कृषी महाराष्ट्र

Weather Update : मॉन्सून केरळमध्ये दाखल ! आजचे हवामान अंदाज

Weather Update : मॉन्सून केरळमध्ये दाखल ! आजचे हवामान अंदाज

मॉन्सून केरळमध्ये दाखल

Pune : देशाच्या भूभागाचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) आगमन झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. केरळचा बहुतांशी भाग, तमिळनाडूच्या दक्षिण भागात गुरुवारी (ता. ८) मॉन्सूनने प्रगती केली आहे. एल-निनोच्या सावटामुळे यंदा पावसावर परिणाम होण्याची चर्चा सुरू असतानाच, मॉन्सूनचे केरळमधील आगमन तब्बल सात दिवसांनी लांबले.

दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता मॉन्सून साधारणतः: १ जून पर्यंत केरळमध्ये पोचतो. यंदा मॉन्सून ४ जून पर्यंत केरळमध्ये येण्याची शक्यता होती. यात चार दिवसांची तफावत गृहित धरण्यात आली होती. अंदाजानुसार मॉन्सून वेळेवर आला असला तरी, दीर्घकालीन सरासरीच्या सात दिवस उशिराने मॉन्सून देवभूमी केरळ मध्ये पोचला आहे. गतवर्षी मॉन्सूनचे आगमन ३ जून रोजी झाले होते.

आग्नेय अरबी समुद्र आणि केरळमधील ढगांचे अच्छादन, समुद्र आणि भूभागावरून परावर्तित होणारा किरणोत्सर्ग, समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत पश्चिमेकडून वाहणारे वारे, हवेच्या खालच्या थरात १९ नॉट्स पर्यंत पोचलेला वाऱ्यांचा वेग आणि केरळमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पडणारे पाऊस यावरून मॉन्सून दाखल झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

गुरुवारी (ता. ८) दक्षिण अरबी समुद्राचा उर्वरित भाग, संपूर्ण लक्षद्वीप बेटे, केरळचा बहुतांशी भाग, तमिळनाडूचा दक्षिण भाग, मन्नारचे आखात आणि नैर्ऋत्य, मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागरात मॉन्सूनने प्रगती केली आहे.

कर्नुल, कोडाईकनाल, आदिरापट्टीनम पर्यंतच्या भागात मॉन्सून दाखल झाला आहे. येत्या दोन दिवसांत संपूर्ण केरळ व्यापून, मध्य अरबी समुद्र, तमिळनाडूचा आणखी काही भाग, कर्नाटकच्या काही भागासह, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भाग आणि ईशान्येकडील राज्यात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

यंदा नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा ९६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे. मॉन्सून हंगामात एल-निनो स्थिती राहण्याची, तसेच इंडियन ओशन डायपोल (आयओडी) धन (पॉझिटिव्ह) राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. Monsoon

थोडक्यात महत्त्वाचे…

– सरासरीच्या सात दिवस उशिराने मॉन्सून देवभूमी केरळ मध्ये

– दोन दिवसांत ईशान्येकडील राज्यात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता

– जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा ९६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज

– मॉन्सून हंगामात एल-निनो स्थिती राहण्याचीही शक्यता

२०१९ मध्ये मॉन्सून उशिरा

यापूर्वी २०१९ मध्ये मॉन्सून ८ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. त्यावेळीही १० ते १७ जून या कालावधीत रोजी अरबी समुद्रात ‘वायू’ अतितीव्र चक्रीवादळाची निर्मिती झाली होती. या वादळामुळे मॉन्सूनची वाटचाल थबकली होती.

८ जून रोजी केरळात आलेला मॉन्सून तब्बल चक्रीवादळ निवळल्यानंतर २० जून रोजी महाराष्ट्रात दाखल झाला होता. मॉन्सूनच्या उशिरा आगमनामुळे जून महिन्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता.

मॉन्सूनचे केरळातील आगमन

वर्ष—अंदाज—प्रत्यक्ष आगमन

२०१९—६ जून—८ जून

२०२०—५ जून—१ जून

२०२१—३१ मे—३ जून

२०२२—२७ मे—२९ मे

२०२३—४ जून—८ जून

source : agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top