकाठी आढळणारी हुमणी ल्युकोफोलीस जातीची असून, नदीकाठापासून दूर म्हणजेच माळ भागात आढळणारी हुमणी ही होलोट्रोकीया या जातीची आहे.
बागायती पिकामध्ये ओलावा आणि अन्नपुरवठा सातत्याने होत असल्यामुळे हुमणी अळीचा प्रादुर्भावही वाढतो.
हुमणीच्या अंडी, अळी, कोष आणि भुंगेरे अशा चार अवस्था असतात. त्यात अळी अवस्था पिकांच्या मुळावर जगत असल्याने सर्वात नुकसानकारक असून, ती तीनवेळा कात टाकत मोठी होते. संपूर्ण जीवनक्रम वर्षभरात पूर्ण होत असला तरी त्यात अळी अवस्था ६ ते ८ महिने इतकी मोठी असते. Humani Control
नियंत्रणाचे उपाय
हुमणीच्या जीवनक्रमात भुंगेरे हीच एक अवस्था थोड्या कालावधीसाठी जमिनीबाहेर असते. बाकी सर्व अवस्था जमिनीत असतात. त्यामुळे या अवस्थेत किडीचा बंदोबस्त करण्यावर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे.
अ) भुंगेऱ्यांचा सामुदायिक बंदोबस्त
पहिला पाऊस झाल्यावर हुमणीचे भुंगेरे सुर्यास्तानंतर बाभूळ, बोर, लिंब या झाडांवर पाने खाण्यासाठी गोळा होतात. अशा झाडांच्या फांद्या रात्री काठीच्या सहाय्याने हलवून खाली पडलेले भुंगेरे गोळा करावीत. Humani Control
रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून मारावेत. हा उपाय शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या केल्यास अंडी घालण्यापूर्वीच भुंगेऱ्यांचा नायनाट करणे शक्य होईल.
ब) हुमणी अळीचा बंदोबस्त
पीक काढणीनंतर लगेचच १५ ते २० सेंमी. खोल नांगरट करावी. नांगरणीवेळी उघड्या पडणाऱ्या अळ्या गोळा करुन रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून माराव्यात. आंतरमशागतीच्या वेळेस अळ्या गोळा करुन लोखंडी हुकच्या सहाय्याने किंवा खुरप्याने माराव्यात. पिकास पाणी देताना एखाद्या दिवशी पाणी जास्त काळ साचून ठेवल्यास अळ्या गुदमरून मरतील. हुमणीग्रस्त शेतातील कीडग्रस्त सुकलेली पिकांचे रोपे उपटावीत. मुळांशेजारील अळ्यांचा नाश करावा.
हुमणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तिच्या नैसर्गिक शत्रू महत्वाचे आहेत.
पक्षी : बगळा, चिमणी, मैना, कावळा, घार इ. पक्षी त्यांचा फडशा पाडतात.
प्राणी : मांजर, रानडुक्कर, मुंगूस, कुत्रा इ. प्राणी हुमणीच्या अळ्या आवडीने खातात.
जिवाणू (बॅसीलस पॉपीली) व सूत्रकृमी (हेटरो-हॅब्डेटीस) हे होलोट्रिकीया हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत.
मेटारायझियम अॅनिसोप्ली हे बुरशीजन्य कीटकनाशक २० किलो/हेक्टरी या प्रमाणात कुजलेल्या शेणखतातून जमिनीत मिसळून बुंध्यापाशी द्यावी. त्यानंतर पिकास हलके पाणी द्यावे. ड्रेंचिंग करुन हुमणीचे रासायनिक पद्धतीने नियंत्रण करता येते. हुमणीचा बंदोबस्त हुमणीचा बंदोबस्त
स्त्रोत – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी