कृषी महाराष्ट्र

रब्बी पिकांचे हवामान अंदाजानूसार व्यवस्थापन कसे करावे ?

रब्बी पिकांचे हवामान अंदाजानूसार व्यवस्थापन कसे करावे ?

रब्बी पिकांचे हवामान

मराठवाडयात दिनांक २ ते ८ डिसेंबर दरम्यान किमान तापमान सरासरी ते सरासरी पेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे. दिनांक ९ ते १५ डिसेंबर दरम्यान किमान तापमान सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने हरभरा, करडई, हळद आणि ऊस पिकातील व्यवस्थापनाविषयी हवामान आधारीत कृषी सल्ल्याची शिफारस केली आहे.

हरभरा

हरभरा पिकाची पेरणी करून २५ ते ३० दिवस झाले असल्यास १९:१९:१९ या खताची १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. लवकर पेरणी केलेल्या हरभरा पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर २० पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी २ कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी ५ % (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस (२५ % इसी) २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट (५ %) ४.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

सध्या हरभरा पिकात मानकूजव्या आणि मर या रोगाच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी किंवा बायोमिक्सची आळवणी करावी. बायोमिक्सच्या आळवणीसाठी पंपाचे नोझल काढून २०० ग्रॅम (पावडर) किंवा २०० मिली (लिक्वीड) प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.

करडई

वेळेवर लागवड केलेल्या करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी डायमिथोएट (३० %) १३ मिली किंवा असिफेट (७५ %) १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात तणांच्या प्रादूर्भावानूसार पेरणीनंतर २५ ते ५० दिवसापर्यंत एक ते दोन कोळपण्या व खूरपण्या घ्याव्यात. लवकर पेरणी केलेल्या करडई पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

हळद

उशीरा लागवड केलेल्या हळद पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. हळदीमधील कंदकुज व्यवस्थापनासाठी बायोमिक्स १५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. हळदीवरील कंदमाशीच्या व्यवस्थापनासाठी १५ दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस (२५ %) २० मिली किंवा डायमिथोएट (३० %) १५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाच्या स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).

ऊस

ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस २० % २५ मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल १८.५ % ४ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

source : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top