कृषी महाराष्ट्र

यंदा हरभऱ्याला चांगला भाव मिळण्याचा अंदाज

यंदा हरभऱ्याला चांगला भाव मिळण्याचा अंदाज

 

देशात सध्या नव्या हरभऱ्याची आवक (Chana Arrival) होत आहे. मात्र दर अद्यापही दबावातच आहेत. त्यातच यंदा हरभरा उत्पादन (Chana Production) घटण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. सध्या हरभऱ्याला किमान दरात (Chana Rate) उठावही मिळत आहे.

तसंच सरकार हमीभावानेही खरेदीत उतरणार आहे. मग या स्थितीत हरभरा बाजार (Chana Market) कसा राहील? हरभरा भाव वाढतील का? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.

1. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेजीत

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीनच्या दरानं आठ महिन्यांतील उच्चांकी टप्पा गाठला होता. दुपारी एक वाजेपर्यंत सोयाबीनचे वायदे १५.४४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते.

सोयातेल आणि सोयापेंडच्या दरातही वाढ झाली होती. मात्र देशातील बाजारात प्रक्रिया प्लांट्स आणि बाजारातील सोयाबीन दर स्थिर होते.

आज देशातील सरासरी दरपातळी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होती. देशातील बाजारातही सोयाबीन दरात पुढील काही दिवसांमध्ये वाढ होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

2. कापसाचे भाव आजही कायम

देशातील बाजारात कापसाचे भाव आजही कायम होते. मागील आठवड्यात कापसाचे भाव नरमले होते. ती दरपातळी आजही टिकून आहे.

सध्या देशातील बाजारात कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपये दर मिळतोय. तर आंतरराष्ट्रीय बाजारात आज कापसाचे भाव काहीसे वाढले होते.

दुपारी एक वाजेपर्यंत कापसाला सरासरी ६४.३९ सेंट प्रतिपाऊंडचा दर मिळाला. देशातील दरपातळीही पुढील काही दिवसांमध्ये वाढू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

3. गव्हाचे दर विक्रमी पातळीवर

देशात सध्या गव्हाचे भाव तेजीत आहेत. बाजारातील आवकही कमीच आहे. राज्यातील बाजारातही गव्हाची आवक मोठ्या बाजार समित्या वगळता १० ते २० क्विंटलपेक्षा कमीच आहे.

त्यामुळं गव्हाला सध्या चांगला दर मिळतोय. राज्यातील बाजारात गव्हाला ३ हजार ते ३ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय.

गव्हाचे दर पुढील काही काळ टिकून राहतील, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

4. टोमॅटो बाजारात कहीशी सुधारणा

राज्यातील बाजारात टोमॅटोची आवक काहीशी घटली. त्यामुळं दरातही काहीशी वाढ पाहायला मिळाली.

सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी ६०० ते ९०० रुपये दर मिळतोय. मागील आठवड्यापर्यंत सरासरी दरपातळी २०० रुपयाने कमी होती.

पुढील काळात टोमॅटोचे दर नरमल्यानंतर दरात आणखी सुधारणा दिसू शकते, असा अंदाज टोमॅटो बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

5. देशातील हरभरा बाजारात सध्या नरमाई कायम आहे.

मागील वर्षभरापासून हरभरा दर दबावात आहेत. यंदा हरभरा लागवड कमी झाली. सरकारच्या आकड्यानुसार केवळ दोन टक्के हरभरा लागवड कमी झाली. मात्र शेतकरी आणि जाणकारांच्या मते देशातील हरभरा लागवडीतील घट जास्त आहे. त्यामुळं यंदा देशातील हरभरा उत्पादनात घट होईल, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

देशातील बाजारात सध्या नव्या हरभऱ्याची आवक होत आहे. नव्या मालाता ओलावाही काहीसा अधिक येतोय. मात्र गुणवत्ता चांगली असल्याचं व्यापारी सांगत आहेत. पण या हरभऱ्याला ४ हजार ७०० ते ४ हजार ९०० रुपये दर मिळतोय.

यंदा सरकारनं हरभऱ्यासाठी ५ हजार ३३५ रुपये प्रतिक्विंटलचा दर जाहीर केला. म्हणजेच सध्या बाजारात मिळणारा दर हमीभावापेक्षा कमी आहे.

पण सध्या हरभऱ्याला किमान दरात उठाव मिळतोय. यंदा उत्पादन घटीचा अंदाज आत्तापासूनच व्यक्त केला जातोय. त्यामुळं स्टाॅकिस्ट आणि प्रक्रियादार हरभरा खेरदीत उतरु शकतात. त्यामुळं हरभरा मागणी वाढेल.

त्यातच आता गुजरात सरकारनं हमीभावाने हरभरा खेरदीची प्रक्रिया जाहीर केली. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही हमीभावाने खरेदी सुरु होईल. सरारच्या हमीभाव खरेदीचाही हरभरा दराला आधार मिळेल, असं जाणकारांनी सांगितलं.

Source : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top