Pomegranate Orchard : अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त डाळिंब बागेचे व्यवस्थापन कसे करावे ? संपूर्ण माहिती
Pomegranate Orchard
Crop Damage Update : राज्याच्या विविध भागामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे डाळिंब बागांमध्ये कमी अधिक प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येते.
नुकसानीची पातळी ५ ते १० टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत दिसून येते. अशा स्थितीमध्ये बागांमध्ये नुकसानीचे प्रमाण कमी करण्यासाठी पुढील उपाययोजना उपयुक्त ठरू शकतात.
बागेची अवस्था व नुकसानीच्या प्रमाणानुसार करावयाच्या उपाययोजना
सर्व फळांचे नुकसान, फांद्या तुटणे / चिरणे :
सर्व नुकसानग्रस्त फळे काढावीत. तुटलेल्या आणि चिरलेल्या फांद्या छाटून बागेबाहेर खड्ड्यामध्ये कुजण्यासाठी टाकाव्यात.
छाटलेल्या फांद्या व खोडांवर १० टक्के बोर्डो पेस्ट लावावी. त्यानंतर १ टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
खतांचा हलका डोस भरून बागेला विश्रांती अवस्थेत ठेवावे. पुढील बहराची तयारी करावी. Pomegranate Orchard Management
तोडणीसाठी तयार झालेली फळे :
गारपिटीमुळे फळांना इजा झालेली असल्यास बोरिक ॲसिड २ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे संरक्षणात्मक फवारणी घ्यावी. त्यामुळे इजा झालेल्या फळांमधील कूज टाळण्यास मदत होईल.
तोडणीसाठी तयार व न कुजलेल्या फळांची काढणी करावी. ती तात्काळ विक्रीसाठी पाठवावीत.
चिरलेली आणि नुकसानग्रस्त व कुजलेली फळे एकत्रित करून कंपोस्ट खड्ड्यात टाकावीत.
खूप जास्त इजा झालेल्या फळांच्या बियांमधून तेल काढणे शक्य आहे. त्याचा पर्याय शक्य असल्यास अवलंबावा.
एक महिन्यानंतर तोडणीस येणारी फळे
फवारणी /अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी तक्ता १ पहावा.
लिंबू आकाराची फळे
जर ७५ टक्के फळांचे गारपीट व पावसामुळे नुकसान झालेले असल्यास झाडावरील सर्व फळे काढून टाकावीत. तक्ता १ मध्ये दिलेल्या शिफारसीप्रमाणे पुढील बहराची तयारी करावी.
२५ टक्के किंवा त्यापेक्षा कमी प्रमाणात फळांचे नुकसान झालेले असल्यास बाधित फळे काढून टाकावीत.
फवारणी, अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी तक्ता १ पहावा.
वेळापत्रकानुसार फवारणी करून उर्वरित फळांचे संरक्षण करावे.
फुलधारणा व फळधारणेस सुरुवात
प्रादुर्भावित, इजा झालेल्या फुलकळ्या किंवा फळे काढून टाकावीत. फवारणी, अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी तक्ता १ पहावा.
अधिक फुल आणि फळधारणेसाठी थोडीशी वाट पहावी. समाधानकारक फुले व फळधारणा दिसल्यास शिफारशीप्रमाणे एकात्मिक रोग व कीड व्यवस्थापन करून बहर चालू ठेवावे. अन्यथा फळबाग विश्रांतीवर ठेवावी. पुढील पीक हंगामासाठी, बहराची तयारी करावी.
विश्रांती अवस्थेतील, फळे नसलेली, फांद्या तुटलेली झाडे :
सर्व नुकसानग्रस्त, तुटलेल्या आणि चिरलेल्या फांद्या छाटाव्यात. बागेबाहेर खड्ड्यामध्ये कुजण्यासाठी टाकाव्यात.
छाटलेल्या फांद्यांना व खोडांवर १० टक्के बोर्डो पेस्ट लावावी. त्यानंतर १ टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
विश्रांती अवस्थेत जर खत व्यवस्थापन झाले नसल्यास खतांचा डोस देऊन घ्यावा.
शिफारशीप्रमाणे विश्रांती अवस्थेतील एकात्मिक रोग व कीड व्यवस्थापन करावे. Pomegranate Orchard Management
गळून पडलेली पाने, काही जखमा / चट्टे असलेली फळे
जर फळांमध्ये कमी इजा झालेल्या असतील तक्ता १ प्रमाणे व्यवस्थापन करावे.
एकात्मिक रोग आणि कीड व्यवस्थापन (IDIPM) वेळापत्रक:
विश्रांती काळातील बागेसाठी :
विश्रांती काळात बोर्डो मिश्रण १ टक्के किंवा २-ब्रोमो-२-नायट्रोप्रोपेन-१,३-डायॉल ०.५ ग्रॅम प्रति लिटर या सोबत ताम्रयुक्त बुरशीनाशकांपैकी एक (उदा. कॉपर ऑक्सिक्लोराईड (५० टक्के डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम किंवा कॉपर हायड्रॉक्साइड (५३.८ टक्के डब्ल्यूपी) २ ग्रॅम प्रति लिटर) घेऊन फवारणी करावी. त्यानंतर १० ते १५ दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी घ्यावी.
फळधारणा झालेल्या बागेसाठी:
बोर्डो मिश्रण ०.५ टक्के फवारणी करावी. त्यानंतर स्ट्रेप्टोमायसिन* ०.५ ग्रॅम प्रति लिटर किंवा २-ब्रोमो-२-नायट्रोप्रोपेन-१,३-डायॉल ०.५ ग्रॅम प्रति लिटर यासोबत बुरशीनाशकांपैकी एक (उदा. कॉपर ऑक्सिक्लोराईड (५० टक्के डब्ल्यूपी)
२.५ ग्रॅम किंवा कॉपर हायड्रॉक्साइड (५३.८ टक्के डब्ल्यूपी) २ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्ल्यूपी) २ ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी. पुढील फवारणी ७ ते १० दिवसाच्या अंतराने बुरशीनाशक बदलून करावी. कीडीचा प्रादुर्भाव असल्यास यामध्ये कीटकनाशकाचा अंतर्भाव करता येईल.
ज्या डाळिंब बागेमध्ये तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव नसलेल्या बागांमध्ये स्ट्रेप्टोमायसिन* आणि २-ब्रोमो-२-नायट्रोप्रोपेन-१,३-डायॉल (ब्रोनोपॉल) वापरू नये. फक्त बुरशीनाशक व कीटकनाशकाची फवारणी करावी.
शिफारस व झाडांच्या वयोमानानुसार खत व्यवस्थापन करावे.
टीप : बहर सल्ल्यासाठी डाळिंब संशोधन केंद्राची वेबसाइट https://nrcpomegranate.icar.gov.in/Advisory पहावी.
गारपिटीनंतर लगेचच फवारणी
बोरिक ॲसिड २ ग्रॅम + झिंक सल्फेट २.५ ग्रॅम + चुना १.२५ ग्रॅम + मॅन्कोझेब (७५ टक्के डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम प्रति लिटर फवारणी
७ ते १० दिवसांनी,
कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्ल्यूपी) २ ग्रॅम + २-ब्रोमो-२-नायट्रोप्रोपेन-१,३-डायॉल ०.५ ग्रॅम प्रति लिटर फवारणी.
खत व्यवस्थापन : यूरिया ४० ग्रॅम + ००:५२:३४ (मोनो पोटॅशिअम फॉस्फेट) २० ग्रॅम + ००:००:५० (पोटॅशिअम सल्फेट) १५ ग्रॅम + ह्यूमिक ॲसिड १० मिलि प्रति झाड असा वापर करावा.
डॉ. ज्योत्स्ना शर्मा, डॉ. सोमनाथ पोखरे, डॉ. एन. व्ही. सिंह,
डॉ. मंजूनाथा एन., डॉ. मल्लिकार्जून आणि डॉ. राजीव मराठे.
(राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर.)