कृषी महाराष्ट्र

शेणखत आणि सेंद्रिय शेतीचं वास्तव काय आहे ? वाचा संपूर्ण

शेणखत आणि सेंद्रिय शेतीचं वास्तव काय आहे ? वाचा संपूर्ण

शेणखत आणि सेंद्रिय

Organic Farming – शेणाखताचं महत्त्व कोणी मला सांगू लागला की,मला त्याच्या थोबाडीत लगावून त्याचं तोंड बंद करण्याची इच्छा होते.

आणि मग त्याला सांगावं वाटतं, शेणखत हे जमिनीसाठी चांगलंच असतं. हा शोध काही तू लावलेला नाहीस. शेकडो वर्षांपूर्वीपासून आपले पूर्वज शेतकरी ते वापरत होते. फार काय आपल्या वडिलांच्या काळातही शेणखत हेच मुख्य खत होते.

त्यामुळं तू शहाणपण सांगण्याची गरज नाही. आज जनावरांची संख्या कमी झाली असल्याने,त्याची उपलब्धता खूप कमी आहे. सगळी लागवड केवळ या खतावर होऊ शकत नाही.

माझं बालपण मला आठवतयं.शिरूर ताजबंद(जि.लातूर) या गावाच्या पूर्वेच्या टोकाला आमचा वाडा होता.दरवाजालगतच भला मोठा उकंडा होता.बैल,गाई,म्हशी मिळून २०-२५ जनावरं होती.दरवर्षी शेण-कचऱ्यानं हा उकंडा भरायचा.

प्रत्येक वर्षी या उंकड्यातून खत उपसून बैलगाडीतून हा खत शेतात जायचा.घर ते शेत हे साधारण अडिच किलोमिटरचं अंतर.रस्ता एकदम बेकार.साधारण महिनाभर हे खत उचलण्याचं काम चालायचं.

या कामासाठी सालगड्यासोबत एखादा रोजंदारीवरील माणूस असायचा.खत कमरेच्या खाली गेला की,तिसरा माणूस लागायचा.तेव्हा बऱ्याचदा मी गाडीत टोपलं रिकामं करायला असायचो.

अनेकदा त्या ओलसर खताच्या ढिगावर बसून शेतात जायचो.गडी एका वावरात जागोजाग शेणखताचे छोटे छोटे ढिगारे टाकायचा.पुढे महिनाभराने ते ढिगारे रानात पसरले जायचे.शेणखत घातलेल्या रानावर पिक चांगलं येत,हा सगळ्यांचाच अनुभव आहे.

रासायनिक खते बाजारात येईपर्यंत, शेतीला शेणखत हाच एकमेव पर्याय होता.माझे वडील ५२एकर कोरडवाहू शेतीचे मालक असताना आणि घरी एवढी जनावरं असतानाही दररोज टोपलं घेऊन रानावर शेण गोळा करून,उकंड्यावर आणून टाकत.कारण शेणखत ही त्याकाळात शेतकऱ्यांची लक्ष्मी म्हणून ओळखली जाई. शेणखत आणि सेंद्रिय

हातात टोपलं घेऊन शेतपरिसरात शेण,गोवऱ्या वेचण्याचं काम मी ही सातवी- आठवीपर्यंत केलयं. त्याकाळी शेतीत असणाऱ्यांचं हे कामचं होतं.

पुढे हरीत क्रांतीनंतर ,संकरीत बियाणे आणि रासायनिक खतं आली.विविध कारणांनी जनावरं कमी होत गेली.शेणखत दुर्मिळ बनलं.मोजक्या शेतकऱ्यांकडं दोन-चार जनावरं.त्याचा खत किती निघणार.ज्यांच्याकडं हा खत शेतापर्यंत नेण्याची सुविधा नाही, ते विकून टाकतात.

ज्याला शेणखताचं मोल माहित आहे,त्यांची चांगल्या शेणखतासाठी कितीही पैसे मोजायची तयारी असते.दर्जेदार शेणखत तीन हजार रूपये ट्रक्टर दराने विकला जातोय.

कुठलाच सर्वसाधारण शेतकरी शेणखत विकत घेण्याची कल्पना करू शकत नाही.फक्त मुठभर शेतकरीच मर्यादित स्वरूपात शेणखत वापरू शकतात.

शेतीत फक्त शेणखताचाच वापर केला पाहिजे,अशी अक्कल पाजळणाऱ्यांना शेणखताच्या उपलब्धतेचं हे वास्तव माहिती नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो खर्चाचा.रासायनिक खतांच्या तुलनेने शेणखत वापरणं बऱ्यापैकी महागडं आहे.

२०१३ पासून मी म्हशीपालन सुरू केल्यापासून,माझ्याकडं चांगलं शेणखत तयार होतं.शेतीतील मजूर वाढत चालल्यानं,घरचा शेणखतही महाग होत चाललाय.शेतगड्याने किंवा मजुराने उंकड्यात उतरून बैलगाडीत शेणखत भरण्याचा काळ केव्हाच इतिहासजमा झालाय.

आता खत बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशिन आणि ट्रक्टर लागतो.जेसीबी चे तासाला नऊशे रूपये हे दर ठरलेले आहेत.परवा आम्ही जेसीबी आणि बाहेरचा एक ट्रक्टर मागविला.

आमचा छोटा ट्रक्टर होताच.लगतच्या वावरातच खत टाकायचा असल्याने, शंभर रुपये ट्रीप असा दर मी गृहीत धरला होता.त्याच्या नऊ ट्रीप झाल्या.मी हिशोब विचारला तेव्हा त्याने २७००रुपये हिशोब सांगीतला.

कोणालाही विचारा. खताला ३००रूपये ट्रीप हा दर आहे,असं तो म्हणू लागला.शेवटी जेसीबीवाल्याच्या मध्यस्तीने त्याला २००रूपये ट्रीपप्रमाणे १८००रूपये दिले.आमच्या ट्रक्टर सहीत हा खर्च पाच हजार रूपये झाला.

रानात टाकलेल्या खताचे ढिगारे पसरवण्याचे गुत्ते सुरूवातीला सात हजाराला मागीतले.शेवटी पाच हजार दिले तर करू,असं उत्तर आलं.या कामाचे एवढे पैसे मागणे ही सरळसरळ अडवणूक होती.

शेवटी आम्ही हे काम स्वत:च करण्याचा निर्णय घेतला.मी ,सविता,अनिता ,

नरेश असं चौघांनी पाच दिवसात हे काम संपवलं.नाहीतर मजुरीचे हे पाच हजार देणे भाग होते.शेतातील उंकड्यात गोळा करण्यात आलेला तेरा-चौदा ट्रक्टर शेणखत रानावर टाकण्यासाठी दहा हजार रूपयांचा खर्च कुठल्याच अर्थाने परवडणारा नाही.

हा खत एक एकर जमिनीला पुरेसा ठरला.खताची बाजारातील किमत सुमारे तीस हजार आणि हे दहा हजार , असा एकूण चाळीस हजारात हा शेणखत पडला.पाच एकर जमीन शेणखताने बुजवायची असेल तर,दोन लाख रूपये लागतील.

मात्र जास्तीत जास्त दहा-बारा हजाराचा रासायनिक खत पाच एकरला दोन डोस दिले तरी पुरेसा होता.सेंद्रिय शेती स्वस्त आहे की महाग हे समजून घेण्यासाठी मी हा वास्तव अनुभव नोंदवतोय.

पिकांना रासायनिक खत वापरला नाही की,झाली सेंद्रीय शेती,असा अनेकांचा गैरसमज आहे.रासायनिक खत तर वापरायचा नाहीच,शिवाय कुठलीही रासायनिक तणनाशके, किटकनाशके वापरायची नाहीत, हा ही नियम आहे.

माझा नातेवाईक-मित्र चार वर्षांपासून सेंद्रीय शेती करतोय.वर्षांतून किमान दोनवेळा मी त्याच्याकडं जातो.या आठवड्यात त्याच्याकडं जाऊन आलो.आमची सेंद्रीय शेतीवर घमासान चर्चा होते.चार वर्षांपूर्वी त्याचं म्हणणं असं होतं की,सेंद्रिय शेती कमी खर्चाची आहे.

सगळ्यांनी ती केली पाहिजे.गेल्या चार वर्षांच्या अनुभवातून त्याला खूप काही शिकायला मिळालंय.आता तो अनुभवाचे बोल बोलतोय.सेंद्रीय शेती करणं ही खूप आव्हानात्मक बाब आहे.सामान्य शेतकऱ्यांना ते शक्य नाही.

यासाठी भरपूर भांडवल लागतं.यासाठी मनुष्यबळ लागतं व त्यावर पुरेसे पैसे खर्च करण्याची तयारी लागते.केवळ एवढ्यावरच भागत नाही तर तुम्हाला तुमचा हक्काचा ग्राहक तयार करावा लागतो.पाच वर्षांपूर्वी मी जे म्हणत होतो,ते तो आता अनुभवाने बोलतोय.

पिकांची रासायनिक खतं बंद करणं फारसं अवघड नाही. मात्र तणनाशकांचा वापर थांबवणं अशक्य आहे.शेतीत मनुष्यबळाचं संकट आहेच.करोनामुळं ते सुसह्य होईल,हा गैरसमज आहे.शहरात काम करणाऱ्यांना शेतीतील काम जमतील,झेपतील याची खात्री देणं अवघड आहे.

सध्या शेतीत जी मजुरी आहे, ती कोरडवाहू शेतकऱ्यांना परवडणारी नाही. कमीत कमी मजुरांचा वापर करणे,एवढाच एक पर्याय आहे.तणनाशकांचा वापर केला नाही तर,तणांवर नियंत्रण आणणे अशक्य आहे.माणसांमार्फत ही तणं काढणं खूप खर्चिक आहे.शिवाय या कामासाठी मजूर उपलब्ध होतील ,याची कसलीही खात्री नाही.

मी माझ्या पिकांना रासायनिक खतं देणं बंद करायला तयार आहे.मात्र पिकातील ही विविध प्रकारची हानिकारक तणं सेंद्रीय पध्दतीने कशी संपवायची,हे मला सांग.तो म्हणाला,या समस्येवर उत्तर नाही. मजुरांकडूनच हे तण काढावं लागेल….

त्याचा हा माणसांमार्फत तण काढण्याचा खर्च डोळे फिरवणारा आहे.तो दुसऱ्या व्यवसायात स्थिर आहे त्याच्याकडं भांडवल आहे.तोटा सहन करण्याची क्षमता आहे.त्याला शेतीची,नवे प्रयोग करण्याची आवड आहे. तो भरपूर मेहनत घेतो.अपयशाने खचत नाही.

त्यांचा हा सेंद्रीय शेतीचा प्रयोग कौतुकास्पद आहे.ज्यांना शक्य आहे,त्यांनी तो जरूर करावा. मात्र सर्वसाधारण शेतकरी ही सेंद्रीय शेती करू शकणार नाहीत, हे वास्तव आहे.सरकारने ही सेंद्रीय शेती शेतकऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न केला तरी,यशस्वी होणार नाही. कारण ती व्यवहार्य नाही.

रासायनिक खतांचा कुठे अतिरेकी वापर होत असेल तर तो कमी व्हायला हवा. पण या खतांचा वापरच बंद केला तर,उत्पादनाला मोठा फटका बसू शकतो.सेंद्रिय शेतीची सुरूवात करायची तर त्यासाठी सरकारला धोरण ठरवावे लागेल.त्या उत्पादनाला चांगली किमत मिळवून द्यावी लागेल.खात्रीची बाजारपेठ निर्माण करावी लागेल.तोपर्यंत सेंद्रीय शेती हे मृगजळचं ठरेल.

source : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top