कृषी महाराष्ट्र

Soil Moisture : आंतर मशागतीतून कसा टिकवावा जमिनीतील ओलावा ?

Soil Moisture : आंतर मशागतीतून कसा टिकवावा जमिनीतील ओलावा ?

Soil Moisture

रब्बी हंगामात (Rabi Season ) बहुतेक पिके जमिनीतील उपलब्ध ओलाव्यावर (Soil Moisture) येतात. अशा परिस्थितीत उपलब्ध ओलावा पीक (Crop) पेरणीपासून तर पीक काढणीपर्यंत कसा पुरेल आणि त्याचा जास्तीत जास्त पिकाला कसा उपयोग होईल याकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे.

त्यासाठी आंतरमशागतीशिवाय दुसरा पर्याय नाही. आंतरमशागत केल्यास जमिनीत ओलावा जास्त काळ टिकून राहतो,हवा खेळती राहाते.दिलेल्या खतांची कार्य क्षमता वाढते आणि त्यामुळे पीक जोमदार वाढून अधिक उत्पादन मिळते. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीने आंतरमशागत करणे गरजेचे आहे.

पेरणीनंतर थोड्याच दिवसात पिकांची उगवण झालेली आढळून येते.पिकानुसार आणि जमिनीतील ओलाव्यानुसार पाच ते आठ दिवसात संपूर्ण पीक जमिनीच्यावर आल्याचे दिसते आणि त्यावेळेपासूनच लगेच आंतरमशागतीस सुरवात होते. पिकाची उगवण जर विरळ झाली असेल, बी चांगले उगवले नसेल अथवा जास्त नांगे पडले असतील तर तेथे ताबडतोब बी ओळीत टाकावे. नांगे भरले नाहीत तर हेक्टरी रोपांची संख्या कमी होऊन उत्पादन कमी येते.

हे काम जेवढे लवकर करणे शक्य आहे तेवढे लवकर करावे.उशिरा नांगे भरले तर आधी उगवलेली रोपे बी आणि बी टोकून उगवलेली रोपांच्या वाढीत जास्त तफावत आढळून येते आणि त्यामुळे आधी पेरलेल्या रोपांच्या छायेचा अनिष्ट परिणाम नंतर उगवलेल्या रोंपावर होऊन त्यांची वाढ कमी होते, उत्पादन अतिशय कमी येते.

जेथे बियाणे दाट पेरले गेले असेल तेथे एकाच ठिकाणी अधिक रोपे उगवलेली दिसतील.तेथील रोपे एक-दोन वेळा विरळणी करून (पीक पंधरा दिवसांचे होईपर्यंत) करावी. विरळणी उशिरा केली तर जमिनीतील ओलावा उपटून टाकणारी रोपेच घेऊन टाकतात आणि त्यामुळे ओलाव्याचे प्रमाण कमी होते आणि पुढे पीक फुलोऱ्यावर आल्यावर पिकास ओलावा अपुरा पाडून उत्पादनात घट येते. तसेच दिलेल्या खतांचाही अपव्यय टळेल.

पिकाची चांगली उगवण झाल्यावर ताबडतोब वाफशावर पहिली कोळपणी करणे गरजेचे आहे.पीक ३० ते ३५ दिवसांचे होईपर्यंत किमान दोन कोळपण्या करणे आवश्यक आहे. त्यामुळे पीक तणविरहित राहील. कोळपणी केल्यामुळे वरचा मातीचा थर भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते. तण नियंत्रण होते. त्यामुळे पिकांची वाढ चांगली वाढ होते. उपलब्ध ओलावा जास्त काळ टिकून राहतो. काही प्रमाणात पिकांच्या ओळींना मातीची भर पडते. यासाठी वरवर कोळपणी करणे पिकांच्या दृष्टीने फारच उपयुक्त ठरते.

सर्वसाधारणपणे जेथे कमी पाऊस पडतो अशा अवर्षणग्रस्त भागात आच्छादनाचा वापर,जमिनीतील ओलावा जास्त काळ टिकवून राहण्यासाठी करावा.यासाठी हेक्टरी ५ टन पालापाचोळा किंवा पाचटाचे लहान तुकडे किंवा गव्हाचा भुसा पिकाच्या दोन ओळीत टाकल्यास जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी प्रमाणात होते.

रब्बी ज्वारी

पेरणीनंतर १० दिवसांनी पहिली व १२ ते १५ दिवसांनी दुसरी विरळणी करावी.पोंगेमर झालेली रोपे काढून टाकून आवश्यक तेथे नांगे भरावेत.

जमिनीत ओल धरून ठेवण्यासाठी पेरणीनंतर तिसऱ्या आठवड्यात पहिली,पाचव्या आठवड्यात दुसरी तर आठव्या आठवड्यात तिसरी कोळपणी करावी.त्यासाठी अखंड पासाचे कोळपे वापरावे. दुसरी व तिसरी विशेषतः शेवटची कोळपणी दातेरी कोळप्याने केल्यास रान फुटून पडणाऱ्या भेगा बुजतात, बाष्पीभवन थांबते. ही कोळपणी अत्यंत महत्त्वाची आहे.

हरभरा

पेरणीनंतर १५ दिवसांच्या आत आवश्यक तेथे नांगे भरावेत. विरळणी करून दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेवावे.

पेरणीपासून चार आठवड्यांच्या आत एक खुरपणी आणि कोळपणी आवश्यक आहे.परिणामी तण नियंत्रण होऊन उत्पादनात २५ टक्के वाढ होते.

करडई

उगवणीनंतर १० दिवसांनी किंवा पेरणीपासून २० दिवसांनी विरळणी करावी.मध्यम जमिनीत दोन रोपात साधारणतः २० सेंमी तर भारी जमिनीत ३० सेंमी ठेवावे.जरुरीप्रमाणे एखादी निंदणी करावी.

दोन ते तीन कोळप्याच्या पाळ्या द्याव्यात. पहिली कोळपणी तिसऱ्या आठवड्यात फटीच्या कोळप्याने,दुसरी कोळपणी पाचव्या आठवड्यात अखंड पासाच्या कोळप्याने आणि तिसरी कोळपणी आठव्या आठवड्यात दातेरी कोळप्याने करावी.

सूर्यफूल

पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी दोन वेळा विरळणी करावी. आधी दोन व अखेरीस एका ठिकाणी एकच रोप ठेवावे.

विरळणी करताना मध्यम जमिनीत २० सेंमी तर भारी जमिनीत ३० सेंमी अंतर ठेवावे. पिकास १५ दिवसाच्या अंतराने एक ते दोन कोळपण्या तसेच एक खुरपणी देऊन तणविरहित ठेवावे. दोन ओळीमध्ये गव्हाचे भुसकट अथवा उसाचा पाचटाचे तुकडे करून आच्छादन केल्यास हेक्टरी उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

– डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९
(मृद शास्रज्ञ,एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी,जि.नगर)

source:agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top