Weather Update : मध्य महाराष्ट्र, कोकणसह, पूर्व विदर्भात पावसाचा इशारा ! वाचा संपूर्ण
Weather Update
Weather Update Pune : राज्यात सर्वदूर मॉन्सून पोहोचल्याने अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २६) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
रविवारी (ता.२५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बुहतांश ठिकाणी तापमान २७ ते ३८ अंशाच्या दरम्यान होते.
मॉन्सूनच्या पावसाची हजेरी, सर्वदूर असलेले ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात घट होऊ लागली आहे. राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. कोकणात पावसाचा जोर अधिक आहे. Rain Forecast
ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणालीपासून उत्तर पंजाबपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. गुजरातच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
आज (ता. २६) कोकणात पावसाचा जोर कायम राहणार आहे. रत्नागिरी, रायगड, तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :
रायगड, रत्नागिरी, पुणे, नागपूर, भंडारा, गोंदिया.
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली.
source : agrowon