Cotton Market : कापूस दरात सुधारणा ! कापूस लागवड १२ टक्क्यांनी पिछाडीवर
Pune News : देशातील कापूस बाजारावर मागील तीन महिन्यांपासून दबाव आहे. यामुळे कापूस उत्पादक अडचणीत आले. शेतकऱ्यांना जुलै महिना निम्मा संपला तरी हंगामातील निचांकी भाव मिळत आहे.
परिणामी काही शेतकऱ्यांनी चालू खरिपात कापूस लागवडीला नापसंती दिल्याचं दिसतं. आतापर्यंत देशातील कापूस लागवड काही प्रमाणात कमी दिसते. पण आज आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात कापूस दरात काहीशी सुधारणा दिसून आली.
देशातील बाजारात आज कापसाच्या भावात क्विंटलमागं १०० रुपयांची सुधारणा दिसून आली. अनेक बाजारांमध्ये कापूस दर आज किंचित वाढलेले दिसले. आज कापसाची सरासरी दरपातळी ६ हजार ७०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान होती.
तर दुसरीकडे बाजारातील कापूस आवक काहीशी कमी झाली, पण सरासरीपेक्षा जास्तच होती. आज देशातील बाजारात जवळपास २५ हजार गाठींच्या दरम्यान कापूस आल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. कापसाची आवक अधिक असल्यानेही कापूस दरवाढीवर दबाव येत असल्याचे सांगण्यात येत आहे. Cotton Market
बाजार समित्यांबरोबरच वायद्यांमध्येही कापसाचे भाव वाढले होते. देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाच्या वायद्यांमध्ये सुधारणा दिसून आली. इंटरकाॅन्टीनेन्टल एक्सचेंजवर आज दुपारी कापूस वायद्यांमध्ये एक टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली होती.
कापूस वायद्यांनी ८३ सेंटचा टप्पा गाठला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायद्यांनी अनेक सत्रांनंतर हा टप्पा गाठला होता. देशातही कापसाचे वायदे आज सुधारलेले पाहयला मिळाले. कापसाचे वायदे आज १८० रुपयांनी वाढले होते. तर दुपारपर्यंत कापूस वायद्यांनी ५६ हजार ९४० रुपयांचा टप्पा गाठला होता. Cotton Market
ऐन लागवडीच्या काळात कापसाचे भाव दबावात आल्याने लागवडीवरही परिणाम दिसू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आतापर्यंतच्या लागवडीचा विचार करता लागवड क्षेत्र १२ टक्क्यांनी पिछाडीवर दिसते. देशात आतापर्यंत ९६ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली.
गेल्या हंगामात याच काळातील लागवड १०९ लाख हेक्टरवर होते. तसेच यंदा देशातील पाऊसमानावर एल निनोचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील कापूस लागवडीतील घट कायम राहिली आणि आंतरराष्ट्रीय बाजाराचा आधार मिळाल्यास देशातील कापूस बाजारातील चित्रही बदलू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
source : agrowon