Nematode : पिकातील सुत्रकृमींचा प्रादुर्भाव कसा ओळखायचा ?
Nematode : सूत्रकृमी हे जमिनीमध्ये राहणारे अतिसूक्ष्म कृमी असून, यजमान झाडांच्या मुळांवर प्रादुर्भाव करतात. सूत्रकृमी आपली सोंड मुळात आणि झाडाच्या जमिनीखालील भागात खुपसतात. त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर झाडाला मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. काही प्रजाती पान आणि फुलातही सोंड खुपसून रस शोषतात.
सूत्रकृमीमुळे इतर रोगकारक जिवाणू, विषाणू किंवा बुरशीचे वहन केले जाते. मात्र सर्वच सूत्रकृमी पिकांसाठी हानिकारक असतात, असे नाही. तर त्यांच्या काही प्रजाती या पिकांसाठी हानिकारक सूक्ष्मजीवांवरही जगतात. त्यामुळे त्यांचा वापर मित्र कीटकाप्रमाणेच जैविक नियंत्रणासाठी केला जातो.
सूत्रकृमी कसं नुकसान करतात ?
सूत्रकृमींच्या प्रादुर्भावामुळे पिकात मरसदृश लक्षणे दिसतात. जमिनीमध्ये मुबलक प्रमाणावर ओलावा असूनही पीक सुकून जाते. -प्रादुर्भावग्रस्त भाजीपाला पीक निरोगी पिकापेक्षा कमी वाढते. त्यास फुले, फळे कमी लागतात. जास्त प्रादुर्भावाच्या स्थितीत असे पीक मरून जाते. सूत्रकृमींचा प्रादुर्भाव उष्ण, बागायती वालुकामय जमिनीत जास्त दिसून येतो. Nematode
जरी सूत्रकृमींच्या अतिप्रादुर्भावामुळे पीक पूर्णतः मरून जाऊ शकते. मात्र मोठ्या वृक्षांमध्ये फारसे नुकसान दिसून येत नाही. मोठ्या झाडामध्ये सूत्रकृमींचा प्रादुर्भाव शोधणेही कठीण असते. प्रादुर्भाव ग्रस्त झाडाझुडपांची वाढ मंदावून उत्पादन कमी होते. शोभिवंत वृक्षांमध्ये सूत्रकृमींच्या प्रादुर्भावामुळे वाढ खुंटते. फांद्या वरून खाली वाळू शकतात.
उपाय काय आहेत ?
सूत्रकृमी विषयी तुलनेने जागरूकता कमी आहे. तसेच अन्नद्रव्यांच्या लक्षणाशी असलेल्या साधर्म्यामुळे प्रादुर्भाव लक्षात येण्यातच उशीर होतो. नियंत्रण थोडे कठीण होते. उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोलवर नांगरट करावी. पिकांची फेरपालट करावी. पिकामध्ये झेंडूची लागवड हा सूत्रकृमींच्या व्यवस्थापनासाठी उत्तम उपाय आहे.मिश्र पिकांची लागवड करावी. Nematode
धैंचा, ताग यासोबतच मूग, उडीद, चवळी या सारखी द्विदलवर्गीय किंवा हिरवळीची पिके घ्यावीत.सेंद्रिय खते उदा. निंबोळी किंवा एरंड पेंड १.५ ते २ टन प्रति हेक्टर या प्रमाणात १५ दिवस अगोदर वापर करून पाणी द्यावे.सूत्रकृमींचा प्रादुर्भाव नसलेल्या किंवा प्रतिकारक रोपांचा वापर करावा.
माहिती आणि संशोधन – वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी