स्मार्ट सिंचन नियोजन कसे असावे ? त्यांची सुधारित प्रणाली कशी असावी ? वाचा संपूर्ण माहिती
स्मार्ट सिंचन नियोजन
मागील भागात ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ (IoT) आधारित ‘ॲटो फुले इरिगेशन शेड्यूलर (AutoPIS)’ या प्रणालीची माहिती दिली आहे.
या प्रणालीद्वारे विशिष्ट पिकाला त्याच्या नियमित सिंचन पद्धती (प्रवाही, तुषार किंवा ठिबक) द्वारे प्रत्यक्ष परिस्थितीनुसार (Real time) स्थान व वेळपरत्वे बदलत जाणारे किंवा सिंचनाला प्रभावित करणारे सर्व घटक (हवामान, पीक व पिकाच्या वाढीची अवस्था, जमिनीचा प्रकार, सिंचन पद्धत, सिंचन प्रणालीची वैशिष्ट्ये इ.) मिळवून किंवा गृहीत धरून पिकास पाणी किती आणि केव्हा द्यावे हे निश्चित केले जाते.
त्याप्रमाणे सिंचन प्रणालीला दूरस्थ पद्धतीने किंवा स्वयंचलितपणे सूचना दिल्या जातात. ती यंत्रणा योग्य वेळेवर चालू होते आणि ठरलेले सिंचन पूर्ण होताच बंद होते. त्यामुळे ‘ॲटो फुले इरिगेशन शेड्यूलर’ ही प्रणाली जेव्हा संपूर्ण शेतासाठी एकाच वेळी (किंवा एकाच वेळापत्रकाप्रमाणे) सिंचन द्यावयाचे असते तेव्हा उपयुक्त ठरते.
म्हणजेच शेतामध्ये किंवा उपलब्ध पाण्याच्या स्रोतावरून पंपाद्वारे जेव्हा एकावेळी एकाच पिकास सिंचन द्यावयाचे आहे, त्या वेळी उपयुक्त ठरते. साधारणतः जेव्हा शेतीचे क्षेत्र लहान आहे, जमिनीचा प्रकार सारखा आहे, एकाच प्रकारचे व साधारणतः एकाच वेळी पेरणी केलेली पीक एकाच प्रकारच्या सिंचन पद्धतीद्वारे भिजवायचे आहे अशा परिस्थितीमध्ये ते उपयुक्त ठरते असे म्हणता येईल.
मात्र प्रत्यक्षामध्ये शेतासह वरील बाबींमध्ये असा सारखेपणा उपलब्ध असेलच असे नाही. एकाच प्रकारच्या जमिनीमध्ये अनेक पिके असू शकतात, त्यांची लागवडीची वेळ वेगवेगळी असू शकते. त्यानुसार अशा पिकांच्या सिंचनाचे वेळापत्रकही बदलत असते. Irrigation Management
उदा. १. शेतजमीन जरी एकाच प्रकारची असेल तरी एका वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या पिकास सिंचन देणे :
– अशा वेळी पिकाच्या प्रकाराप्रमाणे सिंचन वेळापत्रक वेगवेगळे असते.
२. संपूर्ण शेत जमिनीवर जरी एकाच प्रकारचे पीक घेतले असले तरी जर जमीन वेगवेगळ्या प्रकारची असेल तेव्हा :
– जमिनीच्या प्रकाराप्रमाणे पिकास पाणी केव्हा देणे बदलत असते.
३. शेत जमीन व पीक जरी सारखेच असले तरी त्यातील पिकाची लागवड वेगवेगळ्या केली असेल :
– अशा वेळी सिंचन प्रभावित करणारे हवामानाचे घटक बदलत असल्याने वेगवेगळ्या वेळी लागवड केलेल्या त्याच पिकाचे सिंचन वेळापत्रक वेगवेगळे असते.
४. शेतजमिनीचा प्रकार, पीक व लागवडीचा कालावधी जरी एक सारखा असेल, पण सिंचन प्रणाली जर वेगळी असेल :
– सिंचन प्रणालीच्या वैशिष्ट्याप्रमाणे बदल होत असतो. उदा. शेतामध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला असला तरी शेताच्या वेगवेगळ्या भागात ठिबकच्या ड्रिपरचा प्रवाह, त्यातील अंतर व कार्यक्षमता वेगळी असेल, तरिही त्यांचे सिंचन वेळापत्रक हे त्यानुसार वेगवेगळे असते.
५. सिंचनासाठी उपलब्ध असलेल्या पाण्याचा स्त्रोताचा प्रवाह संपूर्ण शेताचे सिंचन एकाच वेळी करण्या एवढा पुरेसा नसेल, तर :
– अशा वेळी शेत जमिनीचे क्षेत्र हे उपलब्ध असलेल्या पाण्याच्या स्रोतांच्या प्रवाहानुसार एकापेक्षा जास्त भागांमध्ये विभागून प्रत्येक भागास वेगवेगळ्या वेळी सिंचन द्यावे लागते. म्हणजेच त्यांचे सिंचन वेळापत्रक हे वेगवेगळे असते.
अशा वेळी मात्र आपणास शेत जमिनीचा प्रकार, पिकाचा प्रकार, पिकाच्या पेरणीच्या लागवडीचा कालावधी, सिंचन प्रणालीचा प्रकार व वैशिष्ट्ये या सर्व बाबीतील एकसारखेपणा आणि उपलब्ध पाण्याचा प्रवाह गृहीत धरून शेताचे सिंचनासाठी भाग करावयाचे असतात.
प्रत्येक भागासाठी प्रत्यक्ष वेळेनुसार स्थान व वेळ परत्वे सिंचनावर प्रभावित करणारे घटक लक्षात घेऊन सिंचन वेळापत्रक निश्चित करावयाचे असते.
त्यानुसार प्रत्येक भागास त्या त्या भागाच्या सिंचन वेळापत्रकाप्रमाणे पंप दूरस्थ व स्वयंचलित चालू व बंद होणे आवश्यक असते. यासाठी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ सक्षम अशी वेगळी ‘स्मार्ट फुले इरिगेशन शेड्यूलर’ ही प्रणाली विकसित केली आहे.
स्मार्ट फुले इरिगेशन शेड्यूलर प्रणाली
प्रत्यक्ष वेळेनुसार (Real Time) स्थान व वेळ परत्वे बदलत जाणारे सिंचन प्रभावित करणारे घटक गृहीत धरून काटेकोर व कार्यक्षम सिंचन व्यवस्थापनासाठी उपयुक्त आहे. यामध्ये संपूर्ण शेत जमिनीमधील सिंचनावर प्रभाव टाकणाऱ्या घटकांचा एकसारखेपणा गृहीत धरून भाग निश्चित करावयाचे असतात.
प्रत्येक भागास त्या त्या भागासाठी निश्चित केलेल्या सिंचन वेळापत्रकाप्रमाणे सिंचन द्यावयाचे देण्याचे ध्येय साध्य करण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक भागामध्ये सिंचनाच्या पाण्याचा प्रवाह हा त्या भागाच्या सिंचन वेळापत्रकाप्रमाणे नियंत्रित केला जातो. हे करण्यासाठी तो प्रवाह नियंत्रित करणाऱ्या झडपा त्या भागामध्ये स्थापित कराव्या लागतात.
परंतु ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ सक्षम प्रणालीसाठी प्रत्येक भागाच्या झडपा सिंचन द्यावयाच्या वेळामध्ये स्वयंचलित व दूरस्थ पद्धतीने चालू होऊन योग्य वेळी त्या बंद होणे आवश्यक असते. त्यासाठी या ‘स्मार्ट फुले इरिगेशन शेड्यूलर’ या प्रणालीमध्ये पूर्वी पाहिलेल्या ‘ॲटो फुले इरिगेशन शेड्यूलर’ पेक्षा ‘सोलोनॉईड वॉल्व किंवा झडप’ या आणखी एका घटकाचा अंतर्भाव केलेला आहे. Irrigation Management
‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ सक्षम ‘सोलोनॉईड झडप’ (IoT enabled Solenoid valve) :
शेत जमिनीच्या प्रत्येक भागावर हा वॉल्व बसवलेला असतो. त्यावर लावलेल्या सोलेनॉईल कॉईलद्वारे तो इंटरनेट किंवा क्लाऊड मार्फत संगणकीय प्रारूपाशी जोडला जातो.
जेव्हा शेताच्या विशिष्ट भागास सिंचन द्यावयाचे आहे, त्याची तशी सूचना इंटरनेटवरून पाण्याच्या स्रोताजवळ बसविलेल्या पंपावर बसविलेल्या नियंत्रकाला आणि सोलेनॉईड वॉल्व (झडप) ला दिली जाते. त्याप्रमाणे झडप व पंप चालू होतो.
शेताच्या त्या भागास निश्चित केलेल्या सिंचन वेळापत्रकाप्रमाणे पाणी दिले जाते. पुढे देऊन झाले की तो आपोआप बंद करण्याच्या सूचना दिलेल्या असतात.
संपूर्ण माहिती भरणे आपल्याच हिताचे …
शेतकऱ्यांनी ‘स्मार्ट फुले इरिगेशन शेड्यूलर’ या प्रणाली वापरण्यापूर्वी त्यावर आपल्या शेताची नोंदणी करताना त्यात मागितलेली सर्व माहिती कंटाळा न करता भरावी. कारण यावेळी केलेला कंटाळा पुढे नियोजनाच्या वेळी त्रासदायक ठरू शकतो.
या माहितीमध्ये शेत जमिनीचे किती भाग आहेत, त्या प्रत्येक भागाच्या जमिनीचा प्रकार, त्यात घेतलेले पीक, पीक लागवडीचा कालावधी, सिंचनाची पद्धत व सिंचन प्रणालीची आवश्यक ती वैशिष्ट्ये इ. माहिती देणे आवश्यक आहे.
एकदा ‘स्मार्ट फुले इरिगेशन शेड्यूलर’ ही प्रणाली कार्यान्वित झाल्यावर शेत जमिनीच्या प्रत्येक भागास त्या त्या भागाच्या वैशिष्ट्याप्रमाणे (स्थान व वेळपरत्वे बदलणारे घटक लक्षात घेऊन) सिंचनाचे वेळापत्रक ठरवले जाते.
त्या वेळापत्रकानुसार सोलेनॉईड वॉल्व आणि पंप हे स्वयंचलितपणे किंवा दूरस्थपणे चालू व बंद करता येतात. यामुळे पिकांना अत्यंत काटेकोरपणे सिंचन देणे शक्य होते.
source:agrowon