कृषी महाराष्ट्र

Market Update : आल्याचे भाव तेजीत ! शेतीमाल बाजारातील महत्वाच्या 5 बातम्या

Market Update : आल्याचे भाव तेजीत ! शेतीमाल बाजारातील महत्वाच्या 5 बातम्या

 

सोयाबीनचा जागतिक बाजार सध्या दबावात आहे. देशातही सोयाबीनचा भाव हंगामातील निचांकी पातळीदरम्यान कायम आहे. सोयाबीनच्या दरात काहीसे चढ उतारही दिसून येत आहे. मग सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनला काय भाव मिळतोय? देशातील सोयाबीन बाजारात काय स्थिती आहे? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.

1. सरकीच्या भावात चढ-उतार

सरकी तेल आणि सरकी पेंडेचे भाव दबावात आहेत. सोबतच सुतालाही वाढेलेल्या भावात उठाव मिळत नाही. त्यामुळे कापूस दरावर दबाव आहे. कापसाचे भाव आजही प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ६०० ते ७ हजार ३०० रुपयांवर आहेत. बाजार समित्यांमध्ये दरात आठवडाभरात क्विंटलमागं १०० रुपयांचे चढ उतार दिसतात. पण भावपातळी मागील काही दिवसांपासून कायम आहे. कापसाचे भाव आणखी काही दिवस याच पातळीच्या दरम्यान दिसू शकतात, अशा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

2. महाराष्ट्रातील बाजारात मक्याच्या दरात वाढ

बाजारातील मक्याची आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा पाहयाला मिळत आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बाजारात मक्याच्या दरात वाढ झाली. मक्याचे भाव १ हजार ८०० ते २ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. खरिपातील मका लागवड पिछाडीवर आहे. तर पुढील काळात पाऊसमान कसे राहते यावर खरिपातील तसेच रबीतील मका उत्पादन अवलंबून आहे. त्यामुळे पुढील काळात पाऊसमान कमी राहिल्यास दरात आणखी सुधारणा दिसू शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

3. आल्याच्या दरात वाढ

देशातील बाजारात आल्याचे भाव तेजीत आहेत. आल्याचे उत्पादन चालू हंगामात कमी झाले. परिणामी बाजारातील आवकही कमी झाली असून दरात वाढ झाली. आल्याचे भाव केरळमध्ये अधिक दिसतात. सर्वात कमी सरासरी भावपातळी उत्तर प्रदेशातील बाजारात आहे. महाराष्ट्रातील भाव ११ हजार ते १२ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. आल्याचे भाव चालू हंगामात तेजीतच राहू शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

4. लाल मिरचीचे भाव तेजीत

देशात सध्या लाल मिरचीचे भाव तेजीत आहेत. यंदा देशातील लाल मिरची उत्पादनात मोठी घट झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. तर मागणी मात्र टिकून आहे. देशातून लाल मिरचीची निर्यातही सुरु आहे. यामुळे दरावाढीला आधार मिळत आहे. सध्या लाल मिरचीचे भाव व्हरायटीनुसार १५ हजार ते २५ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत. लाल मिरचीचे भाव पुढील काळातही टिकून राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

5. सोयाबीन आणि सोयापेंडमध्ये तेजी

सोयाबीनचा जागतिक बाजार सध्या दबावात आहे. अमेरिकेत पावसाचा खंड पडल्याने जून महिन्यात सोयाबीन आणि सोयापेंडमध्ये तेजी आली होती. पण जूनच्या शेवटी आणि जुलै महिन्यात अमेरिकेतील जवळपास सर्व भागात पाऊस झाला. यामुळे बाजारावर याचा परिणाम पाहायला मिळाला. हेज फंड्स सोयाबीनमधून बाहेर पडले. तसेच नफेखोरीसाठीच सोयाबीनमध्ये तेजी आणली गेली होती, असे काही जणांचे म्हणणे आहे.

आज सीबाॅटवर सोयाबीनचे वायदे जवळपास दीड टक्क्याने वाढून १३.६५ डाॅलरवर पोचले. तर सोयापेंडच्या वायद्यांनी ३९६ डाॅलरचा टप्पा गाठला. सोयापेंडच्या वायद्यांमध्ये दोन टक्क्यांनी सुधारणा दिली होती. देशातील बाजारावर मात्र दबाव कायम आहे. देशातील बाजारात मागील दोन महिन्यांपासून सोयाबीन दबावात आहे.

सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांचा दर मिळत आहे. देशातील बाजारात सोयाबीन तेलाचे भाव दबावात आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात ब्राझील आणि अर्जेंटीनातून स्वस्त सोयापेंड निर्यात होत आहे. याचा दबाव भारतीय सोयापेंड बाजारावर होताना दिसत आहे.

सोयापेंड बाजार मागील काही दिवसांपासून स्थिर दिसतो. पुढील काळात सोयाबीनचा बाजार सध्या भावपातळी दरम्यान राहू शकतो. तसेच दरात क्विंटलमागं १०० ते २०० रुपयांचे चढ उतारही दिसू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

source:agrowon

Market Update

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top