कृषी महाराष्ट्र

PM Kisan : ‘पीएम, नमो’चा हप्ता महिना अखेर !

PM Kisan : ‘पीएम, नमो’चा हप्ता महिना अखेर !

 

PM Kisan : लोकसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पीएम किसान योजनेचा १६ वा आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती या महिन्याच्या २८ तारखेला जमा होण्याची शक्यता आहे.

या आधीच राज्य सरकारने दुसऱ्या हप्त्यासाठी १७९२ कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. लगेचच तिसऱ्या हप्त्यापोटी २ हजार कोटींच्या वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. अहमदनगर येथे होत असलेल्या कार्यक्रमांमध्ये या तिन्ही हप्त्यांची सहा हजार रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात येणार आहे. PM Kisan

सध्या देशात शेतकरी आंदोलनाची पार्श्वभूमी आणि कांदा निर्यात बंदीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. शेतीमालाच्या भावामध्ये चढ-उतार आणि अन्य कारणांमुळे शेतकरी असंतुष्ट आहे याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसू शकतो याचे आडाखे राज्य व केंद्र सरकारने बांधले आहेत. त्यावर काहीसा असंतोष शिथिल करण्यासाठी या दोन्ही योजनांचे तीन हप्ते एकत्रित करण्याचे नियोजन सरकारने केले आहे.

मागील अर्थसंकल्पी अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये देण्याचे नियोजन होते. मात्र पहिला आणि दुसरा हप्ताच रखडल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रतीक्षा होती. आता ही प्रतीक्षा पूर्ण करत राज्य सरकारने दोन हप्ते एकत्र देण्याचे नियोजन केले आहे.

अर्थसंकल्पानंतर एप्रिल ते जुलैचा पहिला हप्ता आणि ऑगस्ट ते नोव्हेंबरचा दुसरा हप्ता देणे अपेक्षित होते. मात्र दुसऱ्या हप्त्यासाठी फेब्रुवारी उजाडला आहे. आता तिसरा हप्ता देऊन शेतकऱ्यांना खूष करण्यासाठी २८ तारखेचा मुहूर्त निवडण्यात आला आहे. PM Kisan

राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मानच्या पहिल्या हप्त्यासाठी १७२० कोटी आणि दुसऱ्या हप्त्यासाठी १७९२ कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. या दोन्ही हप्त्यांची रक्कम ३१२ कोटी रुपये होते आता यामध्ये आणखी दोन हजार कोटींची भर पडली असून ५५१२ कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहेत.

ज्या शेतकऱ्यांना सोळावा हप्ता वितरित करण्यात येणार आहेत, त्या शेतकऱ्यांना तिसरा हप्ता देण्यात येणार होता. मात्र राज्य सरकारचे दोन हप्ते आणि केंद्र सरकारचा सोळावा हप्ता एकत्रित होणार असल्याने शेतकऱ्यांची आकडेवारी निश्चित नाही. त्यामुळे वाढीव शेतकऱ्यांची आकडेवारी गृहीत धरून दोन हजार कोटी वितरणास मान्यता देण्यात आली आहे.

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नियोजन

लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या असंतोषाचा फटका बसू नये यासाठी केंद्र सरकारने पुरेपूर काळजी घेतली आहे. त्यामुळे हे तीन हप्ते वितरित करण्यासाठी पंतप्रधान कार्यालय आणि देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय कामाला लागले आहे. हे हप्ते कधी आणि कसे वितरित होणार याबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे.

त्याचे नियोजन थेट वरिष्ठ पातळीवरून होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हप्त्यांचे वितरण करून त्याचे श्रेय लोकसभा निवडणुकीत घेण्याचे पुरेपूर नियोजन करण्यात आले आहे.

source : agrowon.esakal.com

PM Kisan

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top