Agricultural Loan : राज्य सहकारी बँकेची योजना ? शेतमालावर आता ४ तासात कर्ज ! वाचा सविस्तर
Agricultural Loan
पुणे : गोदामात ठेवलेल्या शेतमालाच्या आधारे शेतकऱ्यांना त्वरित कर्ज मिळावे, यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने पुढाकार घेतला आहे. या योजनेत शेतकऱ्यांना अवघ्या चार तासांत शेतमालाच्या किमतीच्या ७० टक्के कर्ज ऑनलाइन उपलब्ध होत आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या सहकार्याने राबवल्या जात असलेल्या या योजनेत बँकेतर्फे आतापर्यंत राज्यभरात १०० कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे.
बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. वखार महामंडळाचे सल्लागार व नोडल ऑफिसर अजित रेळेकर, ब्लॉक चेन प्रणाली तज्ज्ञ आशिष आनंद व बँकेचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे उपस्थित होते.
‘वखार महामंडळ, व्हर्ल कंपनी व जागतिक बँक अर्थसहाय्यित बाळासाहेब ठाकरे कृषी ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट प्रकल्प) अंतर्गत विकसित ब्लॉक चेन संगणक प्रणालीद्वारे ही कर्जप्रक्रिया पार पडते. मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे किंवा महामंडळाच्या राज्यातील २०२ गोदामांमध्ये जाऊन शेतकरी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
ऑनलाइन ओळख पडताळणी प्रक्रिया (केवायसी) पार पडल्यानंतर शेतकऱ्याचा अर्ज ब्लॉक चेन तंत्रज्ञानाद्वारे थेट बँकेच्या मुख्यालयात येतो. कागदपत्रांची छाननी करून ऑनलाइन पद्धतीनेच शेतकऱ्याच्या गोदाम पावतीवर कर्जाचा बोजा चढवून खात्यात कर्जाची रक्कम जमा होते. (Agricultural Loan)
आतापर्यंत ४,५४३ अर्जांद्वारे बँकेने शंभर कोटी रुपयांचे कर्जवितरण केले आहे,’ असे अनास्कर यांनी सांगितले.
‘पूर्वी गोदामात ठेवलेल्या शेतमालावर कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना किमान चार दिवस थांबावे लागत होते. आता कर्ज अवघ्या चार तासांत मिळते. संबंधित शेतकरी राज्य सहकारी बँकेचा खातेदार नसला तरीही कर्ज मिळते. आतापर्यंत सोयाबीन, हळद, तूर, मका, हरभरा डाळ आदींसाठी शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे,’ असे रेळेकर यांनी सांगितले आहे.
या अभिनव योजनेस राज्य सरकारने व्याज अनुदान दिल्यास शेतकऱ्यांना पाच टक्के दरानेही कर्ज उपलब्ध होईल. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, असं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सांगितलं आहे.
source : maharashtratimes