सोयापेंड निर्यातवाढीचा सोयाबीन दराला आधार मिळेल का ? वाचा संपूर्ण
सोयापेंड निर्यातवाढीचा
Soybean Rate : देशात यंदा सोयाबीन उत्पादनात काहीशी वाढ झाली. तसेच मागील हंगामातील शिल्लक साठाही अधिक प्रमाणात होता. दुसरीकडे सोयातेलावर खाद्यतेलातील मंदाचा दबाव होता. त्यामुळं यंदा सोयाबीन (Soybean) बाजार सोयापेंड (Soyameal) निर्यातीवर टिकून होता.
देशातून यंदा सोयापेंड निर्यातीची गती जास्त आहे. यंदा सोयापेंड निर्यात तब्बल ८७ टक्क्यांनी वाढल्याचे, सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने म्हटले आहे.
देशातील सोयाबीनचा हंगाम सुरु होऊन आता ५ महिने पूर्ण होऊन गेले. यंदा देशातील सोयाबीन उत्पादनात काहीशी वाढ झाली. तर मागील हंगामातील २५ लाख टन माल शिल्लक आहे.
त्यामुळे यंदा सोयाबीनचे गाळप वाढणार आहे. म्हणजेच सोयापेंड उत्पादनही वाढेल. देशातील सोयापेंड वापर यंदा काहीसा वाढणार असला तरी निर्यातीवर बाजाराची भीस्त आहे. Soybean Market
चालू हंगामातील पहिल्या ५ महिन्यांमध्ये सोयापेंड निर्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत ८७ टक्क्यांनी वाढल्याचे सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपाने म्हटले आहे. सोपाच्या मते यंदा देशातून जवळपास ८ लाख टन सोयापेंड निर्यात झाली.
मागील हंगामात याच काळातील सोयापेंड निर्यात ४ लाख २६ हजार टनांवर होती. यंदा व्हिएतनाम, बांगलादेश आणि नेपाळ या देशांकडून सोयापेंडेला मागणी वाढली होती.
भारतातून यंदा सोयापेंड निर्यातीचा वेग जास्त असल्याचे सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक डीएन पाठक यांनी सांगितले.
व्हिएतनामने भारताकडून सर्वाधिक सोयापेंड खरेदी केली. व्हिएतनामने ३ लाख ३६ हजार टन आयात केली. तर नेपाळने ६४ हजार ७५९ टन, अमेरिकेने जळपास ४३ हजार टन, जपान ४३ हजार टन, श्रीलंका ३९ हजार टन, बांगलादेश ३७ हजार टन, थायलंड ३२ हजार टन आणि जर्मनीने १६ हजार टन सोयापेंड आयात केली.
यंदा सोयापेंडला निर्यातीसह स्थानिक पोल्ट्री उद्योगाकडूनही मागणी वाढली. पोल्ट्री उद्योगाकडून यंदा सोयापेंड मागणी १२ टक्क्यांनी वाढली. यंदा पोल्ट्री उद्योगाने २८ लाख ५० हजार टनांची उचल केली.
तर मागील हंगामात याच काळात २५ लाख ५० हजार टनांचा वापर केला होता. तर मानवी आहारातील वापरही ३७ टक्यांनी अधिक झाला. Soybean Market
देशातून यंदा सोयापेंड निर्यात वाढल्यानं सोयाबीन दराला आधार मिळणं आवश्यक होतं. पण सोयाबीनचे दर मागील काही दिवसांपासून दबावातच आहेत.
सोयाबीनला सध्या सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपये भाव मिळत आहे. त्यात सध्या सोयाबीनची आवक वाढली आहे. त्यामुळं पुढील काही दिवस सध्याचे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
अर्जेंटीनात यंदा दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे अर्जेंटीनातून सोयापेंड निर्यात घटली. त्यामुळे भारताच्या सोयापेंडेला मागणी वाढली. किमतीही निर्यातीसाठी पुरक आहेत. यंदा भारतातून १४ ते १५ लाख टन सोयापेंड निर्यात होण्याची शक्यता आहे.
डी. एन. पाठक, कार्यकारी संचालक, सोपा