आता फक्त १८ मिनिटांमध्ये माती परीक्षण ! पैशांचीही बचत : वाचा सविस्तर
माती परीक्षण
१) ॲमेझॉन किसानचा भारतीय कृषी संशोधन परिषदेसोबत करार (Indian Agriculture Research)
जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या ॲमेझॉन किसानं (Amazon Kisan) भारतीय कृषी संशोधन परिषदेसोबत पिकांची उत्पादक वाढवण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. ॲमेझॉन किसान मार्फत ॲमेझॉन फ्रेशसाठी पुरवठा साखळी उभारणीचे काम सुरू आहे.
त्यासाठी देशातील पिकांची उत्पादन आणि दर्जा सुधारण्यासाठी ॲमेझॉन भारतीय कृषी संशोधन परिषदेसोबत काम करणार आहे. ॲमेझॉन किसान या प्लॅटफॉर्मवरून शेती निविष्ठा विक्री केली जाते. ॲमेझॉन या करारानुसार प्रशिक्षण देऊन शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाच्या ऑनलाइन विक्रीसाठी मार्गदर्शन आणि मदत करणार आहे.
२) ॲग्रीच्या विद्यार्थ्यांना ग्रीन हाऊस तंत्रज्ञान प्रशिक्षणाची संधी (Green House Technology)
उच्च तंत्रज्ञान पुष्प आणि भाजीपाला उत्पादनासाठी ग्रीन हाऊस तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण पुण्यातील कृषी महाविद्यालयातर्फे देण्यात येणार आहे. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना दर महिन्याला २ हजार ४०० रुपये विद्यावेतनभत्ता दिला जाणार आहे.
या प्रशिक्षणाचा कालावधी १२ महिन्यांचा आहे. यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी अंतर्गत कृषी पदविकाधारक (ॲग्री डिप्लोमा) पात्र असून ३० प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात करण्यात येणार आहे.
इच्छुक उमेदवारांना प्रवेश अर्ज ऑफलाइन पद्धतीने महात्मा फुले कृषी महाविद्यालयाच्या उच्च तंत्रज्ञान पुष्प व भाजीपाला उत्पादन प्रकल्पाच्या कार्यालयातून ७ ते २० जूनच्या कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत घेता येईल. तसेच www.mpkv.mah.nic.in या संकेतस्थळावरसुद्धा अर्ज उपलब्ध आहे. Soil Testing Machine
३) भात पेरणीसाठी पंजाब कृषी विद्यापीठानं विकसित केलं यंत्र (Rice Sowing)
राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशात भात लागवड केली जाते. परंतु भात लागवडीसाठी पारंपरिक पेरणी यंत्राचा वापर केला जातो. आता लुधियाना येथील पंजाब कृषी विद्यापीठामध्ये विकसित भात पेरणी यंत्र विकसित केलंय. या यंत्राला ११ दाते आहेत. गरजेनुसार दोन दात्यातील अंतर कमी जास्त करता येतं.
तसेच बियाणे आणि खतासाठी दोन पेट्या या यंत्राला दिलेल्या आहेत. या यंत्रासोबत भाताप्रमाणेच सोयाबीन, हरभरा, मका, तूर, कापूस अशा पिकांसाठी वेगवेगळ्या प्लेट दिलेल्या आहेत. या पेरणी यंत्राच्या मदतीने दिवसभरात ८ ते १० एकर पेरणी करता येते. या यंत्रामुळे प्रति हेक्टरी २० ते २५ किलो बियाण्याची बचत होते, असा दावा पंजाब कृषी विद्यापीठाने केला आहे.
४) देशातील ट्रॅक्टर विक्रीत वाढ (Tractor Sell Update)
शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर दिवसेंदिवस वाढतोय. त्यामुळे देशातील एकूण ट्रॅक्टरची विक्रीही वाढतेय. देशातील ट्रॅक्टर विक्री, निर्यात आणि उत्पादनाची आकडेवारी ट्रॅक्टर आणि यांत्रिकीकरण ऑर्गनाझेशनमार्फत प्रसिद्ध केली जाते. या आकडेवारीनुसार देशातील ट्रॅक्टर विक्रीत एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात ५ टक्के वाढ झालीय.
मे महिन्यात एकूण ८३ हजार २६७ ट्रॅक्टर्सची विक्री झाल्याच या अहवालात म्हंटलंय. तर ट्रॅक्टरची निर्यात ९ टक्क्यांनी वाढलीय. परंतु उत्पादन मात्र कमी राहिलंय. गेल्यावर्षी मे महिन्यातील ट्रॅक्टरचे उत्पादन १ लाख ३ हजार ५६३ युनिट होतं. चालू वर्षात मे महिन्यात ७९ हजार ९२८ युनिट ट्रॅक्टरचं उत्पादन झाल्याचं अहवालात म्हंटलंय.
५) मशिनमुळे माती परीक्षण किती वेळात होणार ? (Soil Testing)
जमिनीत कोणते घटक किती प्रमाणात आहेत, जमिनीला कोणत्या मूल्यद्रव्यांची गरज आहे, याची माहिती शेतकऱ्यांना जाणून घ्यायची असेल तर माती परीक्षण करणं आवश्यक असतं. परंतु सध्या माती परीक्षणासाठी लागणार वेळ आणि खर्च अधिक आहे. त्यामुळे जमिनीतील नत्र, स्फुरद आणि पालाशचं प्रमाण किती आहे, याबद्दल शेतकऱ्यांना वेळेत माहिती मिळत नाही.
त्यामुळे खतांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो. परंतु आता या सगळ्या अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. देशात आधुनिक माती परीक्षण मशिन विकसित करण्यात येऊ लागले आहे. दिल्ली येथील उपज या कंपनीनं कमी वेळेत व कमी खर्चात माती परीक्षण करणारं मशिन बाजारात आणलंय.
भारतीय कृषी संशोधन परिषदेनं तयार केलेल्या सध्याच्या माती परीक्षण मशिनच्या तुलनेत उपजचं मशिन दिवसाला ५० परीक्षण करतं. तसेच फक्त १८ मिनिटांत परीक्षण करून देते. याआधी परीक्षणासाठी २ ते ३ तास लागत. मात्र या मशिनमुळे वेळ आणि खर्चात बचत होण्याचा दावा उपज या कंपनीने केला आहे.
source : agrowon