पिकांना शिफारशीनुसार खतमात्रा कशी द्यावी ? वाचा संपूर्ण माहिती
खतमात्रा
Soil Testing Update : माती परीक्षणानुसार जैविक खते, हिरवळीचे खत, कंपोस्ट खतांचा वापर केल्याने रासायनिक खतांवरील खर्च कमी करता येतो. कोरडवाहू शेतीमध्ये तीन वर्षातून एकदा १० ते १५ टन शेणखत प्रति हेक्टरी किंवा ५ टन प्रति वर्षी पूर्वमशागतीच्या वेळी मिसळावे. त्यामुळे जमिनीची संरचना चांगली होते, जमिनीतील सेंद्रिय कर्बाची वृद्धी होते.
पाणी मुरण्याची क्षमता जास्त प्रमाणात वाढते. जमीन भुसभुशीत होते. शेणखत उपलब्ध नसल्यास पिकांचे अवशेष, गिरिपुष्प किंवा सुबाभळीच्या हिरव्या फांद्या जमिनीत गाडाव्यात. हिरवळीच्या पिकांची (चवळी, मूग, उडीद) लागवड करावी.
१) ज्वारी, बाजरी यांसारख्या एकदल पिकांस अॅझोटोबॅक्टर या जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी.
२) सोयाबीन, तूर, मूग, मटकी, चवळी यांसारख्या द्विदल वर्गीय पिकांसाठी रायझोबियम जिवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. त्यामुळे नत्र खताची बचत होते. पर्यायाने पीक उत्पादन खर्च कमी होतो.
३) सर्वसाधारणपणे पिकाच्या शिफारशीत खत मात्रा माती परीक्षण करून दिल्याने अन्नद्रव्यांचा संतुलित आणि समतोल पुरवठा होतो. त्यामुळे रासायनिक खतांवरील खर्च कमी होतो. पीक उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून येते. जमिनीतील उपलब्ध नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांचे प्रमाण आणि पिकांना आवश्यक अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेऊन खतांच्या शिफारशी केल्या जातात.
४) माती परीक्षण अहवालावरून मातीतील अन्नद्रव्याचे प्रमाण फार कमी, कमी, मध्यम, साधारण जास्त, जास्त, फार जास्त या प्रमाणे वर्गवारी केली जाते. वेगवेगळ्या पिकांना खताद्वारे अन्नद्रव्य मात्रांची निरनिराळी शिफारस केली जाते. माती परीक्षण अहवालावरून नत्र, स्फुरद आणि पालाश यांच्या मात्रेत बदल करता येतो. (Fertilizer Demand)
जमिनीत अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेनुसार रासायनिक खतांच्या शिफारशी
अ.क्र.— माती परीक्षणाद्वारे आढळून आलेले अन्नद्रव्यांचे प्रमाण— शिफारशीत खत मात्रा
१. —अति कमी—शिफारशीच्या ५० टक्के जास्त
२.—कमी—शिफारशीच्या २५ टक्के जास्त
३.—मध्यम— शिफारशीनुसार
४.—थोडे जास्त—शिफारशीच्या १० टक्के कमी
५.—जास्त—-शिफारशीच्या २५ टक्के कमी
६.—अत्यंत जास्त— शिफारशीच्या ५० टक्के कमी
बीजप्रक्रिया
– जिवाणू संवर्धक हे सर्वांत स्वस्त आणि अत्यंत उपयुक्त, पीक उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ करणारे आणि उत्पादन खर्चात बचत करणारे आहे. जमिनीचे कर्ब :नत्र गुणोत्तर योग्य ठेवून जमिनीचा पोत सुधारतो.
– अॅझोटोबॅक्टर हे जिवाणू संवर्धक ज्वारी, बाजरी, ऊस, कापूस, सूर्यफूल इत्यादी तृणधान्य आणि तेलवर्गीय पिकांसाठी वापरता येते. पेरणीपूर्वी एक तास अगोदर १० मिलि हे जिवाणू संवर्धकाची प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया करावी. हे जिवाणू हवेतील नत्राचे स्थिरीकरण करतात.
– रायझोयिबयम जिवाणू संवर्धक द्विदल पिकास उपयोगी आहे. पिकांची नत्राची गरज नत्र स्थिरीकरणामुळे भागविली जाते. म्हणून कमी प्रमाणात नत्राचे मात्रा द्यावी लागते. कडधान्याच्या मुळावरील गाठीत स्थिर व शिल्लक असलेला नत्र दुसऱ्या पिकास उपलब्ध होतो.
– उसासाठी अॅझेटोबॅक्टर जिवाणू संवर्धकाचा वापर करावा. स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक जमिनीतील अति विद्राव्य, स्थिर
असलेला स्फुरद विद्राव्य स्थितीत रूपांतरित करतात. त्यामुळे पिकांना स्फुरदाची उपलब्धता वाढते. स्फुरद विरघळवणारे जिवाणू संवर्धक १० मिलि प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया करावी.
– कोरडवाहूमध्ये जिवाणू खतामधील जिवाणूंची कार्यक्षमता जमिनीत असणाऱ्या ओलाव्यावर अवलंबून असते.
खत व्यवस्थापन :
रासायनिक खत पेरणीच्या वेळी द्यावे, बियांपासून फार लांब पडू देऊ नये. त्यासाठी दुचाडी पाभरीचा वापर करणे जास्त फायदेशीर ठरते. कोरडवाहूमध्ये पिकांना रासायनिक खते दिल्याने उत्पादनात लक्षणीय वाढ होते. पीक १० ते १५ दिवस अगोदर तयार होते. रासायनिक खताच्या वापरामुळे सुरुवातीपासून पीक जोमदार वाढते. फुलोरा ८ ते १० दिवस अगोदर येतो.
खते देण्याची वेळ
१) शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीची खते, सेंद्रिय खते पिकास लागू होण्यास वेळ लागतो. यामुळे त्यांचा वापर पेरणी अगोदर करावा.
२) रॉक फॉस्फेट, बेसिक स्लॅज, आयर्न पायराइट, मूलद्रव्यी गंधक इत्यादी रासायनिक खते पाण्यात विरघळत नसल्याने ती पेरणी आधी एक महिना जमिनीत मिसळावीत.
३) पेरणी झाल्यानंतर पिकाची वाढ जोमाने होण्यासाठी पेरणीच्या वेळी पिकांना खताची पहिली मात्रा द्यावी. या मात्रेमध्ये स्फुरद व पालाश यांची संपूर्ण मात्रा आणि नत्राची अर्धी मात्रा द्यावी. उर्वरित नत्राची मात्रा दोन ते तीन वेळेस पिकाच्या गरजेनुसार विभागून द्यावी.
४) बहुतांश शेतकरी नत्रयुक्त खतांचा वापर जास्त प्रमाणात करतात. पिकांचा स्फुरद व पालाश यांची गरज भागवली गेली नाही, तर नत्राच्या अतिरिक्त वापरामुळे उत्पादनात कोणत्याही प्रकारची वाढ होत नाही. शाश्वत उत्पन्न मिळण्यास अडथळा निर्माण होतो.
५) खते जमिनीत १० ते १५ सेंमी खोलीवर द्यावीत. याने पावसाच्या पाण्यात खतांचा ऱ्हास टाळता येतो. तसेच खते मुळांच्या सान्निध्यात आल्याने खतांची कार्यक्षमतादेखील वाढते.
६) विद्राव्य खते फवारणीद्वारे पिकास देता येतात. या पद्धतीत खतांची कार्यक्षमता वाढते. Fertilizer Demand
खत शिफारस (किलो प्रति हेक्टर)
पीक— नत्र— स्फुरद—पालाश
कापूस—१५०— ७५— ७५
तूर—२५— ५०— २५
सोयाबीन—३०— ६०— ३०
सूर्यफूल—६०— ४०— ३०
खरीप ज्वारी—८०— ४०— ४०
उडीद—२५— ५०— ०
मूग—२५— ५०— ०
बाजरी— ६०— ३०— ३०
मका—१५०— ७५— ७५
टीप – या व्यतिरिक्त माती तपासणी अहवालानुसार सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावीत.
संपर्क – डॉ. पपिता गौरखेडे, ८८३०६९४१६३, (अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
खतमात्रा खतमात्रा खतमात्रा खतमात्रा खतमात्रा