Soybean Market : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव कशामुळे वाढला ? आजून भाव किती वाढू शकतो ?
Soybean Market : पुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव एक टक्क्याने वाढले होते. देशात मात्र सोयाबीनच्या दरात क्विंटलमाग ५० रुपयांचे चढ उतार सुरु आहेत. देशातील सोयाबीनची भावपातळी पुढील काळात ५ हजार ५०० रुपयांपर्यंत वाढू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
आज दुपारपर्यंत सीबाॅटवर सोयाबीनमध्ये जवळपास एक टक्क्याची वाढ होऊन भाव १३.२५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. रुपयात सांगायचे झाले तर हा भाव ४ हजार ५० रुपये होतो. तर सोयापेंडचे वायदे ४३४ डाॅलरवर होते.
रुपयात हा भाव ३६ हजार १३६ रुपये प्रतिटन होतो. आता भारताचं पाहू. आता आपल्याकडं तर वायदे बंद आहेत. पण बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला ४ हजार ४०० ते ४ हजार ६०० रुपयांचा भाव मिळाला. तर सोयापेंड ४२ हजार ते ४३ हजारु रुपये प्रतिटनाने विकले जात आहे.
आता सीबाॅटवर म्हणजेच अमेरिकेत सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात वाढ का झाली? तर याचे मुख्य दोन कारणं सांगता येतील. पहिलं कारण आहे, बायोफ्यूल म्हणजेच जैवइंधनासाठी सोयातेलाला मागणी वाढत आहे.
त्यामुळे सोयातेलाचे भावही वाढले. तसचं अमेरिकेच्या काही भागात पावसाची कमतरता आहे. याचाही परिणाम सोयाबीनच्या दरावर दिसून येत आहे. दुसरं आणि महत्वाचं कारण आहे सोयाबीन आणि सोयापेंडला येत असेलेली मागणी.
अर्जेंटीनात मागच्या हंगामात सोयाबीन उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं होतं. यामुळं अर्जेंटीनातून सोयातेल आणि सोयापेंड निर्यात कमी झाली. त्यातच ब्राझीलमध्ये सोयाबीन निर्यातीसंबंधी अडचणी होत्या. त्यामुळं अमेरिकेच्या सोयाबीनला उठाव मिळाला. चीनने यंदा अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात आयात केली. आताही आयात सुरु आहे. यामुळे सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात वाढ दिसून येत आहे, असे अभ्यासकांनी सांगितले.
भविष्यातलं काय आहे सूत्र ?
मग यापुढील काळात सोयाबीनचा बाजार कसा राहू शकतो? तर आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम आपल्याही बाजारावर होणार हे नक्की. यंदा ब्राझीलमध्ये आतापर्यंतचं विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. अर्जेंटीनाच्या उत्पादनातही सुधारणा होणार आहे. पण ही सुधारणा किती होते? ते पाहावे लागेल. कारण दोन्ही देशांमध्ये आताकुठं पेरणी सुरु आहे.
पण उत्पादनात वाढ होणार असं मानलं जातं. पण ब्राझीलमध्ये उत्पादन वाढलं तरी आशियात माल आणायला जास्त खर्च येतो. कमी प्रमाणात मालही आणता येत नाही. त्यामुळं आपल्या शेजारचे देश आपल्याकडून सोयापेंड घेतात. सध्या देशातून सोयापेंड निर्यातीचे सौदेही सुरु झाले. जवळपास २ लाख टनांचे सौदे झाल्याची माहिती आहे.
सरत्या ऑक्टोबर महिन्यात खाद्यतेल आयातही कमी झाली. पण आधीचा स्टाॅक जास्त आहे. या सर्व कारणांनी सोयाबीनचा भाव सध्याच्या दरावरून कमी होण्याची शक्यता कमीच आहे. तर सध्याच्या बाजारातील परिस्थितीवरून सोयाबीनची भावपातळी पुढच्या काळात ५ हजार ५०० रुपयांपर्यंत वाढू शकते, असाही अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. Soybean Market
देशातील बाजारावर कशाचा दबाव ?
मग भारतात सोयाबीन का स्थिर आहे? आणि पुढील काळात बाजार कसा राहू शकतो? तर आपण याआधीही चर्चा केली. की देशातील सोयाबीनवर खाद्यतेलाचे भाव पडल्याचा दबाव आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात आतापर्यंत सोयापेंडचे भाव कमी होते. Soybean Market
त्यामुळे सोयाबीन दबावात होते. पण दोन आठवड्यांपुर्वी जसं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंड ४०० डाॅरवरचा टप्पा पार करून वर गेले देशातही सोयाबीनचे भाव क्विंटलमागं १०० ते २०० रुपयांची सुधारणा झाली. भावपातळी सरासरी ४ हजार ४०० वर होती ती आता ४ हजार ६०० च्या दरम्यान पोचली.