इंडो-इस्राईल तंत्रज्ञान वापरामुळे वाढली संत्रा बागेची उत्पादकता : संपूर्ण माहिती
इंडो-इस्राईल
नागपुरी संत्रा (Orange) बागेमध्ये कमी उत्पादकतेसोबतच फायटोप्थोरा नियंत्रण आणि फळांचा दर्जा राखणे अशीही आव्हाने होती. त्या संदर्भात भारत (India) आणि इस्राईलदरम्यान (Israel) करार २००७-०८ या वर्षात झाला.
त्यानुसार संत्रा गुणवत्ता केंद्र स्थापण्याचा निर्णय झाला. अशी केंद्रे पंजाब (Pamjab), हरियाना (Hariyana) येथे किन्नो फळासाठी, राजस्थान आणि महाराष्ट्रामध्ये संत्रा पिकासाठी (Orange Crop) उभारली गेली.
२०१०-११ मध्ये नागपूर कृषी महाविद्यालय अंतर्गत या गुणवत्ता केंद्र स्थापन झाले. त्याचे ‘क्लस्टर हेड’ म्हणून डॉ. देवानंद पंचभाई यांनी जबाबदारी सांभाळली होती.
नागपुरी संत्र्याची उत्पादकता आठ ते नऊ प्रति हेक्टरपर्यंत खाली आली आहे. त्यामागे प्रामुख्याने भारी आणि निचरा न होणारी जमीन, फायटोप्थोरा प्रादुर्भाव आणि व्यवस्थापनातील काटेकोरपणाचा अभाव अशी काही कारणे होती.
उत्पादकता वाढीसाठी केले जाणारे प्रयोग आणि प्रयत्न विद्यापीठ प्रक्षेत्रासोबतच शेतकऱ्यांच्या शेतावरही करण्याची आवश्यकता होती.
त्यामुळे या प्रकल्पामध्ये प्रात्यक्षिकांसाठी सात शेतकऱ्यांची निवड केली. सघन व गादी वाफ्यावर लागवड पद्धतीने सात मॉडेल फार्म विकसित केले.
पारंपरिक पद्धतीमध्ये जमिनीवर तयार केलेल्या रोपांमध्ये फायटोप्थोरा बुरशीचा शिरकाव होऊ शकतो. त्याच प्रमाणे रोपांच्या स्थलांतरप्रसंगी मुळे तुटण्याची शक्यता असते.
हे टाळून रोगमुक्त झाडांच्या उपलब्धतेसाठी विद्यापीठ स्तरावर गुणवत्ता केंद्रातून आदर्श रोपवाटिका तयार केली गेली.
येथे ८ बाय १२ इंच आकाराच्या प्लॅस्टिक पिशवीत रोपे तयार केली जात असल्यामुळे तंतुमय मुळांची संरचना चांगली तयार होते. अशी रोपे पुनर्लागवडीमध्ये जगण्याचे प्रमाण १०० टक्के राहते.
१) जमिनीतील रोपांची लागवड पावसाळ्यातच करावी लागते. तुलनेमध्ये पिशवीत तयार केलेली रोपे हिवाळ्यापर्यंत (डिसेंबर, जानेवारी) लावता येतात. म्हणजेच खरीप पिकांच्या काढणीनंतरही फळबाग लागवड शक्य होते.
२) नागपूरप्रमाणेच काटोल, अकोला आणि अचलपूर येथील प्रादेशिक संशोधन केंद्रावरही अशीच रोपवाटिका विकसित केली गेली.
कृषी विभागाच्या गौंडखेरी, सुसुंदरी रोपवाटिकेतून याच तंत्रज्ञानावरील रोपे उपलब्ध केली जात आहेत. महाराष्ट्र फलोत्पादन मंडळाच्या आर्थिक सहकार्यातून हे काम उभे झाले आहे.
गादी वाफ्यावर देशात पहिल्यांदाच लागवड
उत्पादकता, गुणवत्ता सुधारणा आणि फायटोप्थोरा नियंत्रण या उद्देशाने गादी वाफ्यावर संत्रा लागवडीचा प्रयोग देशात प्रथमच करण्यात आला. गादीवाफ्याचा आकार तीन मीटर रुंद आणि ५० सेंमी उंच असा ठेवताना दिशा उत्तर-दक्षिण ठेवण्यात आली.
या वाफ्यावर अभ्यासासाठी सहा बाय सहा मीटर, सहा बाय तीन मीटर, सहा बाय चार मीटर, सहा बाय दोन मीटर अशा विविध अंतरांवर लागवड केली गेली.
नागपूर, अमरावती जिल्ह्यांत ७ प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्येकी एक हेक्टरवर एक या प्रमाणे सात मॉडेल फार्म विकसित करण्यात आले.
या प्रयोगातून गादी वाफ्यावर सहा बाय तीन मीटर अंतर विदर्भासाठी योग्य असल्याचे लक्षात आले. त्यानुसार तशी शिफारस करण्यात आली. या अंतरानुसार हेक्टरी झाडाची संख्या ५५५ राहते.
पारंपरिक पद्धतीमध्ये केवळ २७७ इतकीच झाडे बसत. हेक्टरी झाडांची संख्या अधिक ठेवण्याचे हेच तंत्रज्ञान इंडो-इस्राईल संत्रा लागवड तंत्रज्ञान म्हणून नावारूपास आले.
या तंत्रज्ञानामध्ये गादी वाफ्यावर लागवड, दुहेरी ठिबक लॅटरलचा वापर, फर्टिगेशन, पर्णसंभाराचे (कॅनॉपी) व्यवस्थापन आणि वेळोवेळी केली जाणारी छाटणी यांचा अंतर्भाव असतो. (Israel Technology)
या तंत्रज्ञानामुळे लागवडीनंतर चौथ्या वर्षापासून उत्पादन घेता येते. याउलट पारंपरिक लागवडीमध्ये सहाव्या वर्षी उत्पादन घेणे शक्य होते. मॉडेल फार्म असलेल्या शेतकऱ्यांनी सहाव्या वर्षापासून हेक्टरी ३२ ते ३५ टन उत्पादन घेतले आहे.
यातील धीरज जुनघरे (काटोल), रमेश जिचकार (वरूड), मनोज तेलागडे (वरूड), अनिल लेकुरवाळे (शेंदूरजणा घाट), मनोज जवंजाळ (काटोल) आणि नीलेश रिदोडकर (काटोल) अशा काही शेतकऱ्यांनी तर प्रति हेक्टरी ४० टनांचा पल्लाही पार केला असल्याचे डॉ. देवानंद पंचभाई सांगतात.
छाटणीसाठी यंत्राचा वापर :
या तंत्रज्ञानामध्ये झाडांची संख्या अधिक असल्यामुळे त्यांची वाढ छाटणीद्वारे नियंत्रित ठेवावी लागते. त्यासाठी मजुरांची कमतरता लक्षात घेता ट्रॅक्टरचलित छाटणी यंत्राचा वापर संत्रा पिकामध्ये प्रथमच करण्यात आला.
शेतकऱ्यांना जितक्या अधिक फांद्या तितके अधिक उत्पादन असा गैरसमज आहे. असे छाटणीबाबत शेतकऱ्यांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके घेण्यात आली.
झाडाची उंची आठ ते १० फुटांपर्यंत राखल्यास अशा कॅनॉपीमध्ये दर्जेदार फळधारणा होऊन एकसारख्या आकाराची फळे मिळतात. सुमारे ८५ टक्के फळे ही ‘ए’ ग्रेडची मिळतात.
परिणामी, या तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होते. याउलट पारंपरिक पद्धतीमध्ये केवळ १५ ते २० टक्केच दर्जेदार फळे मिळत.
नागपूर येथे सुरुवातीला विदेशातून आयात केलेले छाटणी यंत्र उपलब्ध केले होते. त्याची किंमत २८ ते ३० लाख रुपये इतकी होती. मात्र पुढे त्याचा फायदा लक्षात आल्यावर शेतकऱ्यांकडून मागणी वाढली.
आता काटोल, अकोला आणि अचलपूर येथेही छाटणी यंत्राची भाडेतत्त्वावर उपलब्धता करण्यात आली. विदर्भातील संत्रा लागवडीखाली दीड लाख हेक्टर क्षेत्र असून, भविष्यात अशी तब्बल ५०० छाटणी यंत्रांची गरज भासू शकते.
या प्रकारे यंत्रे विकत घेऊन भाडेतत्त्वावर देण्याचा व्यवसायही चांगल्या प्रकारे चालू शकतो. अशी यंत्र विकसित करण्यासाठी भारतीय तंत्रज्ञ व कंपन्यांची पुढाकार घेतल्यास यंत्राची किंमत कमी होणे शक्य आहे.
फळगळ रोखण्यासाठीही फायदेशीर :
गादी वाफ्यावर लागवडीमध्ये अतिरिक्त पाण्याचा वेळीच निचरा होतो. त्याच प्रमाणे ठिबकद्वारे काटेकोर अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि छाटणीद्वारे झाडांचा आकार मर्यादित ठेवणे यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बागेत फळगळ नियंत्रणात राहत असल्याचे निरीक्षण डॉ. देवानंद पंचभाई यांनी सांगितले.
प्रक्रिया उद्योगाला चालना :
पारंपरिक पद्धतीच्या बागेमध्ये लहान आकाराची फळे २५ टक्के मिळतात. त्यांना कमी दर मिळतात. अशा फळांमध्ये रसाचे प्रमाण अधिक असते.
याचा फायदा घेण्यासाठी ‘सिट्रस कॉन्सट्रेंट’ तयार करण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे संत्रा फळांचे ग्रेडिंग, क्लिनिंग, व्हॅक्सिंग आणि लेबलिंग असे अनेक प्रकल्प वरुड, मोर्शी भागात वाढले आहेत.
अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात संत्रा प्रक्रिया करण्यासाठी शासन आणि सार्वजनिक भागीदारीतून प्रकल्प उभा राहण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. (Israel Technology)
इंडो-इस्राईल तंत्रज्ञानाचा विस्तार :
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात इंडो-इस्राईल तंत्रज्ञानाखालील क्षेत्र १०० हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. अमरावती, अकोला, वर्धा, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, परभणी, हिंगोली, नगर अशा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची पसंती या तंत्रज्ञानाला मिळत आहे.
राज्यपातळीवर या तंत्रज्ञानाखालील क्षेत्र पाच हजार हेक्टरपर्यंत विस्तारले असल्याची माहिती डॉ. पंचभाई यांनी दिली.
विद्यापीठाने याची शिफारस केलेली असल्यामुळे राज्य शासनाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आणि महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतूनही लागवडीसाठी २ लाख १० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते.
नागपुरी संत्र्याला भौगोलिक मानांकन :
नागपुरी संत्रा हे ताज्या स्वरुपात खाण्यासाठी आणि प्रक्रियेसाठीही अत्यंत योग्य आहे. रंग, चवीच्या बाबतीत वेगळेपण जपणाऱ्या या संत्र्याला भौगोलिक मानांकन मिळालेले आहे.
मानांकनाचे ‘नागपुरी संत्रा’ हा लोगो बॉक्सवर छापण्यासाठी वैयक्तिक प्रमाणपत्र आवश्यक असते. सद्य : स्थितीत उद्यानविद्या विभागाकडून वैयक्तिक वापरकर्ता म्हणून आवश्यक घटकांची पूर्तता करणाऱ्या ५५० शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचे डॉ. पंचभाई यांनी सांगितले.
शेतकऱ्याच्या शेतावरही वाढली उत्पादकता मी २०१५ मध्ये इंडो-इस्राईल तंत्रज्ञानानुसार संत्रा लागवड केली. तिसऱ्याच वर्षापासून फळांचे उत्पादन सुरू झाले. २०१८ मध्ये हेक्टरी २० टन उत्पादन मिळाले. त्यानंतरच्या काळात सरासरी ४० टन उत्पादकता मिळाली. गेल्या वर्षी हंगामात वातावरण बदलामुळे ही ३० टनापर्यंत खाली आली. मात्र ती पारंपरिक ७ ते ८ टनांच्या तुलनेत अधिकच राहिल्याने मी फायद्यातच राहिलो.
जयसिंग शिंदे, ९३७३१९१३८३ वाघोडा, ता. काटोल, जि. नागपूर
source : agrowom.com