Bio Fertilizers : जिवाणू खते कशी वापरावीत ? वाचा सविस्तर
Bio Fertilizers : रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमती आणि बाजारातील तुटवडा लक्षात घेतला तर उत्पादन वाढविण्यासाठी जीवाणू खतांचा वापर करण गरजेच आहे. सध्या रब्बी हंगाम होऊ घातलाय. रब्बी ज्वारी, हरभरा, करडई, गहू पिकाची पेरणी करण्यापुर्वी बियाण्यावर जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया केली तर उत्पादनात नक्कीच वाढ होते.
जीवाणू खते ही जमिनीत आढळणाऱ्या उपयुक्त जीवाणूपासून तयार केलेली असतात. त्यापैकी अॅझोटोबॅक्टर, अझोस्पीरिलम, निळे-हिरवे शेवाळ आणि ऍ़झोला पिकाला नत्र पुरवतात. तर बॅसीलस पॉलिमिक्स जीवाणू स्फुरदाची उपलब्धता वाढवितात तर मायकोराईझा सारखे जीवाणू पिकाला स्फुरद, पालाश, नत्र, कॅल्शियम, सोडियम, जस्त, तांबे, यासारखी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषण करण्यास मदत करतात.
म्हणूनच कोणत्याही पिकाची पेरणी करण्यापुर्वी बियाण्याला जिवाणू खताची प्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो. रासायनिक खतांप्रमाणे जिवाणू खतांमध्ये कोणतीही अन्नद्रव्ये नसतात. मग ही खते पिकाला नेमकी कशी बरं फायदेशिर असतात? तर जिवाणू खते ही पिकांना लागणारी अन्नद्रव्ये हवेतून किंवा जमिनीतून पिकाला उपलब्ध करून देत असतात. Bio Fertilizers
जिवाणू खतांचे फायदे
या जिवाणू खतामुळे जमिनीतील जैवरासायनिक क्रिया होतात. म्हणजे काय होत? तर जमीनीत जे पिकासाठी उपयुक्त जिवाणू असतात ते अजून सक्रीय होतात. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो.
जिवाणू खतामुळे निसर्गातील अन्नद्रव्ये उपलब्ध होत असल्यामुळे रासायनिक खतांची मात्रा २० ते २५ टक्क्यांनी कमी करता येते आणि पीक उत्पादन १० ते १५ टक्क्यांनी वाढत. सेंद्रिय पदार्थांच लवकर विघटन होत. बियाण्यांची चांगली आणि लवकर उगवण होते. रासायनिक खतांच्या तुलनेमध्ये ही जिवाणू खते स्वस्त असतात.
जीवाणू खते वापरताना काय काळजी घ्यायची ?
जीवाणू संवर्धनाच्या पाकिटावर दिलेल्या पिकांसाठी एक्सपायरी तारीख देलेली असते. या तारखेपुर्वीच ही जीवाणू खते वापरायची असतात. बियाण्याला बुरशीनाशके किंवा किटकनाशके लावायची झाल्यास ती अगोदर लावावीत. नंतरच ही जीवाणू खते बियाण्याला लावावीत.
जीवाणू संवर्धन किंवा संवर्धनाची प्रक्रिया केलेले बियाणे खतात मिसळू नये. जीवाणू संवर्धन खरेदी करताना वापरासंबंधी अंतिम तारीख तसेच पिकाचे नाव पाहूनच खरेदी कराव. हे पाकीट सावलीत थंड जागी ठेवावे.
जिवाणू खताची बीजप्रक्रिया कशी करावी ?
अझॅटोबॅक्टर किंवा रायझोबियम जीवाणू संवर्धन वापरायचे असल्यास अडीचशे ग्रॅम चे जीवाणू खताचे १ पाकीट अर्धा लिटर पाण्यात मिसळून द्रावण करावे. या द्रावणात थोडा गुळ मिसळला तर चिकटपणामुळे हे द्रावण जास्त परिणामकारक ठरत. हे द्रावण बियाणांवर शिंपडून हलक्या हाताने चोळाव.
जीवाणू खते लावलेले बियाणे स्वच्छ कागदावर किंवा पोत्यावर सुकवावे आणि लगेच पेरणीसाठी वापरावे. एका पाकीटातील संवर्धन १० ते १५ किलो बियाणांवर प्रक्रिया करण्यास पुरेसे होत. ही जिवाणू खते आपल्याला कोणत्याही कृषी सेवा केंद्रात अडीचशे ग्रॅम पाकीटामध्ये मिळतात.