Onion Production : कांद्याच्या उत्पादन वाढीसाठी बिजोत्पादन महत्त्वाचे
Onion Production : कांद्याचे सर्वाधिक उत्पादन नगर आणि नाशिक जिल्ह्यात होते. कांद्याचे बहुतांश बिजोत्पादन मात्र जालना जिल्ह्यात घेतले जाते. एकाच हंगामात बियाणे उत्पादन घेऊन तीनही हंगामात कांद्याचे पीक घेतले जाते. कांद्याच्या पिकात उत्पादन वाढीसाठी बिजोत्पादन महत्त्वाचे आहे. त्यामुळे कांदा उत्पादन घेताना पाणी व्यवस्थापनासोबतच दर्जेदार बियाण्याला प्राधान्य देण्याची गरज आहे, असे मत कृषी पर्यवेक्षक बाळासाहेब काकडे यांनी व्यक्त केले.
राशीन (ता.कर्जत) येथे सकाळ-अॅग्रोवन व रिवुलिस इरिगेशन इं.प्रा.लि. च्या संयुक्त विद्यमाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘कांदा लागवड व रिवुलिस तंत्रज्ञानाने पाणी व्यवस्थापन’ या विषयावर आयोजित अॅग्रोसंवाद व चर्चासत्र झाले.
कांदा पिकातील अभ्यासक व कृषी पर्यवेक्षक बाळासाहेब काकडे, रिवुलिस इरिगेशनचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ शिवराज लोणाळे, उत्तर आणि मध्य महाराष्ट्राचे व्यवस्थापक विजय घुगे यांच्यासह राशीनसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना बाळासाहेब काकडे म्हणाले, ‘‘कांदा लागवड करताना सेंद्रिय कर्ब एक टक्के असावा, शेणखत अथवा लेंडीखतामुळे जमिनीचा कर्ब वाढतो. कांद्याची लागवड चार इंच अंतराने करावी. एकरी पाच लाख रोपे लावून २० टन उत्पादन घेता येते. बिजोत्पादनासाठी एक डोळ्याचा आणि तीनशे ग्रॅम वजनाचा, भोवऱ्याच्या आकाराचा कांदा घ्यावा. बिजोत्पादनासाठी बियाण्यांची प्रतवारी उफणून करावी. Onion Crop
कांदा लागवडीनंतर खत टाकू नये, झिंक व सल्फेट ही खते कांद्याच्या पिकाला लागतात. कांद्याचे बहुतांश बिजोत्पादन मात्र जालना जिल्ह्यात घेतले जाते. एकाच हंगामात बियाणे उत्पादन घेऊन तीनही हंगामात कांद्याचे पीक घेतले जाते. कांद्याच्या पिकात उत्पादन वाढीसाठी बिजोत्पादन महत्त्वाचे आहे. त्यामुळे कांदा उत्पादन घेताना व्यवस्थापनासोबतच दर्जेदार बियाणाला शेतकऱ्यांनी प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे सांगितले. Onion Production
रिवुलिस इरिगेशनचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ शिवराज लोणाळे यांनी पाणी व्यवस्थापन आणि ठिबक सिंचन याची माहिती देत पाण्याचा वापर, ठिबकचे प्रकार त्याची उपयुक्तता आणि फायदे यावर प्रकाशझोत टाकून शेतकऱ्यांना रिवुलिस इरिगेशनच्या उत्पादन आणि सेवेबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन व प्रास्ताविक ‘अॅग्रोवन’चे जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत नेटके यांनी केले.
आभार रिवुलिस इरिगेशनचे राशीनचे विक्रेते अक्षय जगताप यांनी मानले. कॄषी साहाय्यक शेतकरी राहुल आठरे, अॅग्रोवनचे वितरण प्रमुख सैफ शेख व सचीन तवले, पत्रकार दत्ता उकिरडे, प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.