Biofertilizer Use : जीवाणू संवर्धनाचा उत्पादन वाढविण्यासाठी वापर कसा करावा ? वाचा सविस्तर
Biofertilizer Use
Biofertilizers : रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमती, बाजारपेठेत होत असलेली त्यांची दुर्मिळता लक्षात घेता अपेक्षित उत्पादन वाढविण्यासाठी जीवाणू संवर्धनाचा वापर करणे फायद्याचे ठरते.
जीवाणू संवर्धने स्वस्त किंमतीत उपलब्ध होत असल्याने सर्वच शेतकऱ्यांना परवडण्यासारखी आहेत.
तसेच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी त्यांची मदत होते. जीवाणू संवर्धने जमिनीत आढळणाऱ्या उपयुक्त जीवाणूपासून तयार केलेली असतात. त्यापैकी अॅझोटोबॅक्टर, अझोस्पीरिलम, निळे-हिरवे शेवाळ आणि ऍ़झोला पिकास नत्र पुरवितात.
बॅसीलस पॉलिमिक्स जीवाणू स्फुरदाची उपलब्धता वाढवितात तर मायकोराईझा सारखे जीवाणू पिकास स्फुरद, पालाश, नत्र, कॅल्शियम, सोडियम, जस्त, तांबे, यासारखी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषण करण्यास मदत करतात.
यापैकी अॅझोटोबॅक्टर आणि रायझोबियम ही संवर्धने प्रचलित झाली असुन इतरांच्या अधिक वापरासाठी कृषि खाते व कृषि विद्यापीठे प्रयत्नशील आहेत.
विविध पिकांसाठी कोणकोणते जीवाणू संवर्धने आहेत ?
१. अझॅटोबॅक्टर – एकदल पिके : उदा. ज्वारी, बाजरी, गहू
२. रायझोबियम – द्विदल पिके : उदा. तूर, उडीद, सोयाबीन, मूग, हरभरा, भूईमुग इत्यादी
३. अॅझोस्पीरीलम – ज्वारी, बाजरी, मका, गहू, भात
४. निळे-हिरवे शेवाळ आणि अॅझोला- भात
५. व्हिए-मायकोराईझा – बाजरी, ज्वारी, मका, तूर, भुईमूग Biofertilizer Use
जीवाणू खत (संवर्धन) कसे वापरावे ?
अझॅटोबॅक्टर अथवा रायझोबियम जीवाणू संवर्धन वापरायचे असल्यास संवर्धनाचे १ पाकीट (२५० ग्रॅम) हे ५०० मि.ली. (अर्धा लिटर) पाण्यात मिसळून द्रावण करावे. हे द्रावण बियाणांवर शिंपडून हलक्या हाताने चोळावे.
जीवाणू संवर्धन लावलेले बियाणे स्वच्छ कागदावर किंवा पोत्यावर सुकवावे आणि लगेच पेरणीसाठी वापरावे. एका पाकीटातील संवर्धन (२५० ग्रॅम) १० ते १५ किलो बियाणांवर प्रक्रिया करण्यास पुरेसे होते.
५० ते १०० ग्रॅम गुळ ५०० मि.ली. पाण्यात मिसळून गळाचे द्रावण तयार करावे. हे द्रावण चिकट होत असल्यामुळे जास्त परिणामकारक ठरते.
source : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी