मोहोर अवस्थेतील आंबा बागेचे व्यवस्थापन : Mango Crop Advisory
मोहोर अवस्थेतील
कोकणात काही भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे मोठ्या प्रामाणात नुकसान झालेले आहे. ढगाळ वातावरणामुळे आंबा पिकावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशा पिरस्थितीत आंबा बागेतील व्यवस्थापनाविषयी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने पुढील माहिती दिली आहे.
आंबा पीक सध्या पालवी ते मोहोर अवस्थेत आहे. अंबा बागेमध्ये कोवळ्या पालवीवर मीजमाशी तसेच शेंडे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. शेंडे पोखरणारी अळी पालवीच्या दांड्याला छिद्र पाडून आत शिरते व आतील भाग पोखरुन खाते. परिणामी किडग्रस्त फांदी सुकून जाते. प्रादुर्भाव झालेल्या भागात अळीची विष्ठा व मृतपेशी आत राहिल्यामुळे फांद्यांवर गाठी निर्माण होतात व अशा फांद्या अशक्त राहतात.
मीजमाशी प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी बारीक गाठी निर्माण होतात व नंतर त्या ठिकाणी छोटेसे छिद्र असलेला काळा डाग दिसून येतो. किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास प्रादुर्भाव कमी असताना किडग्रस्त पालवी किडीच्या अवस्थेसह काढून नष्ट करावी आणि नियंत्रणासाठी क्विनोलफॉस (२५ % प्रवाही) २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. लक्षात घ्या सदर कीडनाशकाला लेबल फ्लेम नाहीत.
-मीज माशी तसेच फळमाशीच्या व्यवस्थापनासाठी आंबा झाडाच्या विस्तारा खालील जमीन नांगरावी किंवा झाडाखाली माती १० ते १२ सेंमी खोल उकरून घ्यावी. जेणेकरून किडीच्या सुप्तावस्था नष्ट होण्यास मदत होईल.
– अवकाळी पावसामुळे आणि ढगाळ हवामानामुळे पालवी ते मोहोर अवस्थेत असलेल्या आंब्यावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तुडतुडे मोहरातील कोवळ्या पालवीतील रस शोषून घेतात. त्यामुळे मोहराची गळ होते तसेच तुडतुडे मधासारखा चिकट पदार्थ शरीरावाटे बाहेर टाकतात आणि तो पानांवर पडल्यामुळे त्यावर काळी बुरशी वाढते. बागेचे वेळोवेळी सर्वेक्षण करून तुडतुडे पिल्लांच्या अवस्थेत असतानाच कीडनाशकाची फवारणी करावी. डेल्टामेथ्रीन (२.८% प्रवाही) ९ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून संपूर्ण झाडावर तसेच खोडावर फवारणी करावी.
– बोंगे फुटण्याच्या अवस्थेत असलेल्या आंब्यावरील तुडतुडे व भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी लॅम्बडासायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ६ मिली अधिक हेक्झाकोनॅझोल (५ टक्के प्रवाही) ५ मिली किंवा पाण्यात विरघळणारे ८० टक्के गंधक २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
– मोहोर फुटलेल्या आंबा बागेमध्ये मोहोरावरील तुडतुडे आणि मिज माशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड (१७.८% प्रवाही) ३ मिली किंवा ब्युफ्रोफेझीन (२५ टक्के प्रवाही) २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी मोहोर फुलण्यापूर्वी करावी.
(टीप – मोहोर नुकताच फुलत असताना ते फुलधारणा होईपर्यंत किडनाशकाची फवारणी शक्यतो टाळावी. फवारणी करणे गरजेचे असल्यास बागेतील परागीकरण करणाऱ्या कीटकांवर होणारा परिणाम टाळण्यासाठी परागीकरणाचा कालावधी वगळून फवारणी करावी. किडनाशकाची किंवा बुरशीनाशकाची फवारणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस करावी.)
source: agrowon.com