कृषी महाराष्ट्र

शेवगा लागवड माहिती व तंत्रज्ञान

शेवगा लागवड माहिती व तंत्रज्ञान

 

शेवगा हे सर्वाच्या परिचयाचं भाजीपाल्याचं झाड आहे भारतात सगळीकडे शेताच्या बांधावर, परसबागेत याचं अस्तित्व आढळून येतं. शेवग्याचे उगमस्थान भारत असून, त्यात असलेल्या आयुर्वेदिक गुणधर्मामुळे या झाडाचा प्रसार जगातील अनेक देशांत झाला आहे. असे असले तरी त्यांची शेवग्याची लागवड व्यापारी दृष्टिने भारत, श्रीलंका, केनिया या तीनच देशांत केली जाते. शेवग्याची लागवड हि प्रामुख्याने दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर केली जाते. बाजारात आज उपलब्ध असलेल्या विवीध जाती साधारणता २०० ते ३०० शेंगा एका झाडापासुन देतात. मुख्य पिक आणि बांधावरिल पिक म्हणून देखील शेवग्याची लागवड करता येणे शक्य आहे. शेवगा हे एक कमी पाण्यात येणारे पिक आहे. भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र या राज्यांत शेवग्याची व्यापारी शेती केली जाते. भारतात शेवग्याची लागवड एकूण ३८००० हेक्टर क्षेत्रावर केली जाते. त्यात आंध्रप्रदेश लागवड, उत्पादनात क्रमांक एकचे राज्य असुन लागवड क्षेत्र १५६६५ हेक्टर इतके आहे. त्यानंतर कर्नाटक१ १०२८० हेक्टर, तामिळनाडु ७४०८ हेक्टर इतके आहे.(सदरचे आकडे सन २०१० सालचे)
◆फलोत्पादन योजनेमुळे महाराष्ट्रातील फळबाग क्षेत्र वाढत आहे. शेवगा पिक बहुतेक वेळेस मिरची, वांगी, कांदा, गवार, पिकात आंतरपिक म्हणुन दक्षिणेकडिल राज्यात घेतले जाते. गुजरात राज्यातील वडोदरा, अहमदाबाद तसेच काही इतर भागात शेवगा हे पिक बरेच ठिकाणी बांधावरिल पिक म्हणुन एक अतिरिक्त उत्पादन देणारे पिक आहे. सलग लागवडीसोबतच आंबा, पेरु, लिंबू, अशा अन्य फळबागामध्ये आंतरपिक म्हणून शेवगा लागवड पिक वाढत आहे. शेवगा हा बहुवार्शिय द्विदलवर्गिय वृक्ष असुन जमिनीत नत्र स्थिर करतो. त्याचा पाला जमिनीवर गळुन पडत असल्याने जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. खोलवर जाणारे सोटमुळ, कमीत कमी अशा संख्येत असणा-या जमिनीस समांतर लांब जाणा-या मुळ्या (Lateral roots) आणि जमिनीवर पडणारी अल्प अशी सावली यामुळे शेवगा हे पिक उत्तम आंतरपिक म्हणुन योग्य ठरते. शिवाय शेवगा पिकाच्या जमिनीवर पडणा-या पानांमुळे नविन लागवड होणा-या पिकावरिल पिथियम रोगाचे देखिल नियंत्रण होण्यास मदत मिळते. याशिवाय पानांची पावडर, बियांची पावडर, बीपासून बेन ऑईल यासारखे प्रक्रिया पदार्थ साध्या पद्धतीने बनविता येत असून, त्याला जगभरातून मोठी मागणी आहे. पानांच्या पावडरचा उपयोग कुपोषण थांबविण्यासाठी पोषक आहार म्हणून वापरतात, तसेच शेवगा बियापासून जे तेल निघते, त्याला बेन ऑइल म्हणतात. हे तेल सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूत वंगण म्हणून वापरतात. मोबाईल, घडय़ाळे, टीव्ही इत्यादी दर लिटरला २५ हजार रुपयांनी ते जाते. तसेच वाळलेल्या शेवगा बियाची पावडर ही पाणी र्निजंतूक करण्यासाठी जगभर वापरली जाते. जागतिक आरोग्य संघटनेने दर १००० लीटर पाणी र्निजतुक करण्यास ८०० ग्रॅम पावडर वापरावी असे सुचित केले आहे.

हवामान

शेवग्याची लागवड सर्व हवामानात करता येते. उत्तम वाढीसाठी समशीतोष्ण, उष्ण अशा दोन्ही हवामानात केलेली चांगली ठरते. या पिकास जास्त तापमानात आणि अति कमी तापमान सहन होत नाही. सर्वसाधारणपणे २५ ते ३५ अंश सेल्सियस तापमान पिकाच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. कमी पाण्यात येणारे हे पिक पाणि मिळाल्यास फुलोऱ्यांत येण्यास उत्सुक असते. तापमान ४० अंश सेल्सियसच्या पुढे गेल्यास फुलांची गळ मोठ्या प्रमाणात होते. रात्रीचे तापमान १६ अंश सेल्सियसपेक्षा कमी झाल्यास फळ धारणा होत नाही. तसेत ढगाळ हवामान, धुके, अति पाऊस या पिकाच्या वाढीस बाधक ठरते. तापमानात वाढ चांगली होते.

लागवडीसाठी जमीन

शेवग्याची लागवड हलक्या, माळरान जमिनीत तसेच डोंगर उताराच्या हलक्या जमिनीहि उपयुक्त ठरतात. शेवग्याची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत होऊ शकत असली तरी हलकी ते मध्यम पाण्याचा निचरा उत्तम होणाऱ्या जमिनीत फायदेशिर ठरते. पाणि धरून ठेवणारी जमीन पिकास मानवत नाही. मात्र निचरा न होणाऱ्या भारी काळ्या जमीनीत शेवगा लागवड करू नये. अशा जमिनीत पाण्यामुळे झाडांची मुळे कुजतात, झाडे मरतात. चोपण जमिनीत शेवग्याची लागवड करू नये. जमिनीचा सामू ५ ते ६.५ असावा. जमीन भुसभुसीत, सेंद्रिय पदार्थयुक्त अशी असावी. ज्या जमीनीत क्लेचे प्रमाण जास्त आहे अशा जमीनीत लागवड शक्यतो करू नये.

लागवड

◆महाराष्ट्र राज्यात जवळपास २० वर्षांपासून शेवग्याची व्यापारी शेती करण्यास सुरुवात झाली असून, ती कमालीची यशस्वी झाली आहे. शेवग्याची लागवड महाराष्ट्रातील सर्व विभागांत करता येते. शेवगा लागवडीसाठी हलकी, मध्यम, भारी यापैकी कोणत्याही प्रकारची जमीन असली तरी चालते परंतु चांगले उत्पन्न मिळण्यासाठी पाण्याची सुविधा असणे आवश्यक आहे. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत शेवग्याला अजिबात पाणी नसले तरी झाड मरत नाही. फक्त त्या कालावधीत उत्पन्न खंडित होते. जेथे वर्षभर पाणी आहे अशा ठिकाणी नोव्हेंबर ते जून असे ७ ते ८ महिने शेवगा शेंगांचे उत्पन्न मिळत शेवग्याची लागवड कोकणातील अति पावसाच्या जिल्ह्य़ांत ऑगष्ट ते सप्टेंबरपासुन करावी. व्यापारी तत्वावर शेवग्याची लागवड करावयाची असल्यास ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत करावी. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्य़ांत लागवड जूनपासून जानेवारीपर्यंत केव्हाही केली तरी चालते.
◆शेवगा पिकाची लागवड बियापासुन तसेच काड्यांपासुन केली जाते. काड्यांपासुन केली जाणारी लागवड हि बहुवार्षिक शेवग्याची केली जाते. वार्षिक शेवग्याची लागवड हि बियापासुन करतात. साधारण १० गॅम वजनात ३५ बिया असतात. प्रति बि साधारणता ०.२८८ गॅम वजन भरते. एक एकर क्षेत्रात लागवडीकरिता २५० गॅम बियाणे पुरेसे होते. जवळपास एकूण ८७५ बिया एक एकर क्षेत्रात २.५ × २.५ मिटर अंतरावर लागवड केल्यास ६४० रोपे बसतात. बेड तयार करून किंवा प्लास्टिक पिशव्या भरून रोपांची निर्मीती केली जाते. शेवग्याचे बियाणे उपलब्ध झाल्यावर त्याची प्लास्टिक पिशवीत रोपे तयार करावीत. बियांची लागवड हि २ से.मी.खोलीवर करावी. लागवडीसाठी पिशवी भरताना गाळ, माती तसेच पूर्णपणे कुजलेले शेणखत किंवा त्याहुन अधिक उत्तम असे निंबोळी पेंडीचा विपर करावा. बियाणे टोकताना त्यास इजा होऊ नये म्हणून बी न दाबता हळुवारपणे पिशवीत ठेऊन नंतर त्यावर माती टाकावी, हळुवार हाताने पाणी द्यावे. बि लागवडीनंतर साधारणता ३० दिवसात रोप पुनर्लागवडीसाठी तयार होते. शेवग्याचे बी पिशवीत लावल्यानंतर एक महिण्याच्या आत लागवड होईल याची काळजी घ्यावी. रोप जास्त दिवस पिशवीत ठेवल्यास सोटमुळ वाढून वेटोळे होतात. रोप खराब होऊन पाने गळून रोपे जळण्याची शक्यता असते.
◆लागवडीसाठी २ ×२ ×२ फूट आकाराचे खड्डे घ्यावेत. ज्यांना खड्डे घेणे शक्य नाही त्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने खोल सरी करावी. त्यात प्रत्येक खड्डय़ात चांगले शेणखत एक घमेले, अर्धा किलो दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेट व ५ ते १० ग्रॅम फोरेट टाकूण हे सर्व मिश्रण मातीत एकत्र करून खड्डा जमिनीबरोबर भरावा. आळे तयार करून घ्यावे व एक-दोन चांगला पाऊस झाल्यानंतर प्रत्येक खड्डय़ात एक रोप लावावे.

🪴शेवग्याच्या सुधारित जाती
१) जाफना : हा शेवगा वाण स्थानिक व लोकल आहे. देशी शेवगा म्हणून ओळखतात. या वाणाच्या शेंगा चवदार असतात. या वाणाचे वैशिष्टय़ एका देठावर एकच शेंग येते. ती २० ते ३० सें.मी. लांब असते. या वाणाला वर्षांतून एक वेळ म्हणजे फेब्रुवारीत फुले लागतात. मार्च, एप्रिल, मेमध्ये शेंगा मिळतात. एक किलोत २० ते २२, शेंगा बसतात. दर झाडी एक हंगामात १५० ते २०० शेंगा मिळतात. चवीला चांगली. बी मोठे होतात.

२) रोहित-१ : या जातीचे वैशिष्टय़ म्हणजे लागवडीपासून सहा महिन्यांत उत्पन्न सुरू होते. शेंगांची लांबी मध्यम प्रतिची ४५ ते ५५ सें.मी. असून, शेंगा सरळ, गोल आहेत. रंग गर्द हिरवा असून, चव गोड आहे. उपलब्ध सर्व जातींपेक्षा ३० टक्के उत्पन्न जास्त आहे व्यापारी उत्पन्न देण्याचा कालावधी ७ ते ८ वर्षांचा आहे. वर्षभरात एका झाडापासून सरासरी १५ ते २० किलो शेंगांचे उत्पन्न मिळते. शिवाय या जातीतून ८० टक्के शेंगा एक्स्पोर्ट गुणवत्तेच्या मिळतात.

३) कोकण रुचिरा : हा वाण डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केला आहे. कोकणासाठी शिफारस केली आहे. झाडाची उंची ५ ते ६ मीटर असुन याच्या एका झाडाला १५ ते १७ फांद्या उपफांद्या येतात. शेंगा गर्द हिरव्या रंगाच्या असतात. या वाणाचे उत्पादन ओलीताखाली सर्वोत्तम येते. शेंग एका देठावर एकच लागते या वाणाला एकाच हंगामात शेंगा येतात. साइज मध्यम त्यामुळे वजन कमी भरते. दर झाडी पी.के.एम. २ या वाणाचे तुलनेत ४० टक्के उत्पन्न मिळते. शेंगाची लांबी १.५ ते २ फुट असुन शेंगा त्रिकोणी आकाताच्या असतात. पूर्ण वाढलेल्या झाडापासुन सरासरी ३५ ते ४० शेंगा मिळतात.

४) भाग्या (के.डी.एम.०१) : कर्नाटक राज्यातील बागलकोट कृषि विध्यापीठाद्वारे हि जात प्रसारित केली असुन हि जात बारमाही उत्पादन देणारी आहे. ४ ते ५ महिण्यात फलधारणा होत असुन शेंगाची चव उत्तम आहे. प्रति झाड २०० ते २५० शेंगा प्रति वर्ष मिळतात.

५) ओडिसी : हा वाण देखील तामिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसीत केला आहे. हा वाण आज महाराष्ट्रातील स्वतंत्र शेवगा शेतीत तसेच अंतरपीक शेवगा शेतीत आहे.

६) पी.के.एम.१ : हा वाण तामीळनाडू कृषी विद्यापीठाचे पेरीया कुलम फळबाग संशोधन केंद्राने विकसित केला आहे. हा वाण चवदार आहे. शेंगा लवकर येतात. शेंगा दोन ते अडीच फुट लाभ, पोपटी रंगाच्या भरपूर, चविष्ट गराच्या असल्याने देशांतर्गत निर्यातीसाठी चांगली मागणी आहे. या वाणात खालील अनेक वैशिष्टय़े आहेत.
◆रोप लावणी नंतर ६ महिन्यात शेंगा सुरू होतात.
◆शेंगा ४० ते ४५ सें.मी. लांब असतात.
◆या वाणाला महाराष्ट्र वातावरणात वर्षांतून २ वेळा शेंगा येतात.
◆शेंगा वजनदार, चविष्ट, मात्र बी मोठे होत नाही.
◆या वाणाची झाडे ४.५ ते ५ मीटर उंच होतात.
◆दोन्ही हंगामात मिळून ६५० ते ८५० शेंगा ओलीताखाली मिळतात.
◆हि जात अशा लागवड पध्दतीसाठी योग्य ठरते. शेवग्याची छाटणी केल्यानंतर त्याच्या फांद्या पाने जमिनीवर नैसर्गिक आच्छादन म्हणुन टाकली जातात. अशा प्रकारच्या नैसर्गिक आच्छादनामुळे जमिनीची धुप थांबविण्यात मदत मिळते, पाणी बाष्पीभवनाव्दारे उडुन जाण्याचे प्रमाण कमी होते, कालांतराने जमिनीत नैसर्गिक असे सेंद्रियखत देखिल मिसळले जाते.

७) पी. के. एम.२ : हा वाण देखील तामिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसीत केला आहे. हा वाण आज महाराष्ट्रातील स्वतंत्र शेवगा शेतीत तसेच अंतरपीक शेवगा शेतीत आहे.
◆शेवगा शेतीतली खरी क्रांती या वाणानेच केली आहे.
◆भारतात आज ज्ञात असलेल्या सर्व शेवगा वाणात हा वाण विक्रमी उत्पादन देतो. दोन हंगामात ओलीताखाली, छाटणी आणि खतव्यवस्थापन उत्तम ठेवल्यास ८०० ते ११०० शेंगा दर झाडी मिळतात.
◆या वाणाचे शेंगा रुचकर व स्वादिष्ट आहेत.
◆सर्व वाणात लांब शेंगा असणारा हा वाण आहे. शेंगा ७० ते ८० सें.मि. लांब येतात.
◆लांब शेंगा वजनदार शेंगा यामुळे बाजारभाव सर्वोत्तम व सर्वात जादा मिळतो.
◆एका झाडाला एकाच हंगामात २१९० शेंगा मिळवण्याचा विक्रम या वाणाने केला.
◆या वाणात एका देठावर ४-५ शेंगाचा झुपका येतो. हे वैशिष्टय़ इतर कोणतेही जातीत नाही.
◆बेन ऑइलसाठी व पाणी शुद्ध करण्यासाठी याच वाणाला प्राधान्य दिले जाते.
◆सध्या याच वाणाची परदेशी निर्यात केली जाते.
★थोडक्यात पी.के.एम.२ हा वाण लावणे, वाढविणे, जोपासणे योग्य व महत्वाचे आहे. यावरील वाणाखेरीज शेवगा पिकाचे महाराष्ट्रात खालील वाण आढळतात. मात्र ८० ते ८२ टक्के लागवड ओडिसी व पी.के.एम.२ ची आहे. मात्र जादा उत्पादन २ वेळ हंगाम, चव, लांबी या दृष्टीने पी.के.एम.२ सर्वश्रेष्ठ आहे.

१) दत्त शेवगा कोल्हापूर,
२) शबनम शेवगा,
३) जी.के.व्ही.के. १
४) जी.के.व्ही ३,
५) चेन मुरिंगा,
६) चावा काचेरी,
७) कोईमतूर, इ. मात्र जादा उत्पादन २ वेळ हंगाम, चव, लांबी या दृष्टीने ओडिसी सर्वश्रेष्ठ आहे.

पाणी व्यवस्थापन

◆साधारणतः महिन्यातुन एकदा पाणी दिले तरी हे पिक उत्पादन देण्यास सक्षम आहे. शेवगा हे तसे कमी पाण्यात येणारे पिक आहे. ज्यावेळेस पिकाची लागवड हि संरक्षित पाणी उपलब्ध असतांना ड्रिप इरिगेशन न वापरता केली जाते तेव्हा पिकास पाऊस नसतांनाच्या काळात महिन्यातुन एकदा पाणी दिले गेले त्यावेळेस १६.८६ मे.टन इतके उत्पादन प्रती एकर मिळाले (एन आर सी एस २००२) थंबुराज (२००१) यांच्या मते पिकास १० ते १५ दिवसांतुन एकदा पाणी दिले तरी पुरेसे होते.
◆ड्रिप इरिगेशन असेल तर उन्हाळाच्या काळात ८ ते १० लि. पाणी प्रती दिवस ( २ लि. क्षमतेचे ड्रिपर ४ तास) आणि ईतर काळात त्याच्या निम्मे म्हणजेच ४ ते ५ लि. पाणी प्रती दिवस (२ लि. क्षमतेचे ड्रिपर २ तास) दिल्यास पिकापासुन चांगले उत्पादन मिळते.

 छाटणी

◆शेवगा पिकाची २.५ x२.५ मीटरवर लागवड केल्यास एकरी ६४० रोप बसते. (१६०० रोप प्रती हेक्टर) लागवड करण्यापुर्वी ४५ x ४५ x ४५ से.मी. आकाराचे खड्डे घेवुन त्यात शेणखत, गांडुळखत, मॅन्कोझेब, सिंगल सुपर फॉस्फेट मातीत टाकुन त्यानंतर खड्डे भरुन लागवड करावी.
◆शेवगा लागवडीनंतर ७० ते ७५ दिवसांनी त्याचा वाढणारा शेंडा खुडल्यास जास्त प्रमाणात फांद्या मिळुन फळांची संख्या वाढविण्यात मदत मिळते. ६० ते ७५ दिवसांत केलेल्या शेंडा खुडणे या क्रियेमुळे जास्तीत जास्त फांद्या मिळतात, त्यानंतर केलेल्या अशा प्रक्रियेमुळे मात्र हव्या त्या प्रमाणात जास्त फांद्या मिळत नाहीत. एका रोपास ६ ते १० फांद्या ठेवणे फायदेशीर ठरते.
◆शेवग्याचे रोप लागवडीनंतर झाडाची उंची ४ फूट झाल्यानंतर ३ फूट झाड ठेवून वरील सर्व भाग छाटून टाकावा. त्यामुळे बगलफूट होईन. येणाऱ्या नवीन फांद्यांवर शेंगांचे उत्पन्न मिळते. जून जुलैत लागवड केली तर जानेवारी फेब्रुवारीपासून मेपर्यंत शेंगांचे उत्पन्न मिळते. मेमध्ये हंगाम संपल्यानंतर जूनमध्ये छाटणी घ्यावी. छाटणीसाठी फांदी जेथून फुटली आहे, तेथे चार ते सहा इंच फांदी ठेवून वरील सर्व भाग छाटून टाकावा.

फुलोरा आणि फळ धारणा

◆शेवगा पिकांस अनेकवेळेस वर्षभर फुले येत राहतात. परंतु प्रामुख्याने ऑक्टोबर ते नोव्हेंबर आणि एप्रिल ते मे या काळात आर्थिक फायदा मिळवुन देतील इतकी फुले जास्त प्रमाणात मिळतात फुल उमलल्यानंतर परागकण सकाळी ९ ते १० आणि त्याच दिवशी संध्याकाळी ६.३० ते ७ यावळेत जास्त सक्रिय असतात. शेवगा पिकांत परागीभवन क्रियेत मदत करणारे घटक जसे मधमाशी उपलब्ध असल्यास फळ धारणा हि एकुण फुलांच्या ६४ ते ६८ टक्के इतकी असते, तर मधमाशांच्या अनुपस्थितीत फळ धारणा केवळ ४२ ते ४७ टक्के ईतकी असते. म्हणजेच एकंदर ५० टक्के उत्पादन हे केवळ मधमाशांच्या उपस्थितीत वाढते. जे शेतकरी मधमाशा पालन आणि सोबत शेवगा लागवड करु ईच्छितात त्यांनी २० ते २५ शेवगा रोपांच्यासाठी एक मधमाशांचे लाकडी बॉक्स ठेवण्यास हरकत नाही.
◆फुल उमलल्या नंतर ६५ ते ७५ दिवसांत फळ जास्तीत जास्त लांबी आणि वजन प्राप्त करते. शेवगा पिकात फळ काढणीनंतर रोप जमिनीपासुन साधरणतः १ मीटर अंतरावर कापुन टाकतात, जेणे करुन नवीन फुट येवुन त्यावर हवामानानुसार ४ ते ६ महिन्यात पुन्हा फळधारणा होते. तसेच फळे हाताने काढता येतिल अशा उंचीवर रोपाची वाढ होते.

किडी व रोग व्यवस्थापन

शेवगा झाडावर कोणताही रोग आढळून येत नाही. मात्र पावसाळ्यात पाने खाणारी अळी व जाळे तयार करणारा कोळी पिकाचे नुकसान करतो. त्याच्या नियंत्रणासाठी नुवॉन हे कीटकनाशक १० लीटर पाण्यात १५ ते २० मि.ली. घेऊन फवारणी करावी. शिवाय महिन्यातून एकदा ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
शेवगा पिक हे तसे किड व रोगांना प्रतिकारक पिक आहे. या पिकावर सहसा किड व रोगांचा जास्त प्रादुर्भाव दिसुन येत नाही.

१) केसाळ अळी (Eupterote mollifera Walker)
अळीचा रंग हा फिक्कट पांढरा असतो, अळीच्या शरिरावर काळसर रंगाचे केस आढळुन येतात. किडीचा पतंग हा ६ ते ८४ मि.मी. लांबीच्या पखांचा असतो. अळीच्या नियंत्रणासाठी किटकनाशक वापरतांना काळजी घ्यावी, शेवगा हे पिक जास्त क्षमतेच्या किटकनाशकांना तसेच जास्त प्रमाणात वापरल्या जाणा-या किटकनाशकांना फार संवेदनशील असे पिक आहे, त्यामुळे किटकनाशक वापर काळजी पुर्वक करावा.

२) बड वर्म (Noorda moringae Walker)
शेवगा पिकाच्या पानांवर मोठ्या प्रमाणावर हल्ला करते. पिकाची पाने पुर्णपणे नाहीसी करण्याची क्षमता आहे.
३) पाने खाणारी अळी (Noorda blitealis Walker)
◆शेंगांवरिल माशी (Gitona distigma Meigen)
शेवगा पिकाचे ७० टक्केपर्यंत नुकसान करण्याची क्षमता असलेली किड. या किडीच्या नियंत्रणासाठी स्पिनोसॅड (०.२ मिली/लि.) डायक्लोरोव्हॉस (०.५ मिली/लि.) मिथोमिल (१ ग्रॅ/लि.), थायमॅथॉक्झाम (०.२ ग्रॅ/लि.), इमामेक्टिन बेन्झोएट (०.२५ ग्रॅ/लि.), डेल्टामेथ्रीन (०.५ मिली/लि.) यांचा वापर करता येण्यासारखा आहे.
◆साल पोखरणारी अळी (Indarbela tetraonis Moore)

शेवगा पिकावरिल रोग

◆डॅपिंग ऑफ (Pythium aphanidermatum (Edson) Fitzp, P. debaryanum R. Hesse, and Rhizoctonia solani J.G. Kühn)

◆फांदीवरिल कॅकर (Fusarium pallidoroseum (Cooke) Sacc)

♦️खत व्यवस्थापन

◆शेवगा हे पिक तसे रासायनिक खतांच्या बाबतीत फार चोखंदळ असे पिक नाही. शेवगा पिकाच्या शेंगांच्या अन्नद्रव्याचे विश्लेषण केल्यास आपणास दिसुन येते कि, त्यात व्हीटामीन सी – १२० मि.ग्रॅ/१००ग्रॅ. कॅरोटिन ११० मि.ग्रॅ./१००ग्रॅ, फॉस्फोरस ११० मि.ग्रॅ/१०० ग्रॅम, मॅग्नेशियम २८ मि.ग्रॅ/१०० ग्रॅम, पोटॅशियम २५९ मि.ग्रॅ./१०० ग्रॅम, सल्फर १३७ मि.ग्रॅ./१०० ग्रॅम, आणि क्लोरीन ४२३ मि.ग्रॅ./१०० ग्रॅम इतक्या प्रमाणात विविध पोशक तत्वे आढळुन येतात. शेवगा पिकांस एका वर्षाला एका रोपासाठी ८ ते १० किलो चांगले कुजलेले शेणखत द्यावे.
◆तमिलनाडु येथे बागायती परिस्थितीत शेवगा पिकाची लागवड केली असता त्यासाठी प्रती रोप ५६ ग्रॅम नत्र, २२ ग्रॅम स्फुरद आणि ४५ ग्रॅम पालाश आणि अझोस्पिरिलम हे नत्र स्थिर करणारे जीवाणू आणि स्फुरद विरघळवणारे जीवाणु हे लागवडीच्या वेळेस दिले गेले, अशा परिस्थितीत प्रती हेक्टर ४५.९० मे.टन इतके जास्त उत्पादन मिळविण्यात आलेले आहे.
◆(राजेश्वरी आणि मोहिदिन २००४) हंचीनामणी आणि मदालागीरी यांनी धारवाड कर्नाटक येथे केलेल्या संशोधनानुसार १ वर्ष वयाच्या रोपांस प्रती रोप २५० ग्रॅम नत्र, १२५ ग्रॅम स्फुरद, १२५ ग्रॅम पालाश प्रती रोप दिले असता जास्तीत जास्त उत्पादन मिळते ( ११७ शेंगा प्रती रोप, ५.२४ किलो शेंगा प्रती रोप) मात्र आर्थिक नफा हा २०० ग्रॅम नत्र, १०० ग्रॅम स्फुरद आणि १०० ग्रॅम पालाश व्दारे मिळतो.
◆शेवग्याला दर तीन महिन्यांनी अल्प प्रमाणात रासायनिक खते द्यावीत. लागवडीनंतर पहिल्या ३ महिन्यांनी प्रत्येक झाडाला १०० ग्रॅम १८:४६ हे खत द्यावे. पुढच्या तीन महिन्यांनी १०:२६:२६ हे खत १५० ग्रॅम द्यावे व पाणी असल्यास मार्चमध्ये १८:१८:१० हे खत द्यावे याप्रमाणे जसजसे झाडाचे वय वाढत जाईल तसतसे दरवर्षी खतमात्रेत ५० ग्रॅमने वाढ करावी. शेणखत किंवा लेंडीखत वर्षांतून एकदाच जूनमध्ये छाटणी झाल्यानंतर द्यावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी निंबोळी पेंड व गांडूळ खताचा अवश्य वापर करावा.

काढणी आणि उत्पादन

शेवगा लागवडीनंतर जातीनुसार पहिल्या सहा महिन्यांत तोडणीस येतात. पुढे ३ ते ४ महिणे तोडणी चालते. शेंगा मांसल व मध्यम अवस्थेत तोडाव्यात, शेगा काढणी सकाळी लवकर किंवा सायंकाळी करावी. काढणीनंतर विक्रिपुर्वी शेंगाची जाडी, पक्वता, लांबुनुसार प्रतवारी करावी. ताजेपणा टिकण्यासाठी शेंगा ओल्या गोणपाठात गुंडाळुन ठेवाव्यात.एक वर्षानंतर पूर्ण वाढ झालेल्या जातीनुसार प्रत्येक झाडापासुन सरासरी ५ ते ७ किलो शेंगा मिळतात. दुसऱ्या वर्षी १५ ते २० किलो शेंगा मिळतात. पुढे जसजसे झाडाचे वय वाढत जाते तसतसे २५ ते ३० किलो शेंगा मिळतात तसेच उत्पन्नात वाढ होते जाते. जेथे जमीन हलकी आहे. पाणी फेब्रुवारी- मार्चपर्यंतच आहे, अशा ठिकाणी वर्षभरात ३ ते ४ टन शेंगांचे उत्पन्न मिळते. खर्च वजा जाता ३० ते ५० हजार रुपये फायदा होतो. जेथे जमीन मध्यम, भारी आहे वर्षभर पाण्याची सुविधा आहे. अशा ठिकाणी वर्षभरात ५ ते ८ टन शेंगांचे उत्पन्न मिळते ६० ते ८० हजार रुपयांचा फायदा होतो. शेवगा शेतीचे चांगले व्यवस्थापन करून राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी बागायत शेतीतून ७० हजार ते १ लाख २५ हजारापर्यंत उत्पन्न मिळवले आहे. शेवगा शेंगांना स्थानिक बाजारपेठांपासून पुणे, मुंबई बाजारात चांगले दर मिळतात.
◆शेवग्याच्या स्वतंत्र लागवडी बरोबरच आंबा, पेरू, चिक्कू, सीताफळ आवळा यासारख्या फळझाडांमध्ये आंतरपीक म्हणून लागवड करणे फायदेशीर आहे. वरील फळझाडांचे उत्पन्न मिळेपर्यंत शेवगा उत्पन्न देतो, फळझाडांचे उत्पन्न सुरू झाल्यानंतर शेवगा झाडे कमी केली तरी चालू शकतात

संकलन : श्री.प्रविण सरवदे,कराड

श्रोत :- krishicharcha.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top