कृषी महाराष्ट्र

Turmeric Harvesting : सुधारित पद्धतीने हळद काढणी कशी करावी ? संपूर्ण माहिती

Turmeric Harvesting : सुधारित पद्धतीने हळद काढणी कशी करावी ? संपूर्ण माहिती

Turmeric Harvesting

हळद लागवडीच्या पद्धतीनुसार काढणीची पद्धत अवलंबवावी. जमिनीच्या पोताप्रमाणे वाळलेल्या पानांचे प्रमाण तपासून हळद काढणीचे नियोजन करावे. हळदीची काढणी करतेवेळी जमीन पूर्णपणे वाळली असल्यास हलके पाणी द्यावे. जेणेकरून हळद काढणी सुलभ होईल.

महाराष्ट्रातील प्रमुख नगदी मसाला पीक (Spice Crop) म्हणून हळद पीक (Turmeric Crop) ओळखले जाते. हळद लागवडीमध्ये (Turmeric Cultivation) सर्वांत अवघड बाब म्हणजे ‘हळदीची काढणी’ (Turmeric Harvesting) होय. साधारणपणे जातिपरत्वे हळद काढणीस ७ ते ९ महिने लागतात.

त्यात प्रामुख्याने हळव्या जातींना (उदा. आंबे हळद, आयआयएसआर-प्रगती) तयार होण्यास लागवडीपासून ६ ते ७ महिने लागतात. निम गरव्या जाती ७ ते ८ महिन्यांत (उदा. फुले स्वरूपा) तर गरव्या जाती ८ ते ९ महिन्यांत काढणीस तयार होतात (उदा. सेलम, कृष्णा). त्यामुळे जातीपरत्वे कालावधी पूर्ण झाल्याशिवाय पाला कापू नये.

काढणी

पिकाची पाने वाळणे हे हळद पीक परिपक्वतेचे प्रमुख लक्षण मानले जाते. जमिनीच्या पोताप्रमाणे माळरानावरील हलक्या जमिनीत ८० ते ९० टक्के पाने तर मध्यम व भारी जमिनीमध्ये ६० ते ७० टक्के पाने पिकाचा कालावधी पूर्ण होतेवेळी वाळलेली असतात.

काढणीआधी १५ ते ३० दिवस पिकास पाणी देणे बंद करावे. पाणी देणे बंद करताना प्रथम थोडेथोडे कमी करून नंतर पूर्ण बंद करावे. त्यामुळे पानातील अन्नरस कंदामध्ये लवकर उतरण्यास मदत होते. याचा हळकुंडाला वजन, गोलाई आणि चकाकी येण्यास मदत होते. पिकास शेटवपर्यंत पाणी देणे सुरूच ठेवल्यास हळकुंडांना नवीन फुटवे येण्याची शक्यता असते. परिणामी, उत्पादनात घट होते.

पाला वाळल्यानंतर जमिनीच्या वर १ इंच खोड ठेवून धारदार विळ्याच्या साह्याने पाला कापावा. पाला बांधावर गोळा करून ठेवून शेत ४ ते ५ दिवस चांगले तापू द्यावे. त्यामुळे हळदीच्या कंदामध्ये असलेल्या पाण्याच्या अंशामुळे जमीन साधारणपणे भेगाळली जाते. त्यामुळे हळदीची काढणी सुलभ होते.

लागवडीच्या पद्धतीनुसार हळद काढणीसाठी पद्धत अवलंबवावी. सरी वरंबा पद्धतीत टिकाव किंवा कुदळीच्या साह्याने हळदीची खांदणी करावी. तर गादीवाफा पद्धतीत ट्रॅक्टरचलित हळद काढणी यंत्राचा वापर करावा.

हळद काढणीवेळी जमीन पूर्णपणे वाळली असल्यास, हलके पाणी द्यावे. जेणेकरून हळद काढणी सुलभ होईल.

खांदणी करून काढलेले कंद २ ते ३ दिवस सूर्यप्रकाशात चांगले तापू द्यावेत. त्यामुळे कंदास चिकटलेली माती पूर्णपणे निघण्यास मदत होते.

त्यानंतर २ ते ३ दिवसांनी कंदाची मोडणी करावी. हळदीच्या कंदाचा गड्डा आपटनंतर हळकुंडे व गड्डे एकमेकांपासून वेगळे होतात. जेठे गड्डे, बगल गड्डे, हळकुंडे, सोरा गड्डे आणि कुजलेली सडकी हळकुंडे या प्रमाणे कच्च्या मालाची प्रतवारी करावी.

प्रतवारीनुसार वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक करावी.

हळदीची काढणी केल्यानंतर लवकरात लवकर हळदीची प्रक्रिया करावी. काढणी केल्यानंतर साधारणत: १५ दिवसांच्या आत त्यावर प्रक्रिया करावी. म्हणजे हळदीची प्रत व दर्जा चांगला राहतो.

जातिपरत्वे सर्व साधारणपणे एकरी १५० ते २०० क्विंटल ओल्या हळदीचे उत्पादन मिळते तर प्रक्रिया करून ३० ते ४० क्विंटल होते.

पारंपरिक पद्धतीने हळद खांदणी

  • या पद्धतीत पूर्णपणे कंद जमिनीतून निघत नाहीत. १० ते १५ टक्के कंद जमिनीत राहतात.
  • सरी वरंबा अथवा गादी वाफा पद्धतीने लागवड केलेल्या ठिकाणी या पद्धतीद्वारे हळदीची काढणी करता येते.
  • एकरी १८ ते २० मजूर लागतात.
  • कंदास इजा होण्याची शक्यता असते.

काढणी यंत्राद्वारे हळद खांदणी

  1. हे यंत्र कंदाच्या खालून कंद वरती उचलत असल्याने केवळ १ ते २ टक्के कंदच जमिनीमध्ये राहतात.
  2. केवळ गादी वाफा पद्धतीने लागवड केलेल्या हळदीची काढणी करता येते.
  3. साधारणपणे ८ ते १० लिटर डिझेलमध्ये १ एकर हळदीची काढणी होते. परिणामी मजूर बचत होते.
  4. कंद जमिनीतून अलगत उचलत असल्याने कंदास कोणत्याही प्रकारची इजा होत नाही.

प्रतवारी

अ) जेठे गड्डे

मुख्य रोपाच्या खाली वाढणाऱ्या कंदास जेठे गड्डे (मातृकंद) म्हणतात. हे गड्डे प्रामुख्याने पुढील वर्षी लागवडीसाठी वापरता येतात. त्यामुळे काढणीनंतर लगेच हे गड्डे सावलीमध्ये ठेवावेत.

ब) सोरा गड्डा

लागवडीसाठी वापरलेले कंद ५० ते ६० टक्के कुजून जातात. उरलेल्या ४० ते ५० टक्के कंदाना ‘सोरा गड्डे’ म्हणतात. हे काळपट रंगाचे मुळ्यांविरहित असतात. यांना हळकुंडापेक्षा दुप्पट भाव मिळतो.

क) बगल गड्डे

जेठे गड्ड्याला आलेला फुटव्यांच्या खाली बगल गड्डे तयार होतात, यांस अंगठा गड्डे असेही म्हणतात. ४० ग्रॅमपेक्षा जास्त वजन असणाऱ्या गड्ड्यांचा वापर बियाणे म्हणून करतात.

ड) हळकुंडे

बगल गड्ड्यांना आलेल्या कंदास हळकुंडे असे म्हणतात. प्रामुख्याने प्रक्रिया करून बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी याचा वापर करतात. यातील काही हळकुंडांना उपहळकुंडे येतात. त्यास लेकुरवाळे हळकुंडे असे म्हणतात. याचा वापर धार्मिक कार्यात मोठ्या प्रमाणावर केला जातो.

– डॉ. मनोज माळी, ९४०३७ ७३६१४
(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली येथे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)

स्रोत : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top