कृषी महाराष्ट्र

गावरान कोंबड्यां व त्यांच्या विविध जातींबद्दल संपूर्ण माहिती

गावरान कोंबड्यां व त्यांच्या विविध जातींबद्दल संपूर्ण माहिती

गावरान कोंबड्यां

देशी कोंबड्यांच्या जातींची रोग-प्रतिकारक क्षमता उत्तम असते. या कोंबड्या कमी गुणवत्ता असलेल्या खाद्याचे मांस व अंड्यामध्ये अगदी सहजतेने रूपांतर करू शकतात. वातावरणातील बदलाला या जाती व्यावसायिक संकरित जातीतील कोंबड्याच्या तुलनेत अधिक तग धरू शकतात.

भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली अखत्यारित असणारी कर्नाल (हरियाना) येथील राष्ट्रीय पशू आनुवंशिक संसाधन ब्युरोमध्ये विविध राज्यातील देशी कोंबडीच्या (Indigenous Chickens) १९ जातींची नोंदणी झालेली आहे. याशिवाय वर्णनात्मक नसलेल्या देशी कोंबड्यांच्या जाती (Indigenous Chickens Breed) विविध राज्यांत आहेत.

स्थानिक आनुवंशिक जैवविविधता आणि उत्पादनाची शाश्‍वतता राखण्यासाठी देशी कोंबडीच्या जातींचे संवर्धन महत्त्वाचे आहे. या कोंबड्या कमी गुणवत्ता असलेल्या खाद्याचे मांस व अंडीमध्ये अगदी सहजतेने रूपांतर करू शकतात. देशी कोंबडीची अंडी आणि मांसाला मागणी आहे.

गावरान कोंबड्यांची जात मूळ स्थान

अंकलेश्‍वर गुजरात

काश्मीर फवरोला जम्मू आणि काश्मीर

असील छत्तीसगड, ओडिशा, आणि आंध्र प्रदेश

मिरी आसाम

बसरा गुजरात आणि महाराष्ट्र

निकोबारी अंदमान आणि निकोबार

चितगाव मेघालय आणि त्रिपुरा

पंजाब तपकिरी पंजाब आणि हरियाना

डंकी आंध्र प्रदेश

तेल्लीचेरी केरळ

दाओथीगीर आसाम

मेवारी राजस्थान

घ्यागस आंध्र प्रदेश आणि कर्नाटक

कौनायन मणिपूर

हरिंणघट्टा काळा पश्‍चिम बंगाल

हांसली ओडिशा

कडकनाथ मध्य प्रदेश

उत्तरा उत्तराखंड

कालास्थी आंध्र प्रदेश

अंकलेश्‍वर

गुजरात राज्यातील भरूच आणि नर्मदा जिल्ह्यातील ही जात आहे. परसबागेत या कोंबड्या मांस आणि अंडी उत्पादनासाठी पाळल्या जातात.

पट्टेदार किंवा सोनेरी-पिवळ्या पंखावर काळ्या टिपांसह ठिपके असतात.

मोठ्या कोंबडीस दररोज साधारणतः २५ ते ३० ग्रॅम धान्य लागते. त्यांची खाद्य रूपांतर क्षमतासुद्धा वाजवी आहे. लैंगिक परिपक्वता साधारणतः १५४ दिवसांची आहे. प्रजनन क्षमता उत्कृष्ट आहे.

फलित अंडी आणि उबवणुकीच्या क्षमतेचे प्रमाण अनुक्रमे ८६ आणि ७७ टक्के आहे.

कोंबड्या वर्षाकाठी सरासरी ८० अंडी देतात.

मिरी

आसाममधील स्थानिक नावानुसार या जातीला पोरोग असेही म्हणतात. कोंबड्या प्रामुख्याने आसाममधील धिमाजी, लखीमपूर, दिब्रुगड आणि सिबसागर जिल्ह्यांत आढळतात.

लैंगिकदृष्ट्या सुदृढ होण्यासाठी सुमारे १४७ दिवस लागतात. कोंबडी वर्षाला जवळपास ६० ते ७० अंडी घालते. त्यापैकी ८७ ते ९१ टक्के अंडी फलित असतात. उबवणुकीची टक्केवारी ४१ टक्के आहे.

डंकी

ही जात आंध्र प्रदेशातील विझियानगरम, विशाखापट्टणम आणि श्रीकाकुलम जिल्ह्यांमध्ये सापडते.

पंखावरून स्थानिक भाषेत विविध नावे आहेत. उदाहरणार्थ : काळा रंग (खाकी किंवा सावळा), लाल रंग (देगा), विटकरी रंग (पार्ला), पांढरा रंग (सटुआ) आणि ठिपकेदार रंग (पिंगळे).

कोंबड्या झुंजीसाठी प्रसिद्ध आहेत. बहुतेक कोंबड्यांच्या शरीरावर तपकिरी रंगाचे पंख असतात, तसेच खालील पृष्ठभागावर काही प्रमाणात काळ्या रंगांची पिसे असतात.

ही जात असील जातीसारखी दिसते. लैंगिक परिपक्वता ६ ते ८ महिन्यांच्या दरम्यान येते. अंडी उबवणी क्षमता जवळपास ७२ टक्के आहे. एक कोंबडी दरवर्षी सुमारे ३२ अंडी देते.

घ्यागस

मध्यम आकाराची कोंबडी आहे. कर्नाटकातील कोलार जिल्हा तसेच आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर या कोंबड्या आढळतात.

कोंबडीमध्ये मातृत्वाची प्रवृत्ती आणि ब्रूडिंग वर्तणूक चांगली असते. नरांच्या मानेवर सोनेरी पिवळी पिसे असतात; त्यांचे पंख आणि शेपटीचे पंख निळसर-काळे असतात. मादीचे पंख तपकिरी रंगांचे असतात.

परसबागेत मुख्यतः अंडी उत्पादनासाठी संगोपन केले जाते.

लैंगिक परिपक्वता १५० ते १८० दिवसांच्या दरम्यान येते. सफल अंडी मिळण्याचे प्रमाण ९१.५ टक्के (प्रजनन दर) आणि अंडी उबवणुकीचा दर ९०.८ टक्के आहे.

दरवर्षी उत्पादित अंड्यांची सरासरी संख्या ४५ ते ६० असते.

असील

भारतातील महत्त्वाची देशी कोंबडी जात आहे. आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी, विशाखापट्टणम आणि विजयनगरम जिल्हा तसेच ओडिशा, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही आढळते.

आक्रमकता, बुद्धिमत्ता, उच्च तग धरण्याची क्षमता, भव्य चाल आणि लढाऊ गुणांसाठी ओळखल्या जातात.

पीला (सोनेरी लाल), यार्किन (काळा आणि लाल), नुरी (पांढरा), कागर (काळा), चित्ता (काळा आणि पांढरा), टीकर (तपकिरी) आणि रीझा (हलका लाल) या सर्वांत लोकप्रिय उपजाती आहेत.

कोंबड्या प्रामुख्याने मांसाच्या गुणवत्तेसाठी ओळखले जातात, परंतु या कोंबड्या तितक्या उत्पादनक्षम नाहीत. मांस चवदार असते, चरबीचे प्रमाण कमी असते.

कोंबड्या १९६ दिवसांत लैंगिक परिपक्वता दाखवतात. फलित अंडी आणि उबवणुकीच्या क्षमतेचे प्रमाण अनुक्रमे ६६ आणि ६३ टक्के असते. कोंबड्या वर्षाकाठी सरासरी ६४ अंडी देतात.

कडकनाथ

मांस काळ्या रंगाचे असते, म्हणून या जातीला ‘काळामाशी’ असे म्हणतात. ही जात मुख्यत्वे मध्य प्रदेशातील झाबुआ आणि धार जिल्ह्यात आढळते. रक्त आणि मांसासह शरीरातील सर्व घटकांवर काळा हा प्रमुख रंग दिसून येतो. हा रंग मेलानिन रंगद्रव्यामुळे दिसून येतो.

मांस त्याच्या विशिष्ट चवीसाठी प्रसिद्ध आहे. मांसामध्ये उच्च पातळीची प्रथिने (२५.७ टक्के) आणि जीवनसत्त्वे (ब-१, ब-२, ब-६, ब-१२, क) यासह १८ प्रकारची अत्यावश्यक अमिनो आम्ल असतात.

या जातीमध्ये असणारे काही जनुक हे विदेशी जातींमधील उष्णकटिबंधीय अनुकूलता आणि रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी वापरण्यात येतात. गावरान कोंबड्यां

लैंगिक परिपक्वता १६२ ते २०० दिवसांच्या दरम्यान येते. २५ ते ३० आठवड्यांच्या वयात, प्रजनन क्षमता आणि उबवणुकीची क्षमता अनुक्रमे ८३.१ टक्के आणि ८०.२ टक्के असते. कोंबड्या वर्षभरात ९४ ते १०५ अंडी देतात.

उत्तरा

ही जात नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवर असलेल्या उत्तराखंडच्या कुमाऊँ क्षेत्रात आढळते.

रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे. निकृष्ट खुराडा, कमी प्रतीच्या आहारात सुद्धा चांगली तग धरते.

पंख काळ्या रंगांचे असतात, पायावर पंख असतात, त्वचा पांढरी असते. डोक्यावर एकच तुरा असतो.

कोंबड्या एक वर्षात सुमारे १३७ अंडी देतात.

स्रोत : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top