कृषी महाराष्ट्र

जमिनीची धूप रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्या ? वाचा सविस्तर

जमिनीची धूप रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्या ? वाचा सविस्तर

 

Indian Agriculture : शेतीचा आत्मा म्हणजे जमीन. त्यामध्येच पिकाची वाढ होत असते. मात्र वारा पाऊस इ. मुळे जमिनीची धूप होऊन जमिनीचा सुपीक, उत्पादक व अन्नद्रव्ययुक्त असा थर वाहून जातो.

हळूहळू जमीन नापीक होत जाते. हे टाळण्यासाठी जमिनीची धूप होण्याची कारणे, परिणाम आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती घेऊ.

जमिनीची धूप होणे म्हणजे काय ?

जमिनीच्या भूपृष्ठावरील माती अथवा मृदा यांचे कण एकमेकांपासून वेगळे होऊन त्याचे एका जागेवरून दुसऱ्या जागी वहन होते. मातीचे कण आपल्या जमिनीतून निघून जाऊन अन्यत्र स्थिरावणे म्हणजेच जमिनीची धूप होय.

विदारण प्रक्रिया म्हणजे काय ?

खडक, दगड व वाळू यांच्यावर ऊन, वारा, पाऊस, थंडी व उष्णता अशा हवामानातील विविध घटकांचा परिणाम होतो. त्यांचे मातीमध्ये रूपांतर होते.

या प्रक्रियेला ‘विदारण प्रक्रिया’ (Weathering) असे म्हणतात. ही अत्यंत सावकाश होणारी प्रक्रिया असून, खडकापासून माती तयार होण्यास अनेक वर्षे लागतात.

जमिनीची धूप का होते ?

नैसर्गिक प्रक्रियेमध्ये जमिनीची धूप होण्याची वातावरणीय कारणे असली, तरी जमिनीसह विविध घटकांमध्ये होत असलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे मातीची धूर प्रचंड वाढली आहे.

त्यामागील कारणांमध्ये चुकीची मशागत पद्धती, नदी, ओढे, नाले यावर अतिक्रमण झाल्याने अचानक बदलणारे प्रवाह, जमिनीच्या नैसर्गिक चढ-उतारामध्ये छेडछाड करणे ही प्रमुख कारणे दिसून येतात.

जमिनीच्या सपाटीकरणाच्या नादामध्ये मातीचा चांगला सुपीक थर मातीखाली जाण्याचे प्रमाणही वेगाने वाढले आहे. अशा अनेक कारणांमुळे शेतीयोग्य जमिनीदेखील पडीक होत आहेत. Soil Erosion

जमिनीची धूप होण्याची कारणे

जमिनीची रचना : जमीन समतल आहे की उताराची यावर जमिनीची धूप अवलंबून असते. उताराच्या जमिनीवर पाण्याच्या प्रवाहाला गती मिळून जमिनीची अधिक धूप होते.

बेसुमार वृक्षतोड : पावसाचे थेंब वृक्षाच्या पर्णसंभारावर पडल्यावर त्यांचा वेग संथ करतात. वृक्षांच्या मुळांमुळे माती घट्ट धरून ठेवली जाते. झाडांची तोड झाल्यामुळे पावसाचा प्रत्यक्ष आघात जमिनीवर होतो. मोकळी झालेल्या मातीची धूप होते.

शेतीतील मशागत : शेतामध्ये केलेल्या मशागतीमुळे मातीचे कण मोकळे होतात. पाण्याच्या प्रवाहातही बदल होतो. माती वाहून जाण्यास मदत होते.

हवामान : एखाद्या विशिष्ट प्रदेशात हवामान कोणत्या प्रकारचे आहे, यावरून देखील धूप होण्याची तीव्रता ठरते.

जास्त पाऊसमान असणाऱ्या प्रदेशात पावसामुळे, तर तापमानामध्ये भिन्नता असणाऱ्या प्रदेशांमध्ये जमिनीच्या आकुंचन व प्रसारण पावल्यामुळे मातीचे कण सुट्टे होतात. ते वाऱ्यासोबत दूरवर वाहून नेले जातात.

मनुष्य व प्राणी : माती व परिसरातील निसर्गामध्ये सातत्याने हस्तक्षेप करत असल्यामुळे जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होते. तसेच पाळीव व जंगली प्राणी यांच्या विविध हालचालींमुळे जमिनीची धूप होते.

विविध कारणामुळे मोकळी झालेली माती पाणी किंवा वाऱ्यासोबत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर वाहून जाते.

जमिनीच्या धुपेचा परिणाम

वालुकामय मृदेची निर्मिती : जमिनीच्या धुपेमुळे वजनाने हलकी मात्र अन्नद्रव्ययुक्त अशी कसदार माती वाहून जाते. मात्र वजनाने अधिक असलेले वाळूचे खडे, दगड, गोटे वाहत नाहीत. वालुकामय मृदेची निर्मिती होते.

सुपीक मातीचा विनाश : धुपेमुळे अन्नद्रव्ययुक्त कसदार मातीचा थर वाहून गेल्याने जमिनीची उत्पादकता घटते. जमिनीची सुपीकता कमी होते.

पाणीसाठ्याची टंचाई : सातत्याने जलाशयांमध्ये मातीचे अथवा गाळाचे स्थिरीकरण होत गेल्यामुळे जलाशयांची जलधारण क्षमता कमी होते. पाणीसाठा कमी राहिल्याने भविष्यात पाणीटंचाई भासू शकते.

जमिनीची धूप रोखण्यासाठी उपाययोजना

१) जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी शक्य तितक्या प्रमाणात जागेवरच मुरवावे.

२) पिकांची फेरपालट करावी. माती धरून ठेवणाऱ्या पिकांचा मिश्र पीक पद्धतीत अवलंब करावा.

३) शेतातील मशागत उताराच्या दिशेने करण्याऐवजी उताराला आडवी करावी.

४) शेतामध्ये समपातळी बांधबंदिस्ती सारख्या उपाययोजनांचा वापर करावा.

५) उताराच्या जमीन अथवा डोंगर उतारावर पायऱ्यांची मजगी म्हणजेच पायऱ्यांची शेती करावी.

६) नाला बंदिस्ती सारख्या योजना राबवाव्यात.

७) मोकळ्या जमिनीवर वृक्ष लागवड करणे. शक्य तिथे बांधावर व मोकळ्या जागेत गवताची लागवड करावी. Soil Erosion

जमिनीच्या धुपेचे प्रकार

उसळी धूप

जेव्हा पावसाचा थेंब जमिनीवर पडतो, तेव्हा त्याला असलेल्या प्रचंड गतीमुळे तो जमिनीवरील मातीचे कण वेगळे करतो. त्या ठिकाणी थेंबाच्या आकाराचा खड्डा पडतो. धुपीचा हा प्रकार नैसर्गिक व साधा वाटत असला तरी धुपेची खरी सुरुवात येथूनच होते.

ओघळ धूप

ज्या वेळेस पावसाचे अनेक थेंब जमा होतात, तेव्हा ते उताराच्या दिशेने वाहू लागतात. वाहताना मोकळे झालेले मातीचे कण सोबत घेऊन वाहत जातात. अशा प्रवाहाच्या जागेवर लहान लहान ओघळ निर्माण होतात. हा जमिनीच्या धुपीचा दुसरा टप्पा होय.

चादर धूप

जेव्हा अशा असंख्य लहान लहान ओघळी एकत्र येतात, तेव्हा जमिनीचा एक विशिष्ट पृष्ठभागच पाण्याबरोबर वाहून जातो. त्याला इंग्रजीमध्ये रन ऑफ (Runoff) म्हणतात. या उथळ मात्र विस्तारित प्रवाहाद्वारे मातीचा प्रचंड मोठा भाग वाहून नेला जातो.

घळी धूप

ज्या वेळेस दीर्घ कालावधीसाठी पाण्याचा प्रवाह वाहत असतो, त्या वेळेस त्या प्रवाहाच्या तळाची झपाट्याने झीज व्हायला लागते. हळूहळू प्रवाहाचे रूपांतर नाला, ओढा अथवा नदीमध्ये होऊ लागते. सातत्याने वाहत असलेल्या पाण्यामध्ये खोलगट घळी पडतात, म्हणून याला घळी धूप असे म्हटले जाते.

प्रवाहाच्या काठांची धूप

प्रवाह स्थिर किंवा तीव्र गतीने वाहताना प्रवाहाच्या दोन्ही काठांना असणारी मातीही वाहून नेली जाते. त्याला प्रवाहाच्या काठाची धूप असे म्हणतात.

डॉ. रवींद्र जाधव, ९४०३०१६१०१, (सहायक प्राध्यापक, मृदा व कृषी रसायनशास्त्र विभाग, सौ. के.एस.के. (काकू) कृषी महाविद्यालय, बीड)

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top